Thursday, April 23, 2020

२३ एप्रिल - जागतिक पुस्तक दिन..


२३ एप्रिल...
         आज ‘जागतिक पुस्तक दिन’ आहे ते संध्याकाळी फेसबुक बघत असताना समजलं. हा दिन कधीपासून आणि का साजरा करतात हे जाणून घेण्यासाठी गुगल सर्च केल्यावर समजले की, जागतिक पुस्तक दिन हा १९९५ पासून साजरा केला जातो. लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा त्यामागे मुख्य उद्देश होता. मग २३ एप्रिल का? विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले. आणि तेव्हापासून हा २३ एप्रिल हा दिवस ‘‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो.  
            गेल्या १०-१५ वर्षात पुस्तकाचं व्हर्चुअल रूप निर्माण झाल्याने ‘Online’ वाचणाऱ्याची संख्या देखील मोठी आहे. मला मुख्यत: पुस्तकाची हार्डकॉपी वाचायला आवडते. पण गेल्या दोन-तीन वर्षात ब्लॉग अथवा फेसबुकवरील माहित नसलेल्या आणि प्रसिद्ध व्यक्तींचे अनेक लेख वाचायला मिळाले. ज्यांना आपले साहित्य पुस्तकरुपानं प्रकाशित करता येत नाही त्यांना हा व्हर्चुअल प्लटफॉर्म उपयोगी पडला. याचा फायदा जसा लिहणाऱ्याना मिळाला तसा तो वाचकांना देखील मिळाला. आता हेच बघा! ‘जागतिक पुस्तक दिना’च्या शुभेच्छा देखील याच नव्या व्हर्चुअल प्लटफॉर्मवर देतोय. शेवटी काय भावनांचं आदान-प्रदान झालं पाहिजे.
            एखाद्या व्यक्तीचं पुस्तक प्रेम किंवा वेड किती असू शकतं हे आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने नेहमी ऐकत आलोय. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी त्यांनी घर बांधलं. ‘राजगृह’ त्यांच नाव. बाबासाहेब लंडनहून जेव्हा आपल्या शिक्षणाचा कालावधी संपवून परतत होते त्यावेळी आपली जवळपास 300 पुस्तके त्यांनी ‘Thomas Cook and Sons’ या कंपनीकडून भारतात आणण्यासाठी पाठवली होती. पण या कंपनीने ज्या बोटीतून ही पुस्तके पाठवली होती त्या बोटीवर शत्रूंनी हल्ला केल्याने ती पुस्तके समुद्रात बुडाली. या गोष्टीचे त्यांना खूप वाईट होते. त्यांना अपघाती विमा मिळाला होता. पण त्या पैशापेक्षा पुस्तकं पाण्यात बुडाली याचं खूप दु:ख झालं होतं. बाबासाहेब जेव्हा दुसऱ्या वेळेस लंडनला आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेले त्यावेळी त्यांनी जवळपास 800 पुस्तके खरेदी केली होती. जेव्हा त्यांची ही पुस्तके भारतात आली त्यावेळी आपल्या दामोदर हॉलमधील ऑफिसमध्ये मावणार नाहीत म्हणून हॉलच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीत तळमजल्याची खोली घेतली. १५ लाकडी कपाटे तयार करून घेऊन त्यावर पुस्तके विषयावर लावून ठेवली. बसण्याची बैठक, लिहायचे टेबल, पुस्तकांची कपाटे यांची ठिकाणे महिन्या–दोन-महिन्यांनी बदलण्याचा बाबासाहेबांना छंद होता. लिहित असताना एकादा नवा संदर्भ हवा असेल आणि त्या संदर्भाचे कपाटातील पुस्तक मिळाले नाही तर ते तडक आहे त्या स्थितीत पुस्तकाच्या दुकानात जाऊन ते पुस्तक घेत. त्यामुळेच त्यांच्या ग्रंथालयात एकाच पुस्तकाच्या दोन-दोन, तीन-तीन प्रती असल्याची नोंद त्यांचे आद्य चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांनी केली आहे.
            पुस्तकावर जीवापाड प्रेम करणारी मला भेटलेली दुसरी व्यक्ती म्हणजे माझे महाविद्यालयीन गुरुवर्य आणि पीएच. डी. संशोधनाचे मार्गदर्शक जेष्ठ इतिहास संशोधक आदरणीय डॉ. रमेश जाधव. सरांचा वाचण्याचा व्यासंग दांडगा. जवळपास दहा हजारांच्यावर वर समृध्द अशी ग्रंथ संपदा. आणि केव्हाही घरी गेलो तर नेहमी वाचनात मग्न. बुद्धिमान आणि व्यासंगी असूनही बोलण्यात जराही अभिनिवेश नाही. प्रसिद्धीचा मोह नाही. ‘अतिशय नम्रपणा’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठळक पैलू. तो तर मी कॉलेजमध्ये असल्यापासून अनुभवलाय. मी एखादे पुस्तक वाचल्यावर त्यातील मला आवडलेला किंवा एखादी घटना सरांना सांगितली तर लगेच ते पुस्तक काढून त्या त्यातील मी सांगितलेला संदर्भ सरांनी दाखविलेला आहे. असे प्रसंग अनेकदा घडले आहेत. माझ्या दिशा समृद्ध करण्यात सरांचे मोठे योगदान आहे. आपली अनेक पुस्तके सरांना मला वर्गात आणून वाचायला दिली होती. शिवाय महाविद्यालयाच्या (न्यू कॉलेज, कोल्हापूर) ग्रंथालयात आपल्या नावावर कितीही पुस्तके घेण्याची मुभा ग्रंथपाल यांना सांगून मला दिली होती. सरांशी अनेक विषयावर बोलत असताना धनंजय कीर, य.दि.फडके, डॉ. विलास संगवे, रां.चि.ढेरे महाराष्ट्रातील अनेक प्रसिध्द साहित्यिक आणि विचारवंत यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल व साहित्याबद्ल माहिती मिळाली. त्यामुळे अनेक दुर्लक्षित पैलू समजून घेता आले. अशा प्रतिभावान व्यक्तिंचे मार्गदर्शन आणि सहवास लाभणे हेच मोठे भाग्याचे आहे. त्यांच्यामुळेच मी समृद्ध झालो. सरांमुळचे पुस्तके विकत घेण्याचा छंद लागला.  
            जागतिक पुस्तक दिन पुस्तक वाचूनच खऱ्या अर्थाने साजरा होऊ शकतो. आज सकाळी दि. के. बेडेकर यांचं ‘धर्मचिंतन’ हे पुस्तक पुन्हा एकदा चाळत होतो. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिलेल्या आठ-दहा ओळी मी जेव्हा-जेव्हा वाचतो तेव्हा-तेव्हा मला विचार करायाला प्रवृत्त करतात. त्या ओळी अशा...   
            ‘धर्म म्हणजे निव्वळ नैतिकता नाही. तसे असते तर नव्याण्णव टक्के माणसे धार्मिक असतात व तरी अनीती एवढी पसरलेली आहे, असे झाले नसते. ‘धर्म’ म्हणजे निव्वळ आध्यात्मिक विचार व साधना नाही. तसे असते तर सगळी धार्मिक माणसे आध्यात्मिक झाली असती; तसे दिसत नाही. धर्म म्हणजे निव्वळ समाजधारणेचे नियम नाहीत, समाजसेवेची स्फूर्ती व क्रिया नाही. तसे असते तर धार्मिक व्यक्तींनी व माणसांनी गजबजलेले समाज हिंस्त्र अन्यायांनी, संघर्षानी व संकटांनी ग्रस्त दिसले नसते.
            जेव्हा धर्माच्या ‘दास्या’चा प्रश्न आपण विचारात घेतो तेव्हा धर्माचे नैतिक, अध्यात्मिक व समाजसेवेला प्रवृत्त करणारे गुण आपण विचारात घेतो व त्यांचे वर्तमानातले व इतिहासातले अस्तित्व मान्य करतो, परंतु ते गुणच तेवढे न पाहता, धर्माचे अवगुण किंवा दोषही लक्षात घेतो. या दोषांमुळे धर्म ही भावना आणि प्रत्यक्ष संस्था, माणसांच्या मनाला दास बनवतात. माणसांना आग्रही, अहंकारी व प्रसंगी क्रूर बनवतात. या वास्तवाची आपण दखल घेतो. तशी दखल घेणे जरूरच आहे. ती दखल न घेणे हे भाबडेपणाचे तरी आहे किंवा दांभिकपणाचे आहे. धर्माच्या फक्त गुणांचा गौरव करणे म्हणजे धर्मदास्याचे वास्तव नाकारणे, वर्तमानात व इतिहासात घडलेल्या धर्मप्रेरित क्रूरतेला विसरणे होईल. हा विसर धर्मगौरवाच्या अभिनिवेशाने किंवा स्वार्थामुळे माणसांना पडतो. म्हणून धर्माच्या दोषांवर, धर्म भावनेचा अफुसारखा परिणाम होतो या धडधडीत सत्यावर भर देणे काही संदर्भात भाग पडते.”
जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!!   

1 comment:

  1. सर खूपच छान लेख, तुमच्या उपक्रमामुळे मला व्यक्तिशः प्रेरणा मिळाली

    ReplyDelete