Sunday, April 5, 2020

कॉ. शरद पाटीलकृत जात्यन्तक मीमांसा : नवा अन्वयार्थ


Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ), UGC Approved, Sr.No.64259 ISSN : 2349-638x, 12 January, 2018, Page No. 361-366, यामध्ये लेख प्रकाशित... 



कॉ. शरद पाटीलकृत जात्यन्तक मीमांसा : नवा अन्वयार्थ   
            स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये देश-विदेशातील अनेक अभ्यासकांनी भारतीय सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास केला आहे. ही प्रक्रिया आजही सुरूच आहे. आपापल्या सैद्धांतिक दृष्टीकोनाच्या आधारे भारतीय समाजातील जात वास्तव, सामाजिक स्थित्यंतर व इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न या विचारवंतांचा राहिलेला आहे. मात्र स्वातंत्र्योत्तर कालखंडाच्या अर्धशतकांहून महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतीय विचारविश्वाच्या आणि डाव्या-फुले-आंबेडकरवादी, परिवर्तनवादी चळवळीच्या प्रवाहांवर कॉ. शरद पाटील (१७ सप्टेंबर, १९२५ ते १२ एप्रिल, २०१४) यांच्या योगदानाचा प्रभाव व्यापून राहिला आहे, तो निश्चितच थक्क करणारा आहे. इतिहास, भारतीय प्राच्यविद्या (इडॉलोजी), समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान, पाणिनीय व्याकरण या विषयांमध्ये सैद्धांतिक तत्वज्ञानाची फेरमांडणी कॉ. शरद पाटील यांनी केली आहे. त्यांनी केवळ सैधान्तिक मांडणीच केली नाही तर प्रत्यक्ष चळवळ देखील उभी केली. आदिवासींच्या संघर्षमय जीवनाला नवा अर्थ देण्याचे कार्य केले. स्त्रीदास्य, वर्ग अंत व जातमुक्तीसाठी शोषित लोकांच्या न्याय हक्कासाठी कॉ. शरद पाटील आयुष्याच्या अंतापर्यंत संघर्षरत राहिले. त्यासंबंधी विपुल अशा लेखनाबरोबरच  भाषणे, वृत्तपत्रीय लेख व प्रत्यक्ष चळवळीत योद्धा बनून ते सर्वात पुढे राहिले. त्यांच्या एकूणच योगदानाचा विचार केला तर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही वैचारिक साहित्य विश्वामध्ये केवळ भरच घातली नाही तर वैचारिक साहित्य विश्वाला वेगळी ओळख निर्माण करून दिली.    
            कॉ. शरद पाटील वर्तमानातील सामाजिक घटकांचे मुळ शोधताना इतिहासात डोकातात. ते  इतिहासाबद्दल लिहितात की, “स्वदेशाच्या इतिहासाचे वैज्ञानिक आकलन केल्याशिवाय आजच्या सम्यक परिवर्तकांना वर्ण जात स्त्रीदास्यांत करता येणार नाही. आजचे प्रबोधन म्हणजे मिथ्सचा वास्तवाने परिहार!”[1] कॉ. शरद पाटील यांनी भारतातील जाती व्यवस्थेचा व स्त्री दास्याचा, गुलामगिरी व्यवस्थेचा इतिहासातील मिथ्सच्या आधारे उलगडा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रमाणे ‘पिज्वन’ मिथ उलगडल्यावर ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ हे सांगितले, त्याचप्रमाणे कॉ. शरद पाटील यांनी ‘निऋती’ चे कोडे उलगडून भारतातील मातृसत्तेचा इतिहास उगाजर करून  वर्तमानातील समतेसाठी ऐतिहासिक संदर्भ मार्गदर्शक म्हणून उभा केला. १९७२ साली ‘दास शुद्रांची गुलामगिरी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासापून कॉ. शरद पाटील यांनी भारतीय वैचारिक विश्वाला त्यांची दखल घ्यायला भाग पाडले. आपल्या लेखनाच्या निर्मितीबाबत कॉ. शरद पाटील लिहितात कि, “१९७० साल संपायला आले; पण मला माझ्या संशोधनाचा पार दिसेना ना पुस्तकाचा प्रारंभ. तेव्हा कृष्ण राज यांचे ‘एकॉनॉमिक अँड  पॉलिटीकल विकली’ साठी डॉ. बी. आर. आंबेडकरांच्या ‘हु वेअर द शूद्राज’ चे परीक्षण लिहायचे पत्र आले. शिफारस डॉ. आय. पी. देसाईनी केल्याचे लिहिले. लिहिल्या न जाऊ शकलेल्या परीक्षणातून १९७२ अखेर हे पुस्तक लिहून झाले.”[2] कॉ. शरद पाटील यांचा इतिहासाकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन आहे, तसाच दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहास विषयक आकलनातही दिसतो.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासाबद्दल लिहिले आहे की, “आमच्या वर्तमानातील समस्यांची मुळं इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. ज्यामुळे आम्हाला इतिहास धुंडाळावा लागतो. म्हणूनच त्यांनी ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जाती व्यवस्थेचा उदय व तिचा प्रसार कसा झाला यावर नवी प्रमेये मांडून ब्राह्मणी सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या प्रतिकांची चिकित्सा केली. डी. डी. कोसंबी, राहुल सांस्कृत्यायन यांसारख्या अनेक विद्वावांनी भारतीय इतिहास व समाज व्यवस्थेचे विवेचन व विश्लेषण करून नवा दृष्टीकोन दिला. याच विचार परंपरेतील अलीकडील एक महत्वाचे विचारवंत, भारतीय प्राच्यविद्या पंडित म्हणून नावाजलेले व जीवनदानी कार्यकर्ता कॉ. शरद पाटील यांचे योगदान लक्षात घ्यावे लागते. कॉ. शरद पाटील यांनी बहुप्रवाही विधायक ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धतीद्वारे भारतीय समाजातील वर्ण-जातिसंघर्ष व्यवस्थेचे कोडे उलगडण्याचा केलेला प्रयास भारतीय दार्शनिक परंपरेमध्ये मैलाचा दगड ठरणारी घटना आहे. त्यांनी हयातभर जी ग्रंथ संपदा निर्माण केली, ज्या समाजिक राजकीय चळवळी उभारल्या त्याचा मुख्य उद्देश भारतातील समाजिक-सांकृतिक विषमतेचा पाया म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या जाती व्यवस्थेच्या अंताचा.  म्हणूनच वैचारिक साहित्य विश्वामध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. सामाजिक पातळीवर जाती अंताची लढाई लढणाऱ्या सर्वांनाच त्यांच्या विचारांशी मतभेद असले तरी टाळता येत नाही.
            कॉ.शरद पाटील यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. यामध्ये १. दास शुद्रांची गुलामगिरी – भाग १ व २ (इंग्रजी व मराठी ), २. रामायण – महाभारतातील वर्ण संघर्ष भाग – ३,  ३. शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण? - महमंदी की ब्राह्मणी?, ४. जात्यंतक भांडवलवाद लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती (इंग्रजी व मराठी), ५. प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता – स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद (इंग्रजी व मराठी),  ६. अब्राह्मणी साहित्याचे सौदर्यशास्त्र,  ७. मार्क्सवाद –फुले-आंबेडकरवाद, ८. भारतीय तत्वज्ञान व नास्तिक मत,  ९. बुद्ध : भारतीय इतिहासातील लोकशाही स्वातंत्र्य आणि समतेचा अग्निस्त्रोत, १०. पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका, ११. स्त्री-शूद्रांच्या स्वराज्याचा राजा, १२. शोध – मुलनिवासींचा की शूद्रवर्णाचा की जात्यंतक समतेचा? उपरोक्त सर्व ग्रंथांतून शरद पाटील यांनी प्राचीन भारतातील संस्कृतीच्या दुर्लक्षित इतिहासाचा नवा अर्थ लावण्याचे काम केले. भारतीय दर्शनशास्त्रातील विविध ग्रंथांचा चिकित्सक अभ्यास केला.  
            उपरोक्त सर्व ग्रंथातून भारतातील दास प्रथा, गुलामगिरी, जाती व्यवस्था व  स्त्री दास्यातून निर्माण झालेल्या समस्यांची मुळे शोधण्याबरोबरच जाती व्यवस्थेचा अंत कसा करता येईल याची सूत्रबद्द मांडणी करण्यास सुरवात केली. १९९३ साली आलेल्या ‘मार्क्सवाद –फुले-आंबेडकरवाद’ व ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ या मासिकातून त्यांनी जातिव्यवस्थेचा प्रश्न चर्चा विश्वाच्या केंद्रस्थानी आणला. पारंपरिक भारतीय मार्क्सवादी चिंतकांनी मार्क्सवादाला केवळ आर्थिक विचारांत बंदिस्त केले त्याबरोबरच मार्क्सवादाला भारतीय मातीत मिसळण्यास मज्जाव केला होता हा त्यांचा आरोप होता.  मात्र कॉ. शरद पाटील यांनीच आपल्या लेखन व चिंतनाने ही कोंडी फोडली. प्रस्थापित मार्क्सवादी नेतृत्वाला आव्हान देत जातीच्या अर्थशास्त्राची नव्याने मांडणी केली.  सचिन माळी यांनी कॉ. शरद पाटील यांच्या या भूमिकेचे वर्णन करताना लिहिले आहे कि, “कॉ. शरद पाटील यांनी सीपीएलपासून फारकत घेत ‘सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी’ स्थापन केली. युरोपच्या धर्तीवरील राजकीय अर्थशास्त्र घोळत बसणाऱ्या पडीक पंडितांना तात्त्विक अस्त्रांनी जेरीस आणत कॉम्रेड शरद पाटलांनी जातीच्या अर्थशास्त्राचा मुद्दा ऐरणीवर आणला.” [3] भारतातील जातीव्यवस्था व तिचे उत्पादन संबंधाशी असणारे नाते स्पष्ट केले. भारतातील बहुसंख्य लोकांच्या मागासलेपणाचा पाया ‘वर्ग की जात’ हा प्रश्न आजही चर्चा विश्वाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथल्या व्यवस्थेला केवळ श्रमाची विभागणी मानत नाहीत तर इथे श्रमिकांचीच विभागणी असते हे सिद्ध करतात. भारतात मागासलेपणाचा पाया हा ‘जात’च आहे असे मानतात. कॉ. शरद पाटील भारतातील मागासलेपणाचे विश्लेषण करताना लिहितात  की, ‘वर्ग समाजातील दारिद्र्य आर्थिक मागासलेपणातून येते तर जाती समाजातील दारिद्र्य सामाजिक मागासलेपणातून येते. हा मौलिक नियम मांडून मंडळ आयोगाने जातीचे वेगेळे अर्थशास्त्र उभारण्याची नितांत गरज असल्याचे स्पष्ट केलेले आहे. जातीचे अर्थशास्त्र उभारल्याशिवाय जात्यंतक क्रांती होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.”[4] इथे हेही लक्षात घेतले पाहिजे की, आंबेडकरोत्तर सामाजिक-राजकीय चळवळीनी आर्थिक घटकांना महत्व दिल्याचे दिसत नाही. अपवाद दलित पँथरचा. पण दलित पँथरच्या फाटाफुटीनंतर हा मुद्दा फारसा चर्चेत आला नाही. परिवर्तनवादी चळवळीतील लोक ‘वर्गीय’ किंवा  ‘जातीय’ या कंपूशाहीत विभागले गेल्याने चळवळीचे मोठे नुकसान झाले किंबहुना जाती अंताच्या कार्यक्रमाचे तीनतेरा झाले. हे लोक वर्गीय व जातीय भूमिकेला चिकटून राहिले आणि या दोन्ही भूमिका घेवून समन्वय घडवू पाहणारे लोक परिघाबाहेर राहिल्याचे दिसते. कॉ. शरद पाटील हे त्यांचे एक उत्तम उदाहरण आहे. मात्र आपल्या बौद्धिक सामर्थ्याने सर्वांनाच विचार करायला कॉ. शरद पाटील यांनी बाध्य केले. विचारविश्वामध्ये रोमिला थापर, इरफान हबीब, मे. पु. रेगे यासारख्या इतिहास अभ्यासकांना त्यांनी  दखल घ्यायला लावले.
            कॉ. शरद पाटील आपल्या लेखनात अन्वेषण पद्धतीला फार महत्व देताना दिसतात. त्यांनी आपल्या पहिल्याच खंडात स्पष्ट केले आहे की, “माझी संशोधन पद्धती मार्क्सवादी नाही, ती शुद्र्वर्गीय नाही, तर वर्ण जातीय वर्गवादी आहे. १९७८ पासून ते तिला मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादी म्हणायला लागले.”[5] याच सैद्धांतिक दृष्टीकोनाच्या आधारे भारतातील वर्ग-जात समजून घेतात. जात व वर्ग हे एकच कोटीक्रम नाहीत. जातिव्यवस्था ही वर्गेत्तर समाजव्यवस्था असून वर्ग व्यवस्थेपेक्षा तिची वैशिष्ट्ये भिन्न आहेत हे दर्शविण्याकरिता कॉ. शरद पाटील यांनी जात व वर्ग यांच्यातील भेद लक्षणे सांगितली आहेत. त्यासाठी त्यांनी पां. वा. काणे यांनी जी जाती व्यवस्थेची सहा लक्षणे सांगितली आहेत त्या लक्षणांना आधारभूत मानले. ती लक्षणे अशी... १. जात जन्माने  ठरते, २. जातीने व्यवसाय ठरतो, ३. जाति अंतर्गत बेटी व्यवहार होतो, ४. जातीबाह्य रोटी व्यवहार मनाई असते, ५. जातवार अलग व बहिष्कृत वस्त्या असतात, ६. जात्यन्तर्गत नियमन व दंडन करणारी जात पंचायत असते.  या सहा लक्षणांची तुलना वर्ग व्यवस्थेशी करून वर्गव्यवस्था ही जातिव्यवस्थेपेक्षा अधिक खुली आणि कमी जाचक अशी व्यवस्था आहे, असे कॉ. पाटील सुचवू पाहतात.मात्र ही सहा लक्षणे अपुरी आणि बाह्यांगी आहेत, याकडे कॉ. शरद पाटील यांनी गांभीर्याने पाहिलेले नाही. प्रा. सचिन गरुड यांनी कॉ. पाटील यांच्या या जातीविषयक आकलनाचे विश्लेषण करताना लिहिले आहे की, “  जातिव्यवस्थेच्या उतरंडीच्या असमानतेची व शोषणाची, उच्चनीचतेचा दर्जा देणाऱ्या क्रमबद्ध विषमतेच्या सोपान परंपरेची म्हणजेच उच्च जातीना सर्वोच्च विशेषाधिकार आणि दलित आदिवासींना सर्व प्रकारची वंचितता, जाती व्यवस्थेतील ब्राह्मणांचे सार्वकालिक, सार्वत्रिक सर्वश्रेष्ठत्व वरील लक्षणे अधोरेखित करत नाहीत. एवढेच नाही तर त्यांच्याद्वारे जाती रचनेचे रक्षण व संवर्धन, जातिगत आर्थिक शोषणाचे किंबहुना श्रमिक जातींच्या श्रमातून निर्माण होणारे वरकड अपहरण करणाऱ्या उत्पादन संबंधांच्या व वितरणाच्या अर्थरचनेचे, वर्ग समाजातील पितृसत्तेच्या तुलनेत जातीपितृसत्तेतील स्त्रीदास्याची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये या सहा लक्षणांमधून स्पष्टत: अधोरेखित होत नाहीत. कॉ. पाटील यांच्या लेखनात आणि मौखिक भाषणात याविषयीच्या बहुविध व्यामिश्र आयामांची चर्चा अभावानेच आली आहे.”[6] असे असले तरी भारतीय कम्युनिस्टांना जातिविषयक विश्लेषणाची  आकलन दृष्टी देण्याचे कार्य त्यांच्या लेखन कृतीतून घडल्याचे प्रा.सचिन गरुड लिहतात.[7]
            ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी वसाहतपूर्व काळात वर्ग व्यवस्थाच नव्हती, त्याऐवजी जातीव्यवस्थाक सरंजामशाहीची समाजरचना होती आणि बुद्धपूर्व काळात दासप्रथाक वर्णव्यवस्था अस्तित्वात होती, असे त्यांचे महत्वपूर्ण प्रतिपादन त्यांनी अथक व अनन्यसाधारण संशोधनाच्या अभ्यासातून सप्रमाण मांडले. ब्रिटिशांनी आणलेल्या भांडवलशाही प्रधान विकास प्रक्रियेने ही व्यवस्था जातवर्गीय स्वरुपाची घडली असे प्रतिपादन करून त्यांनी मार्क्सवाद्यांच्या एकांगी वर्गवादी आणि फुले-आंबेडकरी प्रवाहाची एकेरी जातलक्षी विश्लेषणदृष्टी यांना शह दिला. भारतीय सामंतशाहीचा उदय आणि विकासासंदर्भात कॉ. शरद पाटील लिहितात की, “युरोपियन सामंतप्रथेतील आर्थिकेत्तर सक्ती वर्गसंबंधातून आली होती, तर भारतीय सामंतप्रथेतील वेठबिगारीची सक्ती वर्णजातीय संबंधातून व त्यांच्या धर्मशास्त्रांतून आली होती. अशाप्रकारे युरोपियन सामंतप्रथेतील शेतकऱ्यांची परतंत्रता उत्पादन साधनांच्या मालकी–अमालकीवर सामंतप्रथेतील शेतकऱ्यांच्या भूस्वामित्वाच्या स्वातंत्र्याला त्यांच्या शुद्र-वर्ण जातीयत्वामुळे वाढती मर्यादा पडत होती.” प्रस्तुत मांडणीचे आजच्या संदर्भात विवेचन करताना इनायत परदेशी असे लिहितात कि, “सामंत प्रथेसंदर्भातील हे विवेचन आजच्या समकालीन संघर्षात कोणते दिशादर्शन देते? यासाठी इनायत परदेशी प्रमुख दोन मुद्यांचा विचार करतात. १. सामंत प्रथा (भारतीय) जातीच्या भौतिक पायावर उभी होती म्हणून धर्म, संस्कृती, राजकारण यांचे स्वरूप जातीसंबंधित होते. २. आजच्या सामाजिक – सांस्कृतिक जीवनावर जातीव्यस्थेचा पगडा आहे. त्यामुळे जातीविरोधी क्रांती आवश्यक आहे.[8] म्हणजेच भारतातील सामंतशाही, राजे महाराजे हे उच्च वर्णीय वा जातीयच होते. धर्मानेच त्यांना उच्चअधिकार बहाल केले. याच व्यवस्थेतील कनिष्ठ जातीतील लोक गुलामीचे जीवन जगत होते. त्याचा आधार जातीव्यवस्था होय. युरोपीय सामंत प्रथेमध्ये आर्थिक संबंधांना महत्व होते तर भारतीय सामंत प्रथेत जातीय संबंधांना. ब्रिटीशांच्या आगमनानंतर भारतात भांडवली उत्पादन व्यवस्थेचे वारे वाहू लागले. आर्थिक सुधारणा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या. आर्थिक बदलातून जातीय व्यवस्थेचा डांचा बदलेल हे मार्क्सप्रणीत गृहीतक मात्र भारतात फोल ठरले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतात भांडवली लोकशाही अस्तित्वात आली. इथे जातीव्यवस्थेने नवे पांघरूण धारण केले. राजकारण, समाजकारण अर्थसत्ता, सांकृतिक जीवन या सर्वावर उच्चवर्णीय वा उच्च जातीय समुहातील लोकांचीच मक्तेदारी निर्माण झाली. त्यामुळे आजच्या सामाजिक- सांस्कृतिक जीवनावर जातिव्यवस्थेचा पगडा आहे. त्यामुळेच जातीविरोधी क्रांती अत्यावश्यक आहे.      
मार्क्स आणि इंगल्स यांच्या हयातीतच मार्क्सवादाचे चुकीचे विश्लेषण व अवलोकन व्हायला सुरुवात झाली होती. भारतीय समाजातील शब्द प्रामाण्यातून आलेल्या सुरवातीच्या कम्युनिस्ट नेतृत्वाने देखील वर्गीय विश्लेषण पद्धत कधीही सोडली नाही. मुळातच हे सर्व कम्युनिस्ट नेते जे विचारवंत देखील होते ते उच्च जातीय होते. भारतातील जातीचा व तिच्याद्वारे होणाऱ्या शोषणाचा त्यांनी गांभीर्याने विचार केला नाही, हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यांनी आर्थिक घटकांकडेच जास्त लक्ष दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काम्युनिष्टांच्या या भूमिकेवर १९३६ साली लिहिलेल्या ‘अँनिहीलेशन ऑफ कास्ट’ या न दिलेल्या भाषणात मार्मिकपणे बोट ठेवले आहे. ते लिहितात कि, “भारतातील समाजवादी भारतीय समाज व्यवस्था समजावून घेताना युरोपातील त्यांच्या समविचारी मित्रांनी मांडलेल्या ‘इतिहासाच्या आर्थिक विश्लेषणाचा’ सिद्धांत वापरतात. माणूस हा आर्थिक प्राणी आहे असे त्यांचे म्हणणे आहे. माणसाच्या सर्व कृती आणि आकांक्षा आर्थिक घटनांनी बद्ध असतात. संपत्ती हेच सत्तेचे उगमस्थान आहे असे ते मानीत असल्यामुळे राजकीय आणि सामाजिक सुधारणा हा एक मोठा भ्रम आहे आणि म्हणूनच आर्थिक समतेवर उभ्या असलेल्या सुधारणेवरच बाकी सर्व सुधारणा उभ्या असतात अशी त्यांची शिकवण आहे. मानवी जीवन हे केवळ आर्थिक हेतूने प्रभावित झालेले नसते आणि अर्थसत्ता हीच एकमेव सत्ता असते असेही नाही. तसे असते तर लाखोपती माणसे ज्यांच्याकडे कवडीही नाही अशा साधूंच्या आणि फकिरांच्या मागे का जातात? बनारस आणि मक्का येथील जत्रांत  आपले किडूकमिडूक विकून आलेल्यांची गर्दी का असते? या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत...”[9] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेच्या केलेल्या या मानिसक घटकांबाबत कॉ. शरद पाटील आक्षेप घेताना लिहितात की, “जातिविरोध एकेरी मानल्यामुळे आंबेडकर त्यांच्या ‘‘अनिहीलेशन ऑफ कास्ट’(१९३६) या त्यांच्या श्रेष्ठतम कृतीत जात ही मानसिक मानण्याकडे गेले आहेत.माळींनी क्रांतिकारक म्हणून स्वीकारली आहे. (पान.११३) जात ही व्यक्तिगत असती, तर ती मानसिक म्हणून व्यक्तीपरिवर्तनाचा विषय म्हणून विचारार्ह झाली असती. जातीव्यवस्था ही वर्ग व्यवस्थेप्रमाणे वा वर्ण व्यवस्थेप्रमाणेच उत्पादन संबंध असल्यामुळे भौतिक आहे.”[10] वस्तुत: अनेक संशोधकांच्या आधारे हे सिद्ध झालेले आहे की जात व्यवस्था निव्वळ मानसिक वा भौतिक घटक नाही. ती दोन्ही प्रकारे आपले प्रमाणत्व सिद्ध करते. कॉ. शरद पाटील मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करत ती मानसिक असल्याचे नाकारतात व तिचा उत्पादन संबंधाशी तुलना करत तिला भौतिक ठरवतात. याठिकाणी कॉ. पाटील जातीव्यवस्थेला यांत्रिक ठरवतात. जी चूक आदीच्या मार्क्सवादी विचारवंतानी केली होती.        
                                                                       
             ‘मूलनिवासीवादा’वर आधारित ब्राह्मणविरोधी प्रबोधनाची चळवळ उभी राहते आहे. या चळवळीच्या माध्यमातून प्रखर ब्राम्हण विरोध पसरवला जातो.  कॉ. शरद पाटील आपल्या शोध–मुलनिवासींचा की शूद्रवर्णाचा की जात्यंतक समतेचा?या छोटेखानी पुस्तिकेत त्यांच्या एकूण भूमिकेवरच शंका उपस्थित करतात. सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या चळवळीचा मुख्य उद्देश हा ‘जातिअंत’ असायला हवा असा ते आग्रह धरतात.  शूद्र कोण होते? या शोधाचे उद्दिष्ट शूद्रांच्या गुलामीचे मूळ शोधायचे असायला पाहिजे होते असे मानतात.[11] आंबेडकरांचा शोध आदिम मुलनिवासींचा नव्हता, चातुर्वण्यातील गुलामसदृश शुद्र वर्णाचा होता.[12]  असे कॉ. पाटील मानतात. भारतात क्रांती का होत नाही? या प्रश्नाचा त्यांनी वेध घेतला आणि असे मांडले की, इथले कम्युनिस्ट जातीव्यवस्था समजून घेत नाहीत, तर इथले आंबेडकरवादी वर्गीय शोषणाचा विचार करायला तयार नाहीत म्हणून भारतातील क्रांतीला विलंब होतोय. जाती आणि स्त्रियांच्या गुलामगिरीचा अंत ज्या क्रांतीच्या विषयपत्रिकेत नाहीत, ती क्रांती भारतात होऊ शकत नाही. “जातिपितृसत्तेच्या, ब्राम्हणी प्रभुत्वाच्या ज्ञान विचारसरणीच्या संरचनेविरोधात फुले व आंबेडकर यांनी जाति लिंगभेदमुक्तीचे, समता, स्वातंत्र्याचे अवकाश निर्माण करणारे विरचनात्मक ज्ञान वा मान घडवण्याचा व ते रचण्याचा प्रयत्न केला, असे उमेश बगाडे यांसारख्या अभ्यासकांचे मत आहे.”[13] शरद पाटील यांनी या ब्राह्मणी प्रभुत्वाच्या ज्ञान विचारसरणीच्या संरचनेविरोधात फुले-आंबेडकर यांच्या विरचनात्मक दृष्ठीकोनात मार्क्सवादी तत्त्वज्ञानाची जोड देत ‘मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादाची’ सैद्धांतिक चौकट उभी केली. परंपरागत मार्क्सवादी व फुले-आंबेडकरवादी विचारवंतांसमोर नवा आशय निर्माण करून दिला. जात्यंतक भांडवलवाद लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती खंड-३ (२०००), प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता – स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद खंड- ४ (२०१२), जातीव्यवस्थाक सामंती सेवकत्व खंड-२ (१९९६),  शोध–मुलनिवासींचा की शुद्रवर्णाचा की जात्यंतक समतेचा? (२०१२) या ग्रथांनी जाती, वर्ग व स्त्री दास्याच्या अंताची लोकशाही क्रांतीची नवी कार्यक्रम पत्रिका समोर आणली. नव्या भांडवली समाज व्यवस्थेने वर्ग व जातीच्या लक्षणांनी नवे वळण घेतले आहे. जातीय उतरंडीमध्ये नव मध्यम वर्गीय जाणिवा निर्माण झाल्या आहेत. या जाणिवा आपमतलबी हितसंबंधाना महत्व देतात. त्यामुळे शोषणमुक्त समाज व्यवस्थेसाठी ह्या जात-वर्गीय जाणिवांचा ऱ्हास होण्याची नितांत आवश्यकता आहे. कॉ. शरद पाटील त्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिले.
            ‘जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती आणि तिची समाजवादी पूर्ती’ खंड – ३ (२००३) या ग्रंथात कॉ. शरद पाटील जातिअंताचा कृती कार्यक्रम देताना लिहितात, “भारताची भांडवलदारी लोकशाही क्रांती  वरचढ शेतकरी जात वर्गाकडील वरकड जमिनी ओबीसी, गरीब शेतकरी, दलित व आदिवासी भूमिहीन यांनी ताब्यात घेऊन वाटून घेतल्या पाहिजेत व बनिया भांडवलदार जातवर्गाकडील ज्या खाजगी उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले पाहिजे आणि जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी सजातीय विवाहावर बंदी घालून आंतरजातीय विवाह सक्तीचे केले पाहिजेत.”[14] कॉ. शरद पाटील यांनी जाती अंताचा जो कृतीकार्यक्रम दिला आहे तो एकाचवेळी आशा आणि निराशा व्यक्त करणारा आहे. उच्च जात वर्गाकडील जमिनी वा वरकड मूल्य असलेल्या उद्योगांचे सक्तीने दलित, ओबीसी, आदिवासी, भूमिहीन या लोकांना पुनर्वाटपाचे धोरण एकवेळ स्वीकारता येईल. उद्योगांचे राष्ट्रीयीकरण देखील करता येईल. पण जाती अंतासाठी सक्तीने आंतरजातीय विवाह करणे हे लोकशाही मूल्य व्यवस्थेमध्ये बसणारे नाही. किंबहुना असेही म्हणता येईल सक्ती वा बंदी यासारख्या निर्णयावर आधारित समतापूर्ण समाज व्यवस्था आणता येईल काय? अशा सक्तीने उभ्या राहिलेल्या समाज व्यवस्थांचा शेवट वाईटच झाला आहे. शिवाय भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला बहाल केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे  काय? हा ही प्रश्न अनुत्तरीत राहतो. मानसिक परिवर्तनाबाबत कॉ. शरद पाटील आग्रही का राहिले नाहीत? हे एक कोडेच आहे. असे असले तरीही कॉ. शरद पाटील यांचे वैचारिक साहित्यातील स्थान वादातीत आहे. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मूलतत्त्ववादी विचारसरणी जोपासली जात आहे. धर्म, धार्मिकता आणि धर्माधतेच्या भावना टोकदार केल्या जात आहे. प्रत्येक जातीय समूह जातीय अस्मिता कुरवाळत आपणच श्रेष्ठतम असल्याचा फुकाचा अभिमान बाळगून जगत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉ. शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची मीमांसा आपणास निश्चितच पथदर्शक ठरणारी आहे.     



संदर्भ :
[1]  कॉ.शरद पाटील, रामायण – महाभारतातील वर्ण संघर्ष, पृ. २९.
[2] कॉ. शरद पाटील, ‘दास शुद्रांची गुलामगिरी, लेखकाचे मनोगत, मावळाई प्रकाशन, दुसरी आवृत्ती, २००८,  पृ.५.
[3] सचिन माळी, एकाकी आणि लोकाकी प्रज्ञासूर्य कॉ. शरद पाटील’ सुगावा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, १५ ऑगस्ट, २०१४, पृ. २६.   
[4] सचिन माळी, एकाकी आणि लोकाकी प्रज्ञासूर्य कॉ. शरद पाटील’ सुगावा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, १५ ऑगस्ट, २०१४, पृ. २७.    
[5] कॉ. शरद पाटील, ‘दास शुद्रांची गुलामगिरी, खंड – १ भाग – १, मावळाई प्रकाशन, दुसरी आवृत्ती, २००८,  पृ.६.
[6] प्रा.सचिन गरुड, लेख- ‘कॉ. शरद पाटील यांचे योगदान : अन्वयार्थ आणि चिकित्सा, पुरोगामी सत्यशोधक, कॉ. शरद पाटील विशेषांक, जाने.-फेब्रु.-मार्च, २०१५, पृ. १४.  
[7] प्रा. सचिन गरुड, पृ. १४.  
[8]  इनायत परदेशी, ‘जातीव्यवस्थाक सामंती सेवकत्व : एक परामर्श, पुरोगामी सत्यशोधक, कॉ. शरद पाटील   
     विशेषांक, जाने.-फेब्रु.-मार्च, २०१५, पृ. ५५.
[9] डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ‘अनिहीलेशन ऑफ कास्ट’, १९३६, पृ.
[10] शरद पाटील यांचा ‘परिवर्तनाचा वाटसरू’ दि.१६ ते ३१ मे २०१३ मधील ‘शितल –सचिनचा जहाल समाजवाद गुन्हा की जातिव्यवस्थाक विषमतावाद गुन्हा’ हा लेख पृ. ५९
[11]  कॉ. शरद पाटील, ‘शोध – मुलनिवासींचा की शुद्रवर्णाचा की जात्यंतक समतेचा?’, मावळाई प्रकाशन, पुणे,
     द्वितीय आवृत्ती, फेब्रुवारी, २०१२, पृ. ६.  
[12]  कॉ. शरद पाटील, पृ. २
[13] प्रा. सचिन गरुड,पृ. १७.
[14]  कॉ. शरद पाटील, ‘. जात्यंतक भांडवलवाद लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती – खंड – ३ ,’ सुगावा
     प्रकाशन, आवृत्ती पहिली, नोव्हेंबर, २००३, पृ. १४४.   

No comments:

Post a Comment