#जागतिक_पुस्तक_दिनाच्या_निमित्ताने_एका_पुस्तकाचा_परिचय
कोराना काळाचा वेदनामय अनुभव देणारी #क्वारंटाईन’
सन २०२०. भय, अगतिकता, संताप, गूढता, मानसिक तणाव, हुरहूर या आणि अशा अनेक प्रकारच्या भावनांनी विचलित करत निघून गेलं. याच दरम्यान कोरोना, लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंग, कर्फ्यू, संचारबंदी, जमावबंदी, आणि क्वारंटाईन या संकल्पनांनी मानवी जीवन प्रभावित केलं. कोरोनाच्या जागतिक महामारीने आख्खं जग कळ दाबून थांबावावं, तसं थांबलं! याचा समाजातील सर्वच घटकांवर प्रत्यक्ष-प्रत्यक्षपणे परिणाम पडला. केवळ सर्वसामान्य माणसांचेच नाही तर देशांचे आर्थिक जीवन विस्कळीत झाले. या विस्कळीत झालेल्या समाज जीवनाचा संवेदनशील माणसांवर आघातकारी परिणाम झाला. अनेक लोकांनी आपल्या भावना लेख, कविता, कथा अथवा कादंबरीच्या माध्यमातून रीत्या केल्या.
डॉ. आनंद बल्लाळ त्यापैकीच एक संवेदनशील व्यक्तिमत्व. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लागलेल्या लॉकडाउनच्या झळा त्यांच्या संवेदनशील मनाला लागल्या. त्याचीच प्रचीती ‘क्वारंटाईन’ ही लघुकादंबरी देते. त्यांची कोरोनाच्या महामारीनंतर लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात वास्तवाचा ठाव घेणारी लघुकादंबरी यशोदीप पब्लिकेशन, पुणे यांनी नुकतीच प्रकाशित केली आहे.
आनंद पवार. वय वर्ष बत्तीस. ग्रामीण भागात शिकून नोकरीनिमित्त मुंबईत गेलेल्या युवकाची कथा. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शिकलेल्या मुलांनी शिकून कामधंदा करावा आणि आपलं सरळमार्गी जीवन जगावं. याच पठडीतील आनंद. आपले काम आणि आपले जीवन यामध्येच रमणारा. लॉकडाऊन झाल्यानंतर मात्र त्याच्या सरळमार्गी जीवनात व बाह्य जगामध्ये अनेक उलथापालथी घडतात. त्याची सूक्ष्म वास्तव मांडणी प्रस्तुत कादंबरी करते. आधुनिक तंत्रज्ञान आणि बौद्धिक कौशल्याच्या जोरावर प्रगतीच्या गप्पा मारणाऱ्या मानव जातीला कोरोनानं क्षणार्धात कसं जमिनीवर आणले याचे दर्शन ही कादंबरी देते. मानवी जीवन किती क्षणभंगुर आहे याचे प्रतिकात्मक चित्रण अनेक प्रसंगांच्या माध्यमातून लेखकाने मार्मिकपणे टिपले आहे. नाग-नागिन प्रेमछायेत विसावल्याच्या प्रसंगात तर अवघे जीवन दर्शन मांडले आहे.
“थोडी पंखांची फडफड झाली अन भुर्रकन एक घार त्याच्यासमोर उडून गेली. काय झालं हे क्षणभर त्याला कळलंच नाही. त्यानं घार गेली त्या दिशेला पाहिलं तर आभाळात लांबवर त्या घारीची काळी सावली उडत हुती आणि तिच्या पायापाशी काहीतरी लोंबत होतं.”
लॉकडाऊन लागल्यामुळे वर्षभरानंतर आनंद घरी परतला होता. मात्र तो होम क्वारंटाइन असल्याने एकाकी होता. त्या एकाकी वातावरणात घरासमोर असलेल्या झाडानं त्याचं लक्ष वेधलं होतं.
“त्यानं पाहिलं, झाडाचं एक पान घिरट्या घीत घीत खाली यीत हुतं. तोच वाऱ्याच्या झोतानं ते भरकटलं. झोकांड्या खात खात आनंदच्या पायाशी यीवून अडखळलं. त्याला त्या पानाची कीव आल्ती. त्यानं ते पान उचललं. जणू त्यो त्या पानाला इचारत हुता, ‘कसं रं तुझं नशीब. झाडावर नाही निदान झाडाच्या पायथ्याशी तरी पडायचास. पण तू झोकांड्या खात इथं माझ्याकडं यीवून पडलास.’
यासारख्या, आनंदच्या जीवनात आलेल्या अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांचं मार्मिकपणे दर्शन वाचकाला घडते.
रोजगाराच्या निमित्ताने ग्रामीण भागातून मुंबईत आलेल्या तरुणांची परवड कशी होते याची जाणीव अनेक घटना प्रसंगातून लेखक घडवतो. नागरीकरण व आधुनिकीकरणामुळे शहरं गजबजली. सजली. तथाकथित विकास दृश्य रूपात दिसायला लागला. पण हा विकास ज्यांच्या कष्टावर, घामावर उभा राहतो त्या लोकांच्या जीवनातील संघर्ष आनंदच्या माध्यमातून लेखकाने मांडला आहे. खऱ्या अर्थानं शहराची दुसरी दुखरी बाजू समोर आणली आहे. गाववाल्यांच्या खोल्यातील जीवन तर मन हेलावून टाकतं.
तसं पाहिलं तर ‘हिंदू-मुस्लिम संघर्ष’ हा भारतीय समाजाला काही नवीन नाही. मात्र कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळातही धर्म द्वेष बाळगणाऱ्या लोकांनी ‘तबलीगी’ जमातीच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाला टार्गेट करण्याचे सोडले नाही. त्यामुळे निर्माण झालेले भय गावपातळीपर्यत कसं पोहचले हे ‘सम्या’च्या रूपाने अंतर्मुख करायला लावते.
“काय रे सम्या, काय गावची हाल?’ ‘
हालहवाल क्या अंदा, सध्या ल्हायी टाईत हुयाय. वर परसूके ओ निजामुद्दीन प्रकरण की वजेशी हमे सारे मुसलमाना इस देश के दुश्मन हुई बाबा.”
सम्या पुढे बोलत रहातो,
“आंदा, इत्ता कोरोना के वक्त ओ एक हुये, यो चुक्या. खरा एक चुकिकी सजा तुमी सब मुसलमानां को देतेयी? यों तुम्हारा चुकता देख. आरे तुम्ही लोकां नई क्या अलग अलग त्योहार मनाते? हामी तुम्हारे बरबर रेहते तो. ईद को तुमारे लोकां हमारेकानी आतयी. तू पहिले अताता तो हमारे घरमी शिरखुर्मा पिनी. तुम्ही नई क्या धर्म के कामकु एकत्र आतयी? तो हमी इस्तेमा को अते तो क्या हुआ? हमी तो क्या अलग करतय क्या? हदिस पडना, नमाज पढना, रोजा रखना गुना है क्या? हमिबी हमारे दादा परदादा के जमानेशी इस देश मी है. यो देश हमारा भी है क्या नयी? अरे हमना भी इस देश की काळजी है तो.”
सम्याचे हे कथन वाचकाला हिंदू – मुस्लिम संघर्षाला नव्याने समजून घ्यायला बाध्य करते.
आजरा हे तसं प्रमुख शहरापासून लांब असलेले गाव. पण या गावाला समृद्ध करणाऱ्या ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, बाबुराव पेंटर, शाहीर गव्हाणकर, म.ब. बेहरे, के.नी. वाटवे, जे. पी. नाईक, मोरजकर महाराज, अशा महान व्यक्तींची ओझरती ओळख होते. यासोबतच आजऱ्यात राहणाऱ्या तळकोकणातून आलेला वैश्य समाज, मुस्लिम राजवटीत आलेला मुस्लिम समाज, गोव्यातून आलेला ख्रिश्चन समाज, शेती करणारा कुणबी समाज तसेच डगे धनगर समाजाची ऐतिहासिक पृष्ठभूमीबरोबरच त्यांच्यातील वर्षानुवर्षे राहिल्याने निर्माण झालेल्या सांस्कृतिक एकोप्याचे दर्शन घडते. या मांडणीने वाचकाला कादंबरीच्या कथानकातील प्रादेशिक मांडणीने इथल्या समाजाची सामाजिक-सांस्कृतिक ओळख होते.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर प्रशासकीय व वैयक्तिक पातळीवर घडणाऱ्या अनेक घटनांचा आढावा आनंदच्या माध्यमातून प्रस्तुत कादंबरी घेते. हजारो लाखो लोकांना आलेले हे अनुभव अत्यंत वेदनादायी आहेत. मुंबई, पुणे अशा महानगरामध्ये रोजगारासाठी आलेल्या बाहेर राज्यांतून आलेल्या लोकांचे जाताना झालेली दयनीय अवस्था आख्या देशाने पाहिली आहे. त्या सर्व घटनांची वेदनादायी आठवण कादंबरी देते. आनंद पवारच्या माध्यमातून मुंबईहून गावाकडे परतलेल्या प्रत्येक व्यक्तीला शासकीय यंत्रणेसोबतच त्यांच्याच गावकऱ्यांशी सामना करावा लागला याचा वस्तुपाठच मांडला आहे. मेडिकल सर्टिफिकेट, होम क्वारंटाईन, स्वब तपासणी, रिपोर्ट येईपर्यतची घालमेल याचे नेमके चित्रण केल्याने वाचकाची अस्वस्थता आणि उत्कटता उत्तरोत्तर वाढत जाते.
गेले वर्षभर संपूर्ण जग कोरोनाशी सामना करतंय. अनेक देशांच्या आर्थिक व्यवस्था कोलमडल्या. हजारो लाखो लोक बेरोजगार झाले. अनेक उद्योग बंद पडले. काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आता भारतात जोमाने कोरोनाचा दुसरा टप्पा पसरतो आहे. सगळीकडे हाहाकार माजतो आहे. आरोग्य यंत्रणा आहोरात्र प्रयत्न करूनही तिच्या मर्यादा स्पष्टपणे दिसत आहेत. लॉकडाऊनला प्रंचंड विरोध होताना दिसतोय. कारण लोकांना जगणं महत्वाचे आहे. घरात बसून उपजीविका कशी करणार हा सर्वांसमोर मोठा प्रश्न आहे. कोरोनानं मरायचं की भुकेनं? तेव्हा कसंही मरायचेच आहे. हाच विचार सार्वत्रिक होताना दिसतो आहे. कारण पोटाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. आनंदला पण हाच पश्न पडला आहे. कंपनीने पाठवलेला मेल वाचताना त्याला समजलं कि, लॉकडाउन वाढल्याने त्याची कंपनी बंद झाली आणि त्यालाही सक्तीची बिनपगारी रजा दिलीय. त्याचक्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. त्यावेळी त्याला चॅर्ली चॅप्लिन वाक्य आठवतं,
I Always like walking in the rain
So no one can see me crying.
अतिशय हृदयस्पर्शी प्रसंगाने कादंबरीचा केलेला शेवट वाचकाच्या मनात ठसतो. कोरोनाच्या काळात आपली संवेदनशीलता जपत निर्माण झालेल्या स्थितीवर डॉ. आनंद बल्लाळ यांनी ‘क्वारंटाइन’च्या माध्यमातून अनेकांच्या वाटयाला आलेल्या प्रसंगाची वास्तववादी मांडणी केली असल्याने ज्यांना प्रसंगांना सामोरे जावे लागले त्यांना हि कादंबरी निश्चितच त्यांची स्वत:ची वाटेल. यातच डॉ. आनंद बल्लाळ यांच्या लेखणीचे यश दडलेलं आहे. पुढील लेखनास त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा..!
************************************ डॉ. अविनाश वर्धन
मो. ९९६०३०४२५४
पुस्तकाचे नाव : ‘क्वारंटाईन’
लेखक : डॉ. आनंद बल्लाळ
प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे
पृष्ठे : १२८
किंमत : १५०
खूप खूप धन्यवाद मित्रा.
ReplyDeleteमस्तच।अभिनंदन दादा
ReplyDeleteसमकालीन वास्तवाचा वेध घेणारी कादंबरी आहे. मानवी वृत्ती प्रवृत्ती वर लेखकाने सूक्ष्म प्रकाश टाकला आहे. मुळातून ही कादंबरी वाचण्याची उत्सुकता आहे . तुर्त लेखक आणि प्रकाशकांचे अभिनंदन !
ReplyDeleteडॉ . प्रकाश दुकळे
हार्दिक अभिनंदन.
ReplyDeleteछान !कादंबरी वाचण्याची उत्सुकता अधिक वाढली आहे
ReplyDelete