Friday, April 23, 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथालय

....जागतिक पुस्तक दिनानिमित्त....
❤📖पुस्तकप्रेमी बाबासाहेब📖❤
बाबासाहेबंशिवाय पुस्तकांचे महत्व जाणणारा या भूमीवर जन्माला न्हवता आणि कदाचित जन्मणार देखील नाही.

बाबासाहेब म्हणत, "अडाणी आई बापाच्या पोटी जन्म घेऊन जर आपण पदवीधर झालात, तर त्याचा दुराभिमान बाळगू नका, आपल्या कर्तुत्वाची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा व अधिकाधिक पुढच्या पायऱ्या गाठा....!!! बाबासाहेबंशिवाय पुस्तकांचे महत्व जाणणारा या भूमीवर जन्माला न्हवता आणि कदाचित जन्मणार देखील नाही.
इतिहासाची पाने चाळताना आपण बऱ्याच गोष्टी पाहतो, जॉर्ज पंपन च्या स्वागतासाठी कोणी मुंबईत "गेट-वे ऑफ इंडिया" बांधले शहजाहने आपल्या प्रिय पत्नी मुमताज हिच्या साठी "ताजमहाल" बांधले, राजे महाराजे यांनी विस्तीर्ण वैशिष्ठपूर्ण राजवाडे, शिश महाल, राजमहाल, सोनेरी महाल, तर कुणी मंदिरे मस्जीदी बांधल्या, कोणी सोन्याच्या विटांनी तर कोणी हिरे मानिकांनी मढवलेले सुवर्ण मंदिर अशी कित्येक सुंदर कालाकृत्या बांधल्या, परंतु पुस्तकांसाठी घर बांधण्याचे स्वप्न, पहिले आणि शेवटचे एकाच व्यक्तीने बाळगले, ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. माणूस स्वत:ला राहण्यासाठी घर बांधतो, मात्र ग्रंथांना जीव की प्राण मानणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आवडत्या ग्रंथांसाठी स्वत:चे राजगृह बांधले, पुस्तकांसाठी घर बांधणे हे केवळ त्यांच्या आयुष्यातील निव्वळ स्वप्न न्हवते तर त्यांच्या आयुष्यातला तो एक मोठा संकल्प होता.
बालपणापासून अस्पृश्य समाजातील इतर आपल्या समाज बांधवांसह जो अन्याय अत्याचार प्रचंड मानहानी त्यांनी सोसली, त्यामुळे व्यथित झालेल्या बाबासाहेबांनी विचार केला कि, "हे माझ्यावर अत्याचार केवळ माझ्यापुरतेच मर्यादित नाहीत तर ते सर्वच बांधवांवर होत आहेत. त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आपण स्वत मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या पूर्ण समर्थ असणे अत्यंत आवश्यक आहे." यासाठी ज्ञानप्राप्ती करून घेणे गरजेचे आहे, या विचारातून त्यांच्या मनात जिद्द निर्माण झाली आणि ज्ञानप्राप्ती साठी "पुस्तकभांडार" असणे त्यांना आवश्यक वाटत होते,
बाबासाहेबांची सुरवातीचे दिवस अत्यंत कठीण परीस्थित गेले, समाजाच्या हितासाठी त्यांनी वकिली सुरु केली, एक हुशार वकील म्हणून त्यांची ख्याती चोहीकडे पसरली होती, एक प्रसंग सांगावासा वाटतो... एकदा गेमे वाडीच्या महाराची जमीन ऐंशी वर्षे दुसऱ्याच्या ताब्यात होती. ती बाबासाहेबांनी सोडवून दिली, त्यांनी साहेबाना फी दिली. बाबासाहेबांनी घरी येवून धोतराच्या सोग्यातील सारे रुपये रमाई च्या पुढे ओतले, आणि म्हणाले,
"हे घे पैसे, मी संसारात लक्ष घालत नाही,बायको मुलांकडे लक्ष देत नाही, असा सारखी माझ्यावर ओरडत असतेस, हे पैसे मोजून किती ते सांग...!
रमाई ने पैसे गोळा केले आणि वीस वीसच्या चवडी आणि दोन दहाच्या अन एक एकची चवड आहे असे सांगितले...बाबासाहेब म्हणाले... "आग पण ते किती ?,
रमाई म्हणाल्या...."मी अडाणी हाय.....या सगळ्या रुपयाला किती म्हणतात ते तुमालाच ठावूक..!"
तेव्हा बाबासाहेब म्हणाले..."तू अडाणी आहेस ते बरे झाले नाहीतर बॅरिस्टर होऊन मला चांगल हैराण केलं असतंस..!"
त्यावर रमाई म्हणाल्या, " मी ब्यारीस्टरच हाय....., "तुम्हाला एवढ बी काळात नाही.....बॅरिस्टर ची बायको बॅरिस्टरच कि" त्यावर दोघेही खो खो हसले...
बाबासाहेबांची आर्थिक स्थिती सुधारली ती १९३० सालानंतर, त्यांनी मुंबईत दोन इमारत बांधायचे ठरविले, एक राहण्यासाठी आणि दुसरी पुस्तकांसाठी..त्यांच्या ग्रंथ संपादांसाठी म्हणून त्यांनी दादर हिंदू कॉलनी येथे ९९ व १२९ क्रमांकाचे प्रत्येकी ५५ चौरस यार्ड क्षेत्रफळाचे दोन प्लॉट खरेदी केले. दोन्ही प्लॉट चे भूमिपूजन १९३० सप्टेंबर महिन्यात झाले. ९९ क्रमांकाचे प्लॉटवरील इमारतीस "चारमिनार" तर १२९ क्रमांकाच्या प्लॉट वरील इमारतीस सिद्धार्थ गौतमाच्या राजमहालाचे नाव "राजगृह" असे नाव दिले. इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम १९३१ च्या जानेवारी महिन्यात सुरु होऊन ते सन १९३३ मध्ये पूर्ण झाले. बांधकामावर देखरेख करण्याचे कामास श्री. आईसकर यांना नेमले होते. बाबासाहेब हे स्वत ज्ञानपिपासू असल्यामुळे त्यांची ज्ञान ची भूक मोठी होती, त्यांची विद्यासंपन्न करण्याची अभिलाषा महान होती, त्यांची शिक्षण घेण्याची दुर्दम्म इच्छाशक्ती अपार होती. त्यांचे शिक्षणा विषयी आधुनिक व उदार मतवादी दृष्टीकोन या संबंधी जगभरातील विद्वानांमध्ये कुतूहल होते, आजही आहे.  इंग्लिश लेखक थॉम्पसन म्हणतो की,"डॉ. आंबेडकरांचे जे जे साहित्य दृष्टीस पडेल ते ते वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डॉ. आंबेडकरांमुळे सनातनी प्रवृत्तींना वेडाचे झटके येतात."
डॉ.  बाबासाहेबांनी परदेशी आपला विद्याभ्यास मोठ्या जिद्दीने पूर्ण केला. बाबासाहेब भारतात परत येताना त्यांनी काही ग्रंथ भारतात पाठविण्यासाठी एका जहाज कंपनीला दिले होते. ते जहाज भारतात येताना काही प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याने जहाजातील काही ग्रंथ समुद्रात पडले, हे जेव्हा बाबासाहेबांना कळले तेव्हा ते फार दुखी झाले होते.  मायदेशी परतल्यावर बाबासाहेब अभ्यासात गुंतून जात, एकदा वाचायला लागले कि पुस्तकामध्ये अगदी गढून जात, अन्न पाणी सर्व काही विसरून जात, त्यांच्या अभ्यासाच्या मध्ये कोणी आलले त्यांना खपत नसे ते लगेच रागवत, परदेशातून आल्यावर परदेशातील वाचनालायासारखे आपले स्वताचे एक भव्य दिव्य वाचनालय असावे असे त्यांना नेहमी वाटे। ..
त्यामुळे त्या दृष्टीने ते प्रयत्नशील होते, स्वताच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण एक सुवर्ण संधी समजून ती सत्कारणी लागावी म्हणून बाबासाहेब नेहमी झटत.
बाबासाहेबांसारखा ज्ञान साधनेसाठी धडपडणारा हा ज्ञानमहर्षी स्वतचे ग्रंथालय कश्या प्रकारे ठेवीत असेल याची कल्पना करावी. ग्रंथांसाठी घर बांधताना त्यांनी त्या संम्बंधी पुरेपूर अभ्यास केला होता. त्यांना हवे असणारे ग्रंध क्षणार्धात मिळाले पाहिजेत, अश्या पद्धतीने त्यांनी ग्रंथालयाची बांधणी केली.
ग्रंथालयाची मांडणी त्यांनी न्यूयार्क मधील ग्रंथालायासारखीच केली तर मोठमोठ्या इमारती सारख्या खिडक्या, रोमन पद्धतीचे भव्य असे उत्तुंग खांब, भरपूर प्रकाश येईल अश्या विशिष्ट अंतराच्या खिडक्या, मोकळी जागा, भिंतींमध्ये बांधलेला सज्जाचा माळा, हि पुत्कांसाठी बांधलेल्या राजगृहाची वैशिष्टे पाहताना रोम,नुयार्क, इंग्लंड,अमेरिका, या देशांमधील जगप्रसिद्ध वाचनालयातील उत्तर ग्रंथांचे प्रतिबिंब आतमध्ये उमटलेले दिसते.  बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राजगृह दादर येथी हिंदू कॉलनीत दिमाखाने उभे होते. त्या कॉलनीत साहित्यिक, डॉक्टर, इंजिनियर, वकील, राजकारणी, मोठ मोठे व्यापारी देखील राहत होते, परंतु रत्नजडीत हिऱ्याच्या कोंदणात "कोहिनूर" जसा चकचकवा तसे बाबासाहेबांचे "राजगृह" चमकत होते. बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम जगविख्यात आहे, देश विदेशातील नानाविविध ग्रंथालयांना भेटी देवून, नाव नवीन ग्रंथ मागवून त्यांनी आपल्या संग्रही ठेवले. बाबासाहेब जेवढे प्रेम इंग्रजी पुस्तकांवर करत तेवढेच ते मराठी पुस्तकांवर देखील करत. परदेशात असताना ते आवडीने मराठी ग्रंथ मागवून त्याचे वाचन करीत व त्यावर टिप्पणी हि करत, बाबासाहेबांच्या या ग्रंथ प्रेमामुळे बाबासाहेबांचे विचारांचे सामर्थ अत्यंत बळकट असे झाले होते. मराठी व इंग्रजी पुस्तकाबरोबर राजगृहामध्ये गुजराथी, उर्दू फ्रेंच जर्मन, पारशी ग्रंथ असे सर्व मिळून ५०,००० च्या जवळपास राजगृहामध्ये ठासून भरलेले आहेत. या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने राजकारणावर ३०००, इतिहासावर २६००, कायद्यावर आधारित ५०००, धर्मशास्त्रावर २०००, चरित्रे १२००, इतर साहित्य ३०००, अर्थशास्त्र १०००, तत्व ज्ञान ६०००, युद्धशास्त्र ३००० व इतर ७९०० असा आकडा होतो.
या वर्गीकरणावरून त्यावेळी क्रमांकासह लेबल लावून ग्रंथ रचून ठेवलेले आहेत. राजगृहाच्या या ग्रंथालयामध्ये त्यांच्या गैऱ्हाजेरीमध्ये कोणासही जाण्याची मुभा न्हवती. राजगृहाच्या दाराशी त्यांचा कुत्रा पीटर हा बाबासाहेबांच्या ग्रंथालयाची राखण करीत असे. एवढ्या प्रचंड ग्रंथ भांडारामध्ये कोणतेही पुस्तक हवे असल्यास त्यांना अचूक मिळत असे, इंग्लंडच्या ठक्कर कंपनीतून त्यांनी त्यासाठी खास ग्रंथालय कार्डे बनवून घेतली होती व श.शा.रेगे यांच्याकडे ती जबाबदारी सोपवून ती यादी पूर्ण करून घेतली होती.
राजगृहाचे काम पूर्ण होताच बाबासाहेबांनी प्रथम आपल्या लाडक्या रामुस, रमाईस राजगृहामध्ये आणले होते. राजगृह उभा राहिल्या नंतर  बाबासाहेबांनी डबक चाळीतील सर्वाना आमंत्रित केले होते. तेव्हा राजगृहात प्रवेश करताना रमाई सांगत "साहेबांच्या कष्टातून आम्ही हिंदू कॉलनी परिसरात "राजगृह" नामक एक नवीन आणि लेखणी, टोलेजंग वास्तू उभी केली.हे घर नसून एखाद्या महान पंडिताच भव्य - दिव्य ग्रंथ भांडार वाटत.....!" बाबासाहेबांचे गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी म्याट्रिक पास झाल्यानंतर त्यांना भेट दिलेले "बुद्धचारित्र" ह्या ग्रंथाने पुत्कांची सुरुवात करून "बुद्ध आणि त्यांचा धम्म" असे कित्येक ग्रंथ बाबासाहेबांनी याच राजगृहातील ग्रंथालयात आणला, "भारतीय संविधान", "बुद्ध आणि त्यांचा धम्म" असे कित्येक ग्रंथ बाबासाहेबांनी लिहल्याचा हा "राजगृह" साक्षी आहे. आज हि बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेले "राजगृह" त्यातील ग्रंथासह बाबासाहेबांची आतुरतेने वाट पाहत आहे...कारण बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी घर बांधले होते..."पुस्तकांसाठी घर बांधणारे" बाबासाहेब हे जगातील एकमेव व्यक्ती ठरले....!

कोराना काळाचा वेदनामय अनुभव देणारी ‘क्वारंटाईन’ - डॉ. अविनाश वर्धन

#जागतिक_पुस्तक_दिनाच्या_निमित्ताने_एका_पुस्तकाचा_परिचय 

 कोराना काळाचा वेदनामय अनुभव देणारी #क्वारंटाईन’

  सन २०२०. भय, अगतिकता, संताप, गूढता, मानसिक तणाव,  हुरहूर या आणि अशा अनेक प्रकारच्या भावनांनी विचलित करत निघून गेलं. याच दरम्यान कोरोना, लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंग, कर्फ्यू, संचारबंदी, जमावबंदी, आणि क्वारंटाईन या संकल्पनांनी मानवी जीवन प्रभावित केलं. कोरोनाच्या जागतिक महामारीने आख्खं जग कळ दाबून थांबावावं, तसं थांबलं! याचा समाजातील सर्वच घटकांवर प्रत्यक्ष-प्रत्यक्षपणे परिणाम पडला. केवळ सर्वसामान्य माणसांचेच नाही तर देशांचे आर्थिक जीवन विस्कळीत झाले. या विस्कळीत झालेल्या समाज जीवनाचा संवेदनशील माणसांवर आघातकारी परिणाम झाला. अनेक लोकांनी आपल्या भावना लेख, कविता, कथा अथवा कादंबरीच्या माध्यमातून रीत्या केल्या. 

  डॉ. आनंद बल्लाळ त्यापैकीच एक संवेदनशील व्यक्तिमत्व. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लागलेल्या लॉकडाउनच्या झळा त्यांच्या संवेदनशील मनाला लागल्या. त्याचीच प्रचीती ‘क्वारंटाईन’ ही लघुकादंबरी देते.  त्यांची कोरोनाच्या महामारीनंतर लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात वास्तवाचा ठाव घेणारी लघुकादंबरी यशोदीप पब्लिकेशन, पुणे यांनी नुकतीच प्रकाशित केली आहे. 

  आनंद पवार. वय वर्ष बत्तीस. ग्रामीण भागात शिकून नोकरीनिमित्त मुंबईत गेलेल्या युवकाची कथा. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शिकलेल्या मुलांनी शिकून कामधंदा करावा आणि आपलं सरळमार्गी जीवन जगावं. याच पठडीतील आनंद. आपले काम आणि आपले जीवन यामध्येच रमणारा. लॉकडाऊन झाल्यानंतर मात्र त्याच्या सरळमार्गी जीवनात व बाह्य जगामध्ये अनेक उलथापालथी घडतात. त्याची सूक्ष्म वास्तव मांडणी प्रस्तुत कादंबरी करते. आधुनिक तंत्रज्ञान आणि बौद्धिक कौशल्याच्या जोरावर प्रगतीच्या गप्पा मारणाऱ्या मानव जातीला कोरोनानं क्षणार्धात कसं जमिनीवर आणले याचे दर्शन ही कादंबरी देते. मानवी जीवन किती क्षणभंगुर आहे याचे प्रतिकात्मक चित्रण अनेक प्रसंगांच्या माध्यमातून लेखकाने मार्मिकपणे टिपले आहे. नाग-नागिन  प्रेमछायेत विसावल्याच्या प्रसंगात तर अवघे जीवन दर्शन मांडले आहे.  

          “थोडी पंखांची फडफड झाली अन भुर्रकन एक घार त्याच्यासमोर उडून गेली. काय झालं हे क्षणभर त्याला कळलंच नाही.  त्यानं घार गेली त्या दिशेला पाहिलं तर आभाळात लांबवर त्या घारीची काळी सावली उडत हुती आणि तिच्या पायापाशी काहीतरी लोंबत होतं.” 

लॉकडाऊन लागल्यामुळे वर्षभरानंतर आनंद घरी परतला होता. मात्र तो होम क्वारंटाइन असल्याने एकाकी होता. त्या एकाकी वातावरणात घरासमोर असलेल्या झाडानं त्याचं लक्ष वेधलं होतं.  

“त्यानं पाहिलं, झाडाचं एक पान घिरट्या घीत घीत खाली यीत हुतं. तोच वाऱ्याच्या झोतानं ते भरकटलं. झोकांड्या खात खात आनंदच्या पायाशी यीवून अडखळलं. त्याला त्या पानाची कीव आल्ती. त्यानं ते पान उचललं. जणू त्यो त्या पानाला इचारत हुता, ‘कसं रं तुझं नशीब. झाडावर नाही निदान झाडाच्या पायथ्याशी तरी पडायचास. पण तू झोकांड्या खात इथं माझ्याकडं यीवून पडलास.’ 

यासारख्या, आनंदच्या जीवनात आलेल्या अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांचं मार्मिकपणे दर्शन वाचकाला घडते.  

  रोजगाराच्या निमित्ताने ग्रामीण भागातून मुंबईत आलेल्या तरुणांची परवड कशी होते याची जाणीव अनेक घटना प्रसंगातून लेखक घडवतो. नागरीकरण व आधुनिकीकरणामुळे शहरं गजबजली. सजली. तथाकथित विकास दृश्य रूपात दिसायला लागला. पण हा विकास ज्यांच्या कष्टावर, घामावर उभा राहतो त्या लोकांच्या जीवनातील संघर्ष आनंदच्या माध्यमातून लेखकाने मांडला आहे. खऱ्या अर्थानं शहराची दुसरी दुखरी बाजू समोर आणली आहे. गाववाल्यांच्या खोल्यातील जीवन तर मन हेलावून टाकतं. 

   तसं पाहिलं तर ‘हिंदू-मुस्लिम संघर्ष’ हा भारतीय समाजाला काही नवीन नाही. मात्र कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळातही धर्म द्वेष बाळगणाऱ्या लोकांनी ‘तबलीगी’ जमातीच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाला टार्गेट करण्याचे सोडले नाही. त्यामुळे निर्माण झालेले भय गावपातळीपर्यत कसं पोहचले हे ‘सम्या’च्या रूपाने अंतर्मुख करायला लावते.  

“काय रे सम्या, काय गावची हाल?’ ‘

हालहवाल क्या अंदा, सध्या ल्हायी टाईत हुयाय. वर परसूके ओ निजामुद्दीन प्रकरण  की वजेशी हमे सारे मुसलमाना इस देश के दुश्मन हुई बाबा.”     

सम्या पुढे बोलत रहातो, 

“आंदा, इत्ता कोरोना के वक्त ओ एक हुये, यो चुक्या. खरा एक चुकिकी सजा तुमी सब मुसलमानां को देतेयी? यों तुम्हारा चुकता देख. आरे तुम्ही लोकां नई क्या अलग अलग त्योहार मनाते? हामी तुम्हारे बरबर रेहते तो. ईद को तुमारे लोकां हमारेकानी आतयी. तू पहिले अताता तो हमारे घरमी शिरखुर्मा पिनी. तुम्ही नई क्या धर्म के कामकु एकत्र आतयी? तो हमी इस्तेमा को अते तो क्या हुआ? हमी तो क्या अलग करतय क्या? हदिस पडना, नमाज पढना, रोजा रखना गुना है क्या? हमिबी हमारे दादा परदादा के जमानेशी इस देश मी है. यो देश हमारा भी है क्या नयी? अरे हमना भी इस देश की काळजी है तो.”

सम्याचे हे कथन वाचकाला हिंदू – मुस्लिम संघर्षाला नव्याने समजून घ्यायला बाध्य करते.  

 आजरा हे तसं प्रमुख शहरापासून लांब असलेले गाव. पण या गावाला समृद्ध करणाऱ्या ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, बाबुराव पेंटर, शाहीर गव्हाणकर, म.ब. बेहरे, के.नी. वाटवे, जे. पी. नाईक, मोरजकर महाराज, अशा महान व्यक्तींची ओझरती ओळख होते. यासोबतच आजऱ्यात राहणाऱ्या तळकोकणातून आलेला वैश्य समाज, मुस्लिम राजवटीत आलेला मुस्लिम समाज, गोव्यातून आलेला ख्रिश्चन समाज, शेती करणारा कुणबी समाज तसेच डगे धनगर समाजाची ऐतिहासिक पृष्ठभूमीबरोबरच त्यांच्यातील वर्षानुवर्षे राहिल्याने निर्माण झालेल्या सांस्कृतिक एकोप्याचे दर्शन घडते. या मांडणीने वाचकाला कादंबरीच्या कथानकातील प्रादेशिक मांडणीने इथल्या समाजाची सामाजिक-सांस्कृतिक ओळख होते. 

  लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर प्रशासकीय व वैयक्तिक पातळीवर घडणाऱ्या अनेक घटनांचा आढावा आनंदच्या माध्यमातून प्रस्तुत कादंबरी घेते. हजारो लाखो लोकांना आलेले हे अनुभव अत्यंत वेदनादायी आहेत. मुंबई, पुणे अशा महानगरामध्ये रोजगारासाठी आलेल्या बाहेर राज्यांतून आलेल्या लोकांचे जाताना झालेली दयनीय अवस्था आख्या देशाने पाहिली आहे. त्या सर्व घटनांची वेदनादायी आठवण कादंबरी देते. आनंद पवारच्या माध्यमातून मुंबईहून गावाकडे परतलेल्या प्रत्येक व्यक्तीला शासकीय यंत्रणेसोबतच त्यांच्याच गावकऱ्यांशी सामना करावा लागला याचा वस्तुपाठच मांडला आहे. मेडिकल सर्टिफिकेट, होम क्वारंटाईन, स्वब तपासणी, रिपोर्ट येईपर्यतची घालमेल याचे नेमके चित्रण केल्याने वाचकाची अस्वस्थता आणि उत्कटता उत्तरोत्तर वाढत जाते. 

 गेले वर्षभर संपूर्ण जग कोरोनाशी सामना करतंय. अनेक देशांच्या आर्थिक व्यवस्था कोलमडल्या. हजारो लाखो लोक बेरोजगार झाले. अनेक उद्योग बंद पडले. काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आता भारतात जोमाने कोरोनाचा दुसरा टप्पा पसरतो आहे. सगळीकडे हाहाकार माजतो आहे. आरोग्य यंत्रणा आहोरात्र प्रयत्न करूनही तिच्या मर्यादा स्पष्टपणे दिसत आहेत. लॉकडाऊनला प्रंचंड विरोध होताना दिसतोय. कारण लोकांना जगणं महत्वाचे आहे. घरात बसून उपजीविका कशी करणार हा सर्वांसमोर मोठा प्रश्न आहे. कोरोनानं मरायचं की भुकेनं? तेव्हा कसंही मरायचेच आहे. हाच विचार सार्वत्रिक होताना दिसतो आहे. कारण पोटाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. आनंदला पण हाच पश्न पडला आहे. कंपनीने पाठवलेला मेल वाचताना त्याला समजलं कि, लॉकडाउन वाढल्याने त्याची कंपनी बंद झाली आणि त्यालाही सक्तीची बिनपगारी रजा दिलीय. त्याचक्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. त्यावेळी त्याला चॅर्ली चॅप्लिन वाक्य आठवतं, 
   I Always like walking in the rain 
   So no one can see me crying.  

 अतिशय हृदयस्पर्शी प्रसंगाने कादंबरीचा केलेला शेवट वाचकाच्या मनात ठसतो. कोरोनाच्या काळात आपली संवेदनशीलता जपत निर्माण झालेल्या स्थितीवर डॉ. आनंद बल्लाळ यांनी ‘क्वारंटाइन’च्या माध्यमातून अनेकांच्या वाटयाला आलेल्या प्रसंगाची वास्तववादी मांडणी केली असल्याने ज्यांना प्रसंगांना सामोरे जावे लागले त्यांना हि कादंबरी निश्चितच त्यांची स्वत:ची वाटेल. यातच डॉ. आनंद बल्लाळ यांच्या लेखणीचे यश दडलेलं आहे. पुढील लेखनास त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा..!    
  ************************************               डॉ. अविनाश वर्धन 
मो. ९९६०३०४२५४ 

पुस्तकाचे नाव : ‘क्वारंटाईन’
लेखक : डॉ. आनंद बल्लाळ 
प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे 
पृष्ठे : १२८ 
किंमत : १५०

Friday, April 2, 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय रिझर्व्ह बँक

🔵 रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान...

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे रिजर्व बँकेच्या स्थापनेत संकल्पनेत महत्वपूर्ण योगदान आहे 
परंतु नक्की काय योगदान हे सखोल माहित असणे आवश्यक आहे.
रिजर्व बँक हि एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे जी भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिकनीती वर नियंत्रण ठेवते तसेच भारत सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजना ठरवते. भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण तसेच महत्वाचे निर्णय घेते.
रिजर्व बँक १ एप्रिल १९३५ साली ब्रिटीश राजवटीत स्थापन झाली. स्थापन झालेल्या रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या संकल्पनेत बाबासाहेबांच्या पुस्तकावरआधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्ट चा आधार घेण्यात आला; रिजर्व बँक ऑफ इंडिया हि संपूर्णपणे डॉ बाबासाहेबांच्या विचारावर, आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीतपणे अव्याहत सुरु आहे.
आधी आपण बाबासाहेबांचा अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थ व्यवस्थेवरील अभ्यास जाणून घेऊ
सन १९१५ साली "प्राचीन भारतीय अर्थनीती" (Ancient Indian Commerce)
या प्रबंधासाठी बाबासाहेबांना मास्टर ऑफ आर्ट्स हि पदवी मिळाली, त्यानंतर १९१६
साली त्यांनी " भारताचा राष्ट्रीय लाभांश " (National Divident of India) हा
प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सदर केला जो ८ वर्षांनी पी. एस. किंग अंड सन्स
या कंपनी ने "ब्रिटीश भारतातील प्रांतीय आर्थिक विकास" (the evolution of
provincial finance in british india ) म्हणून प्रसिद्ध केला, बाबासाहेबांनी
या विस्तृत ग्रंथाच्या आवश्यक तितक्या प्रती कोलंबिया विद्यापीठाला सादर केल्या.
विद्यापीठाने अधिकृत पणे doctor of philosophy हा किताब बहाल केला.
सन १९२३ च्या एप्रिल महिन्यात बाबासाहेबांचा अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक
प्रबंध " भारतीय चलनाच्या समस्या " ( the problem the rupee) पूर्ण झाला आणि त्यांनी तो कोलंबिया विद्यापीठात पाठवला आणि ते मान्य होऊन बाबासाहेबांना डॉक्टर ऑफ सायन्स (DSc) हि पदवी बहाल करण्यात आली डॉ. बाबासाहेबांचे सखोल ज्ञान आणि विषय मांडण्याची पद्धत आणि मुद्देसूद लिखाणावर कटाईम्स लंडन आणि इकोनोमिक्स या
वृत्तपत्रांनी भरभरून कौतुक केले होते. भारतीय अर्थ व्यवस्थेचा सखोल अभ्यास, विश्लेषणात्मक आणि मुद्देसूद मांडणी, अभ्यासपूर्ण उपाय योजना, आर्थिक विकासासाठी असलेली दूर दृष्टी बाबासाहेबांच्या या तीनही प्रबंधातून सबंध जगाला दिसून आली.
भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आणि सुधारणा करण्यासाठी १९२४ - २५ मध्ये ब्रिटीश सरकारने "रॉयल समिती" नेमली होती,त्यालाच Hilton Young Commission असेही म्हणतात;या समिती कडून बाबासाहेबांना भारतीय अर्थव्यवस्थेवर बोलण्यास आमंत्रण आले,या समिती मधील प्रत्येक सदस्याच्या हातात "THE PROBLEM OF THE RUPEE" हे बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक होतं बाबासाहेबांना आपला प्रबंध प्रत्येकजन संदर्भ म्हणून घेत आहेत हे पाहून आनंद झाला
बाबासाहेबांनी या समिती समोर भारतीय अर्थव्यवस्था कशी असावी, भारतीय चलनात असलेल्या अडचणी आणि त्यावरील उपाय योजना, बँकिंग कार्यपद्धती कशी असावी, मुद्रा कोणाच्या अधिपत्याखाली असतील, वित्तीय धोरण कसे राबवावे,चलनाचा मानदंड काय असावा. संस्थान खालसा, सामुहिक शेती व्यवसाय आणि आर्थिक धोरण,
जमीन कर, जमीनदारी पद्धती आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम,सोने हे मापदंड मानून चलन व्यवस्थे चे फायदे आणि तोटे मागील ४ दशकांचा आर्थिक आणि राजकीय आढावा, नाणे बंदी केल्याने होणारे फायदे,महागाई आणि चलन समस्या आणि निराकरण या आणि अशा अनेक वित्तीय, आर्थिक धोरणांचा, उपाय योजनांचा सुस्पष्ट आणि सोप्या पद्धतीत मांडणी केली आहे ज्या दीर्घ काळापर्यंत बँक व्यावसायिक,अर्थशास्त्र विद्यार्थी आणि अभ्यासक यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. Read "Statement of
Evidence to the royal Commission On Indian Currency"
१९३५ साली पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटीश राजवटीतील भारतीय अर्थ व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून रिजर्व बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याचे ठरले, जी भारतातील इतर वित्तीय संस्था आणी बँकांवर अंकुश ठेवून कारभार सुरळीत चालू राहील. रिजर्व बँक १९२५ साली भारतात नेमलेल्या रॉयल कमिशन म्हणजेच हिल्टन कमिशन च्या रिपोर्ट आणि तपशिला वरून बनवण्यात आली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या तीनही आर्थिक ग्रंथांचा उपयोग करून तसेच त्यांच्या संकल्पना आणि कामकाजाची पद्धत रिजर्व बँकेच्या स्थापनेचा पाया ठरला. १९४९
साली रिजर्व बँक हि अधिकृत आणि संपूर्णपणे भारत सरकारच्या अंमलाखाली आली.
१९३५ मध्ये जेव्हा रिजर्व बँकेची स्थापना झाली तेव्हा बाबासाहेब सक्रिय राजकारणात सहभागी होते, मोर्चे,आंदोलने पक्ष बांधणी अशी धावपळ सुरु होती 
याच वर्षी बाबासाहेब विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले
याच वर्षी रमाई बाबासाहेबांना सोडून गेली
 याच वर्षी बाबासाहेबांनी येवला नाशिक इथे मोठी सभा घेतली आणि मी हिंदू म्हणून मारणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली आणि याच वर्षी बाबासाहेबांचा दस्तावेज / ग्रंथ मात्र रिजर्व बँकेचा पाया रचण्यासाठी वापरले जात होते.
इतर देशात अर्थ व्यवस्था ढासळत असताना सुद्धा बाबासाहेबांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली वर आज सुद्धा भारतीय रिजर्व बँक आणि भारतीय अर्थव्यवस्था डौलाने उभी आहे.
भारतीय रिजर्व बँक च्या स्थापनेत जरी बाबासाहेब नसले तरी संकल्पना आणि रूपरेषा बाबासाहेबांनी दिलेली आहे...!!!✍🏻
"जय✺भिम" 🙏🏻"नमो✺बुद्धाय"
          "जय संविधान"
           अत्त:दिप:भव 
       !! सर्वांचं मंगल होवो !!
     🙏🏻💙🙏🏻💙🙏🏻💙🙏🏻

#1stApril #RBI #FoundationDay
#Economist #DrBRAmbedkar 
#Father_Of_Modern 
#India #VidyaPomedkar
#ThanksDrAmbedkar 💙

Monday, March 29, 2021

लेख

( रसिक स्पेशल)

*ती "ओप्रा विन्फ्रे' असली म्हणून काय झालं?*

- प्रदीप बिरादर

https://divyamarathi.bhaskar.com/opinion/news/pradeep-biradar-rasik-article-divyamarathi-128367010.html

---------------------------------

अश्वेतवर्णीय महिला असूनही अमेरिकेत ओप्राचं यशस्वी होणं, हा नियम नसून अपवाद आहे. ओप्राच्या यशाची गोष्ट नवउदारमतवादाचं समर्थन करणाऱ्या लिबरल सत्ताधीशांकडून चवीनं चघळली जात असताना याच काळात अमेरिकेतील बहुतांश अश्वेतवर्णीयांच्या हलाखीच्या परिस्थितीत तसूभरही फरक पडलेला नाही, हे सत्यही नाकारता येणार नाही. अर्थात याला काही ओप्रा जबाबदार आहे, अशातला भाग नाही. पण स्वतः यशाची एकेक शिखरं पादाक्रांत करत जाताना या वर्णद्वेषी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्य आणि ठोस राजकीय भूमिका घेणं ओप्रानं सोईस्कररित्या टाळलेलं आहे. 
------------------------

खडतर परिस्थितीवर मात करुन यश मिळवलेल्या माणसांच्या सक्सेस स्टोरींची भुरळ आपल्याला नेहमीच पडत आलेली आहे. मेहनत आणि हुशारीच्या जोरावर असह्य गरिबीतून प्रचंड श्रीमंत आणि यशस्वी झालेल्या माणसांच्या गोष्टी कित्येक कथा, कादंबऱ्या, चित्रपटाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आहेत. नुकत्याच प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांची वादळी मुलाखत घेतलेल्या अमेरिकन टेलिव्हिजन स्टार आणि अब्जाधीश उद्योगपती ओप्रा विन्फ्रे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

अमेरिकेतील सामाजिक उतरंडीत सर्वात खालच्या स्थानी असलेल्या हा कृष्णवर्णीय स्त्रीची कथा अतिशय प्रेरणादायी अशीच आहे, यात शंका नाही. अतिशय गरिबीतील बालपण, वर्णद्धेषाचे बसलेले चटके आणि लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागलेल्या ओप्रा विन्फ्रेची कथा ही अमेरिकन ड्रीमचा चालता बोलता आविष्कार आहे. 

जगातील सर्वात जुन्या लोकशाहीला स्वातंत्र्य आणि समतेचं तत्व बिंववण्यासाठी ओप्रापेक्षा चांगलं उदाहरण मिळू शकत नाही. तुमच्यात जर जिद्द आणि मेहनत करायची तयारी असेल तर तुम्ही कितीही मागास सामाजिक पार्श्वभूमीतून या यश मिळतंच, असा भांडवली व्यवस्थेतील मेरिटच्या तर्काची भलामण कराणारा संदेश ओप्रा विन्फ्रेनं वेळोवेळी दिलेला आहे. 
अमेरिकेकडे किंवा जागतिक भांडवली व्यवस्थेकडेच पाहण्याचे साधारण दोन चष्मे आहेत. एक आहे तो वर उल्लेखलेल्या ओप्रा विन्फ्रेचा. 

वर्णभेद ही आता इतिहासजमा गोष्ट झालेली आहे. आधी वर्णभेद अस्तित्वात होता मात्र आता वर्णभेदासारखी कुठली गोष्ट अमेरिकेत अस्तित्वात नाही, हे जगाला पटवून देण्यासाठी श्वेतवर्णीयांकडून सर्रास ओप्रा विन्फ्रेचं उदाहरण दिलं जातं. गेलाबाजार अमेरिकेत खरंच जर वर्णद्वेष असता तर बराक ओबामासारखी कृष्णवर्णीय व्यक्ती राष्ट्राध्यक्ष बनली असती का? असा सडेतोड सवालही या व्यवस्थेच्या समर्थकांकडून विचारला जातो. ओप्रा विन्फ्रेचा अमेरिकतील आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक पटलावर इतका प्रभाव आहे की त्यासाठी अमेरिकन उद्योगविश्वात 'ओप्रा इफेक्ट' असा नवीन शब्दप्रयोगंच रूजू करण्यात आला. आपल्या संवादकौशल्याच्या बळावर अमेरिकन जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ओप्रानं तिच्या ओप्रा विन्फ्रे बूक क्लबमार्फत कोणत्या पुस्तकाचं कौतुक केलं तर ते पुस्तक अमेरिकेत रातोरात बेस्टसेलर बनून जातं. ओप्रानं जाहीरात केलेलं कोणतंही उत्पादन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रांग लागलेली असते. त्यामुळे जाहिरातदारांमध्ये अजूनही तिला प्रचंड मागणी आहे.


या ओप्रा इफेक्टवरतीच जेनिस पेक या माध्यमतज्ञ महिलेनं 'एज ऑफ ओप्रा - कल्चरल आयकॉन फॉर द निओलिबरल इरा' नावाचं स्वातंत्र पुस्तकच लिहलंय. ओप्रा विन्फ्रेचा माध्यम सम्राट म्हणून झालेला उदय अमेरिकेत आणि जगभरात नवउदारमतवादाच्या झालेल्या उदयाशी समांतर असल्याचं निरीक्षण लेखिका यात नोंदवते. ''या जगात यशस्वी किंवा अयशस्वी होणं याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्या अपयशाची जबाबदारी व्यवस्थेवर ढकलण्यापेक्षा स्वत: स्वतःवर मेहनत करून तुम्ही यशस्वी होऊ शकता,'' असा व्यक्तीकेंद्री नवउदारमतवादी संदेश ओप्रानं जगाला दिला. त्यामुळेच अमेरिकतील लिबरल सत्ताकेंद्रानं तिला डोक्यावर घेतलं. ओप्राचं उदाहरण देऊन वर्णभेद आणि लिंगभेदावर आधारलेल्या या भांडवली व्यवस्थेतील मूलभूत दोषांवर पांघरून घालणं सत्ताधाऱ्यांना शक्य झालं. कृष्णवर्णीय आणि महिला असूनही तुम्ही अमेरिकेन व्यवस्थेत प्रचंड यशस्वी होऊ शकता, हा वास्तवापासून कोसो दूर असलेला स्वप्नाळू संदेश ओप्रानं पसरवला असा आरोपंच लेखिकेनं यात केलाय. जो दुर्दैवानं खरा म्हणावा लागेल.
कृष्णवर्णीय महिला असूनही अमेरिकेत ओप्राचं यशस्वी होणं, हा नियम नसून अपवाद आहे. 

ओप्राच्या यशाची गोष्ट नवउदारमतवादाचं समर्थन करणाऱ्या लिबरल सत्ताधीशांनाडून चवीनं चघळली जात असताना याच काळात अमेरिकेतील बहुतांश अश्वेतवर्णीयांच्या हलाखीच्या परिस्थितीत तसूभरही फरक पडलेला नाही, हे सत्यही नाकारता येणार नाही. अर्थात याला काही ओप्रा जबाबदार आहे, अशातला भाग नाही. पण स्वतः यशाची एकेक शिखरं पादाक्रांत करत जाताना या वर्णद्वेषी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्य आणि ठोस राजकीय भूमिका घेणं ओप्रानं सोईस्कररित्या टाळलेलं आहे. 

वास्तवापासून फारकत घेत मेहनत कराल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता, असाच भावनिक संदेश देत तिनं स्वत:ची कारकीर्द घडवली. वर्णभेदाचं वास्तव नाकारात मेरिटोक्रसीच्या या घातक भांडवली मिथकाबद्दल वर्णद्वेषाविरूद्धच्या लढ्यात आयुष्य दिलेल्या जेम्स बाल्डविन या विचारवंतांनं ५० वर्षांपूर्वीच अतिशय मार्मिक शब्दात चेतावणी देऊन ठेवलेली आहे. "तुम्ही यशस्वी झालात याचा अर्थ व्यवस्थाच न्याय ठरली, असा होत नाही. कुठल्याही व्यवस्थेत हाताच्या बोटांवर मोजता येतील, अशी काही मोजकी लोक  नेहमीच यशस्वी ठरली आहेत. पण त्याने व्यवस्थेतील वर्णभेदाचं आणि असमानतेचं जळजळीत वास्तव बदलता येत नाही. 

स्वतःच्या यशाचा गवगवा करून या अपवादाला नियम सिद्ध करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अशा लोकांपासून आपण नेहमीच सावध राहायला हवं," असं बाल्डविन म्हणायचा.
स्वतःच्या व्यवस्थेतील दोषांवर पांघरुण घालण्यासाठी ओप्रासारख्या अपवादांचा आधार अमेरिकेनं नेहमीच घेतलेला आहे. आपल्या कृष्णवर्णीय शोषित आयडेंटीपासून दूर पळत बहुसंख्यांकवादी गोऱ्यां सत्ताधीशांना सुखावेल, अशी बोटचेपी राजकीय भूमिका घेण्याचा सोईस्कर मार्ग ओप्रासारख्या अनेक यशस्वी लोकांनी अवलंबला.अन्यथा वर्णद्वेषाविरूद्ध ठोस राजकीय भूमिका घेणारा/री कोणतीही व्यक्ती या सत्ताकेंद्राच्या डोळ्यात कायमंच खुपत आलेली आहे. याची परिणीती म्हणून ब्लॅक पॅंथरसह वर्णभेदाविरूद्धच्या चळवळीतील अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या/नेत्यांच्या झालेल्या हत्या याचा ढळढळीत पुरावा आहेत. 

ओबामांबाबतही अमेरिकेनं हीच चुक केली होती. ओबामांचं कृष्णवर्णीय असूनही राष्ट्रध्यक्ष होणं हा अमेरिकेतील वर्णभेदाचा अधिकृत अंत असल्याचा उत्साही निष्कर्ष त्यावेळी अनेक लिबरल राजकीय पंडितांनी काढला होता. पण आपल्या ८ वर्षांच्या कारकीर्दीत माजी राष्ट्राध्यक्षांच्याच पावलांवर पाऊल टाकत ओबामांनी कारभार हाकला. कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष निवडून आल्यानंतरही अमेरिकेतील कृष्णवर्णीयांवर होणारे वांशिक हल्ले, पोलीस बळाचा अतिरेकी वापर, अश्वेतवर्णीयांमधील गरिबीचं प्रमाण यात काहीच फरक पडला नाही. याउलट २००८ च्या वित्तीय आरिष्ट्यातून मार्ग काढण्यासाठी सामान्य नागरिकांना आणि कृष्णवर्णीयांना दिलासा देण्याऐवजी वॉल स्ट्रीटलाच बेल आऊट पॅकेजचा दिलासा देऊन देशातील आर्थिक विषमतेला आणखी बळ देण्याचं काम ओबामांनी केलं. आयडेंटिच्या जोरावर निव्वळ प्रतिनिधित्व देऊन सत्ताधारी वर्गानं आपल्याला हव्या असलेल्याच योजना त्यांच्यामार्फत राबवल्या. 

ओबामांच्या कृष्णवर्णीय चेहऱ्याचा वापर करून या विषमतेवर आधारलेल्या अमानवी व्यवस्थेला खोटं आशादायी मानवी रूप देण्याचा भांडवली सत्तेचा डाव फक्त यामुळे फक्त यशस्वी झाला. ओबामांच्याच कारकीर्दीत १ टक्का विरूद्ध ९९ टक्के हे वर्गलढ्याचं ब्रीदवाक्य घेऊन ऑक्युपाय वॉलस्ट्रीट आणि वर्णभेदाविरूद्धच्या ब्लॅक लाईव्हज मॅटर या दोन्ही चळवळी उदयाला आल्या, ही गोष्ट ओबामांनी अमेरिकेतील कामगारवर्गाचा आणि अश्वेतवर्णीयांचा केलेला भ्रमनिरास सिद्ध करण्यासाठी पुरेशी बोलकी आहे. या भ्रमनिरासाचीच परिणीती म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या उदयाकडे पाहता येईल.


ओप्रा, ओबामासारख्या शोषित समूहांमधून येत यशस्वी झालेल्या व्यक्ती आणि भांडवली व्यवस्थेचं त्यांचा केलेला पुरस्कार हे नेमकं कशाचं द्योतक आहे? याचा मागोवा घेणारं पुस्तकंच अमेरिकेतील आघाडीचं डाव्या विचारांचं मासिक असलेल्या जॅकोबिनच्या संपादक आणि मार्क्सवादी विचारवंत निकोल एश्चॉफ यांनी लिहलंय. 'द न्यू प्रॉफेट्स ऑफ कॅपिटल' या आपल्या पुस्तकात वंचित समूहातून येणाऱ्या पण भांडवली व्यवस्थेचंच समर्थन करणाऱ्या ओप्रा विन्फ्रेसारख्या सेलिब्रिटींवर ताशेरे ओढले आहेत. भांडवली जगातील माणसांची दुःख, अपयश, गरिबी, बेरोजगारी, परात्मभाव अशा समस्यांची उत्तरं व्यवस्थेत न शोधता स्वतःमध्ये शोधून स्वत:च मार्ग काढण्याचा संदेश देणाऱ्या ओप्रासारख्या व्यक्ती शोषणाविरुद्धच्या चळवळीसाठी हानीकारक असल्याचा दावा त्या करतात. 

माध्यमसम्राट म्हणून मिरवणाऱ्या ओप्रानं स्वत:च्या ताकदीचा वापर आपल्या कृष्णवर्णीय आणि स्त्री असल्याची ओळख अधोरेखित करून राजकीय भूमिका घेत चळवळीत योगदान देणं अपेक्षित होतं. पण त्याऐवजी क्षुल्लक व्यक्तीवादी विचारसरणीचा पुरस्कार करणारं व्यक्तिमत्व विकासासाठीचं ओ मॅगझिन त्या चालवत राहिल्या. ओप्रानं स्वतःची मेहनत आणि हुशारीवर आजचं स्थान कमावलेलं आहे, हे सत्य लेखिका नाकारत नाही. पण याचा अर्थ अमेरिकेतील प्रत्येक कृष्णवर्णीय महिला ओप्रासारखी अब्जाधीश होऊ शकते, असाही काढला जाऊ नये‌. 


भांडवली व्यवस्थेत यशस्वी होण्यासाठी आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक भांडवलाची गरज पडते. आणि हे भांडवल कृष्णवर्णीय स्त्री पेक्षा श्वेतवर्णीय पुरूषाकडे कधीही जास्तच हे असेल, हे वास्तव आहे. अमेरिकन लिबर्टी ही समान संधीच्या तत्वावर आधारेली नाही, हे नाकारण्याचा कोडगेपणा कोणीही करू शकत नाही. अशात गरिबी आणि बेरोजगारीच्या व्यवस्थात्मक प्रश्नांवर उत्तर म्हणून ओप्राचा व्यक्तिमत्व विकासाचा सल्ला अतिशय तकलादू आणि आदर्शवादी असल्याचा ती म्हणते.  उदारमतवादाच्या पडद्याआड भांडवलशाहीतील हे नायक/नायिका प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भांडवली विषमता, लिंगभेद, वर्णद्वेषालाच खतपाणी घालतात. उदाहरण म्हणून निकोल यांनी ओप्रा विन्फ्रेसोबतंच बिल गेट्स, शेरिल सॅन्डबर्ग, जॉन मॅकी यांचीही उदाहरणं दिलेली आहेत. 

ओप्रा विन्फ्रेप्रमाणंच बिल गेट्स यांनी आपल्या फाऊंडेशमार्फत देणग्या उभारून गरीब राष्ट्रांसाठी परोपकारी मदतकार्य केलेली आहेत. पण सामान्य जनतेला शिक्षण, आरोग्यासारख्या मूलभूत गरजा पुरवण्याचं काम सरकारचं आहे. करचोरी आणि भांडवलावरील नफा ओरबडून त्यातील थोडा वाटा अफ्रिकेतील मुलांना मोफत शिक्षण आणि लस पुरवण्यासाठी करण्याचं ओप्रा आणि बिल गेट्स यांचं परोपकारी काम प्रत्यक्षात व्यवस्थेचं अपयश झाकायला कामी येतं. अब्जाधीश व्यक्तींनी गरिब कामगारवर्गाला देणगीच्या स्वरूपात मदत केल्यानं सरकारचं उत्तरदायित्व कमी होतं‌. गरिबी, बेरोजगारी, बेघरपणा, भूकबळी, हवामानबदल या जागतिक समस्याचं उत्तर अब्जाधीश भांडवलदार करत असलेल्या मदतकार्यात शोधणं हा मूर्खपणा आहे‌. या समस्यांना जन्म देणाऱ्या व्यवस्थेतील मूलभूत दोषांवर विचार करून ते दूर करण्याचा प्रयत्न करणं, हाच यावरचा एकमेव उपाय आहे. सरकारचं जनतेवरील उत्तरदायित्व वरचेवर कमी करण्याच्या नवउदारमतवादी अजेंड्याला हातभार लावण्यासाठीच अब्जाधीश उद्योगपतींचा हा परोपकराचा खेळ सुरू असल्याचं लेखिका सप्रमाण दाखवून देते. 

ओप्रा विन्फ्रे अमेरिकेतील आघाडीची टीव्ही स्टार बनणं, शेरिल सॅन्डबर्ग ही महिला फेसबुकच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर नियुक्त होणं, अशा प्रातिनिधिक उदाहरणांना महिला सक्षमीकरण समजण्याची चूक कोणी करता कामा नये. 

सॅन्डबर्गसारखी महिला एखाद्या आंतरराष्ट्रीय खासगी कंपनीची सीईओ बनल्यामुळे लिंगभेदाचा प्रश्न सुटेल हा आशावादच मूर्खपणाचा असून अशा प्रातिनिधिक वैयक्तिक यशोगाथेऐवजी कामगारवर्गाचा भाग असलेल्या बहुसंख्याक महिलांना न्याय कसा मिळेल, हे पाहणं महत्वाचं असल्याचं लेखिका पटवून देते. 

ओप्रा विन्फ्रे यांचं कृष्णवर्णीय स्त्री असूनही अब्जाधीश होणं आणि शोषितांच्या शोषणावर व्यवस्थात्मक उत्तर न शोधता भावनिक उमाळे देत राहणं, यामागील कार्यककारणभाव समजून घेणं महत्वाचं आहे. आपल्या संवादकौशल्यांचा वापर करुन पूर्वाश्रयीच्या हलाखीच्या आयुष्याबाबत भावनिक होणाऱ्या ओप्रा आपल्या सर्वांनाच परिचीत आहे. या शोषणव्यवस्थेमागचं मूळ शोधण्याऐवजी व्यक्तीवादी प्रेरणादायी भाषणांचा भावनिक उतारा व एनजीओकरणाचा आसरा घेण्याचा ओप्राचा मार्ग शेवटी शोषक वर्गालाचा बळ देणारा आहे. कुठल्याही व्यवस्थेतील शोषणाचं मेकॅनिझम कसं काम करतं यावर पॉल फ्रेअर यांचं 'पेडॉलॉजी ऑफ द ओप्रेसड' हे गाजलेलं पुस्तक आहे. "सत्ताधारी शोषक वर्ग कधीही संपूर्ण शोषित वर्गाच्या उत्थानासाठी काम करण्याऐवजी शोषित वर्गातील निवडक लोकांना टोकन म्हणून पुढे करून व्यवस्थेतील असमानता कशी मेरिटवर तरलेली आहे, याचं खोटं चित्र उभा करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतो. आणि या शोषणव्यवस्थेचं पुरेसं आकलन न झालेला शोषित समूहातील व्यक्ती त्याच्या संकुचितपणामुळे ही शोषणव्यवस्था बदलण्याऐवजी उद्या मी सुद्धा शोषकवर्गात स्थान मिळवेल, असं स्वप्न उराशी बाळगून असतो‌‌," असं विश्लेषण पॉल फ्रेअर यांनी आपल्या या पुस्तकात मांडलं होतं. 


अमेरिकेतील लिबरल सत्ताकेंद्राची पाठराखण करत आलेली आणि या सत्ताकेंद्राला अडचणीत आणेल अशी कुठलीही राजकीय/वैचारिक भूमिका घेणं कटाक्षानं टाळत आलेली ओप्रा पॉल फ्रेअरच्या 'पेडॉलॉजी ऑफ द ओप्रेसड' ची नायिका म्हणून तंतोतंत लागू होते. ओप्राची यशोगाथा, भावनिक उमाळे आणि परोपकारी मदतकार्याचं अवाजवी कौतुक असणाऱ्या सगळ्यांनीच यातला फोलपणा लक्षात घ्यायला हवा. अमेरिकेतील वर्णद्वेष आणि लिंगभेदावर आधारलेल्या भांडवली शोषणाविरुद्ध प्रामाणिक लढा लढलेल्या सर्वांनाच त्याची किंमत चुकवावी लागली होती आणि आहे. माल्कम एक्स, मार्टिन ल्यूथर किंग पासून ते जेम्स बाल्डविन, ऐंजेला डेव्हिसपर्यंतची उदाहरणं यासाठी पुरेशी आहेत. 

अमेरिकेतील लिबरल सत्ताकेंद्राच्या जवळ राहून अब्जाधीश बनत ही शोषणाविरुद्धची लढाई लढली जाऊ शकत नाही. त्यासाठी या सत्ताकेंद्राशी थेट भिडण्याची आणि त्याची किंमत चुकवण्याची तयारी हवी.  काही दिवसांपूर्वीच प्रिन्स हॅरी आणि मेघनच्या मुलाखतीत ओप्रा त्यांच्यासोबत वर्णभेदाबाबत बोलत असल्याबद्दलचं मीमही सोशल मीडियावर गाजत होतं. तिसऱ्या जगावर साम्राज्यवाद लादून अगणित संपत्ती लूटणारं ब्रिटनचं राजघराणं आणि अमेरिकेतील भांडवली शोषणाच्या बळावर अब्जाधीश बनलेली टीव्ही स्टार यांनी वर्णभेदावर चर्चा करणं हा शुद्ध नाटकीपणा आहे, अशी खिल्ली उडवणारं हे मीम म्हणजे ओप्रा अमेरिकेतील कृष्णवर्णीय आणि महिलांची नव्हे तर भांडवली सत्ताकेंद्राची नायिका आहे हेच सिद्ध करणारं होतं. 
–-----------------------

pradeepbiradar27595@gmail.com

Monday, June 1, 2020

गांधीजी आणि अस्पृश्यता



गांधीजींच्या अस्पृश्यांबद्दलच्या भूमिकेबद्दल बरीच चर्चा असते. त्यांची अस्पृश्यतेसंबंधीची मते सतत विकसित होत गेलेली आहेत. या लेखात अस्पृश्यता निवारण करण्याकरिता गांधीजींनी व्यक्त केलेली मते बरीच शेवटच्या काळातील आहेत. ती समजून घेऊनच गांधीजींचा अस्पृश्यतेबद्दलचा दृष्टिकोन आपल्याला समजू शकेल. लेख मोठा असला तरी समजून घेतला पाहिजे असा आहे. - ब्रिजमोहन
-------------------
३७२. हरिजन सेवक संघाच्या सदस्यांशी चर्चा
(हरिजन सेवक संघ ऑन फाय म्हणजे हरिजन सेवक संघावर कठोर टीका या प्यारेलाल यांच्या लेखावरून.)
पाचगणी,
[जुलै २०, १९४६] (गांधी १९१५ ते ४८वरून)
प्रश्न - साम्यवादी पक्षाने भंग्यांची संघटना व्यवस्थितपणे उभारली आहे आणि संप इत्यादींच्या माध्यमाने त्यांनी त्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले आहेत. परंतु हरिजन सेवक संघाचे काम मात्र हरिजनांच्या कल्याणापर्यंतच सीमीत राहिले आहे. यामुळे लोकप्रियतेच्या बाबतीत ते साम्यवाद्यांच्या कामाशी यशस्वीपणे स्पर्धा करू शकत नाही. यामुळे तुम्हाला असे वाटत नाही काय की हरिजन सेवक संघाने आपल्या धोरणात आणि कामाच्या पद्धतीत बदल केला पाहिजे?
उत्तर - काय योग्य आहे यावरून आपण आपले धोरण ठरवले पाहिजे, सवंग लोकप्रियता मिळवण्याच्या दृष्टीने नाही. हरिजन सेवक संघाचा विश्वास असेल की तो योग्य मार्गावर चालत आहे तर इतर काय करतात वा करत नाहीत याचा विचार न करता त्याने त्या मार्गाचे अनुसरण करणे सुरू ठेवले पाहिजे. अशा प्रकारे आपण संघटनाही बांधू शकतो वा संप करण्याकरिताही त्यांना प्रेरीत करू शकतो. असे आपण राजकीय वा तत्सम हेतूने नाही तर हरिजनांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याकरिता करू शकतो.
प्रश्न - हरिजनांमध्ये अशी भावना पसरली आहे की कॉंग्रेस हरिजनांच्या न्याय्य अधिकारांकडे लक्ष देण्याऐवजी मुसलमानांच्या मागण्यांकडे अधिक लक्ष देत आहे. या संबंधी तुमचे मत काय आहे?
उत्तर - कॉंग्रेस ही राजकीय संघटना असल्यामुळे ती राजकीय दडपणाला बळी पडण्याची जास्त शक्यता आहे. आणि हरिजनांपेक्षा मुसलमान असे दडपण आणण्यात फार जास्त सक्षम आहेत. ती जर त्या दडपणाला बळी पडत असेल तर तिला त्याची किंमत मोजावी लागेल. परंतु हरिजन सेवक संघ अराजकीय संघटना आहे. यामुळे लाभहानीचा विचार न करता हरिजन सेवक संघाने हरिजनांबद्दलच्या आपल्या प्राथमिक कर्तव्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे.
प्रश्न - श्यामलाल यांच्याशी नुकताच तुमचा जो पत्रव्यवहार झाला होता त्यात तुम्ही म्हणाला होता की जातिव्यवस्था पाळामुळासह छाटून टाकल्याशिवाय अस्पृश्यता समूळ नाहीशी करता येणार नाही. असे असेल तर मग तुम्ही अस्पृश्यता निवारण करण्याच्या कामाला जातपात मिटवण्याचा एका व्यापक धर्मयुद्धाचा भाग का करत नाही? तुम्ही जर मूळ कापले तर शाखा आपोआपच वाळून जातील.
उत्तर - माझा एखादा दृष्टिकोन असणे ही एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट संपूर्ण समाजाला पूर्णपणे स्वीकारार्ह होणे ही दुसरी गोष्ट आहे. मला आशा आहे की माझा मनोविकास सतत होत आहे, ते सतत पुढे जात आहे. सर्व लोक त्याच्याबरोबरीने पुढे जाऊ शकत नसतील. यामुळे मी शक्य तितका धीर धरून हळूहळू पुढे सरकण्यावर समाधान मानले पाहिजे. नुकताच नवजीवनने माझे ‘वर्णव्यवस्था’ हे जे पुस्तक प्रकाशित केले त्याच्या प्रास्ताविकात (पाहा वर्णव्यवस्थेला प्रास्ताविक, मे ३१, १९४५) तुम्ही पाहिलेच असेल की तत्त्वतः मी तुमच्या तत्त्वाशी पूर्णपणे सहमत आहे. मी जर १२५ वर्षे जगलो तर संपूर्ण हिंदू समाजात माझ्या विचाराप्रमाणे परिवर्तन घडवून आणू शकेन अशी माझी अपेक्षा आहे.
प्रश्न - आजच्या परिस्थितीत हरिजनांना प्राथमिक, सामाजिक आणि आणि नागिरक अधिकार मिळावे म्हणून निदान काही विशिष्ट ठिकाणी तरी आंदोलन करण्याचा सल्ला तुम्ही तथाकथित सवर्ण हिंदूंना द्याल काय? या कारणाकरिता आवश्यकता पडली तर सवर्ण हिंदूंच्या विरोधात सत्याग्रह करण्याचा सल्ला हरिजन सेवक सघाला द्याल काय?
उत्तर - एक संघटना म्हणून संघाला सवर्ण हिंदूंच्या विरोधात सत्याग्रह करण्याचा सल्ला मी देणार नाही. परंतु वैयक्तिक पातळीवर सवर्ण हिंदूंच्या विरोधात आपापल्या ठिकाणी असे सत्याग्रह संघटित करण्याचा मी केवळ सल्लाच देणार नाही तर अपेक्षाही करीन की संघाच्या सदस्यांनी आपापल्या ठिकाणी हे काम करावे. त्यांनी जर योग्य भावनेने असे कोणते पाऊल उचलले तर मी त्याला निश्चितच पाठिंबाही देईन. असे करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
प्रश्न - प्रांतांमध्ये लोकप्रिय सरकार नसले तरी हरिजन सेवक संघाने हरिजनांच्या मंदिरप्रवेशाकरिता जोरदार कार्यक्रम चालवावा असा सल्ला तुम्ही द्याल काय?
उत्तर - शक्य आहे की मी असे करेन. सध्यासुद्धा हळू का होईना काही ठिकाणी असे केले जात आहे हे मला माहीत आहे. याची गती वाढली तर मला खरोखरच आनंद होईल.
प्रश्न - संघाचे सदस्य अस्पृश्यांबरोबर जेवण घेण्याकरिता नकार देऊ शकतात काय?
उत्तर - एक काळ होता की जेव्हा सहभोजन हा अस्पृश्यता निवारण कार्यक्रमाचा अविभाज्य भाग नाही असे मी म्हणत होतो. व्यक्तिशः मी त्या बाजूने होतो. आज मी त्याला प्रोत्साहन देतो आहे. आणि मी वर उल्लेखिलेली प्रस्तावना जर तुम्ही पाहिली तर खरे म्हणजे मी अजूनच पुढे गेलो असल्याचे तुम्हाला आढळून येईल.
प्रश्न - हरिजनांना राजकीय अधिकार मिळवून देण्याकरिता ग्रामपंचायती, नगरपालिका आणि विधिमंडळे यांच्यात हरिजनांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे म्हणून हरिजन सेवक संघाने प्रयत्न करू नये काय?
उत्तर - होय, असे निश्चितच झाले पाहिजे. याकरित कितीही प्रयत्न केले तरी ते कमीच ठरतील.
प्रश्न - हरिजन छात्रालयात आणि वयस्कर हरिजनांच्या सभेत संघाने हिंदू धर्माच्या तत्त्वांची शिकवण द्यायला नको काय?
उत्तर - हरिजन मुले आणि वयस्कर हरिजन यांना हिंदू धर्माच्या मूलभूत सिद्धांतांचा परिचय करून देणे हे संघाचे प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे. त्यांना जर हे ज्ञान नसेल तर शक्य आहे की मोठे झाल्यानंतर ते हा धर्म सोडून देतील. असे झाले तर याची जबाबदारी त्या लोकांवर असेल ज्यांनी हे आवश्यक ज्ञान त्या हरिजनांना दिले नाही.
सवर्ण हिंदूंमध्ये प्रचार कार्य करण्याकरिता संघाने विशेष प्रशिक्षण देऊन प्रचारक तयार करायला नको काय असे गुंटूर येथील विनय आश्रमाचे श्री सीताराम शास्त्रींनी विचारले. ते म्हणाले की मला पुरेशी मदत करण्यात आली तर अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र  माझ्या आश्रमात सुरू करण्याची माझी तयारी आहे.
परंतु या सूचनेच्या व्यावहारिकतेबद्दल गांधीजी फार साशंक होते. वास्तवात श्री घनश्यामदास बिर्ला यांनी हा प्रश्न अनेक वर्षांपूर्वी उपस्थित केला होता व पूर्ण चर्चेनंतर तो मुद्दा सोडून दिला होता. गांधीजी म्हणाले की संघाचे सदस्य या आदर्शाप्रमाणे वागले तरी माझे पूर्ण समाधान होईल.
प्रश्न - संघात हरिजन प्रतिनिधी ठेवण्याची वा संघाच्या कार्यकारिणीत किमान एक हरिजन प्रतिनिधी ठेवण्याची प्रथा आपण पाडायला नको काय?
मॅकडोनाल्ड सरकारने अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्याकरिता घेतलेला निर्णय पुणे करारानंतर बदलवण्याकरिता भाग पडल्यानंतर .हरिजन सेवक संघाची स्थापना कशा प्रकारे झाली होती याचा इतिहास याचे उत्तर देत असताना गांधीजींनी सांगितला. गांधीजी म्हणाले की त्या वेळी असे जाणवले की समाजाचा विनाश होऊ द्यायचा नसेल तर हिंदू धर्माला स्पर्शास्पर्शाच्या भावनेपासून पूर्णपणे मुक्त करावे लागेल. याकरिता हिंदू धर्माच्या खऱ्या हृदयपरिवर्तनाची आणि आपल्या पापाचे प्रायश्चित्त घेण्याची आवश्यकता होती. याच उद्देशाने हरिजन सेवक संघाची स्थापना करण्यात आली होती.
गांधीजी पुढे म्हणाले की या दोन्ही प्रस्तावांना माझा विरोध आहे. मला माहीत आहे की प्राप्त परिस्थितीत संघाच्या काही मंडळांमध्ये (बोर्डांमध्ये) हरिजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु ठक्कर बापांच्या दुबळेपणाला दिलेली ही सूट होती. मी सांगितले आहे की हरिजन सेवक संघ हा पश्चात्तापदग्ध पापी लोकांचा संघ आहे व अस्पृश्यतेची भावना असणाऱ्या तथाकथित हिंदूना प्रायश्चित्त घ्यायला लावणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. संघात हरिजनांना सामील करून घेणे ही तर केवळ डोळ्यात धूळ फेकण्यासारखी आणि मनाची समजूत घालण्यासारखी गोष्ट होईल. असे जरी केले तरी हरिजनांची संघात कोणतीच भूमिका राहिली नसती आणि त्यांना संघात जरी घेतले तरी थोड्या दिवसात ते निघून गेले असते. समित्या ज्या प्रकारे काम करत आहेत त्यांचा मला जो वैयक्तिक अनुभव आला त्यावरून मी हे सांगत आहे. मला माहीत आहे की संघ आपल्या आदर्शावर नेहमीच स्थिर राहू शकलेला नाही. आपल्या कामाचा व्याप वाढवण्याचा व हरिजनांना कार्यकारिणीत बहुमत देण्याचा संघाला अर्थातच अधिकार आहे. अथवा हरिजनांच्या काही प्रतिनिधींचे एखादे मंडळ संघ तयार करू शकते आणि ते संघाला सल्ला देण्याचे काम करू शकते व संघाच्या कामाची देखरेख करून ते संघाला योग्य मार्गावर ठेवयण्याचे काम करू शकते.
यानंतर हरिजनांच्या उद्धाराकरिता साधू लोकांचे सहकार्य घेण्याचे जे काम ग्वाल्हेर संस्थानात सुरू करण्यात आले होते त्यासंबंधी गांधीजींना सल्ला विचारण्यात आला. उत्तर देताना गांधीजी म्हणाले की हे पाऊल योग्य आहे आहे की नाही आणि असे करण्याचा सल्ला देणे बरोबर राहील की नाही याबद्दल मला गंभीर शंका आहे. यात मला राजकारणाचा वास येतो. या कामात खऱ्या साधूंची मदत मिळू शकली तर मी त्याचे स्वागत करीन. परंतु माझ्या कल्पनेनुसारचे साधू शोधूनही मला या देशात सापडलेले नाहीत. जे काही साधू मला भेटले त्यांना पाहून माझी निराशाच झाली आहे. काही ठिकाणी अपवादात्मक चांगले साधू मिळूही शकतात आणि त्यांच्या मदतीचे मी स्वागतही करीन. परंतु मी स्पष्ट सांगतो की या कामात साधूसमुदायाची मदत घेण्याच्या शक्यतेसंबंधी मला घोर शंका आहे. असा प्रयत्न जरी करण्यात आला तरी त्यांचे आणि आपले मार्ग लवकरच वेगळे होतील अशी मला भीती वाटते.
कस्तुरबा स्मारक ट्रस्टची काही रक्कम हरिजन भगिनींकरिता राखून ठेवली तर ते योग्य होणार नाही काय असे दुसऱ्या एका मित्राने विचारले. गांधीजींनी उत्तर दिले की तुमच्यात या संपूर्ण निधीचा उपयोग करण्याची क्षमता असेल तर तुम्ही संपूर्ण निधी घेऊ शकता. यामुळे या कामाकरिता दर वर्षी काही निधी राखून ठेवण्याची आवश्यकता नाही.
सवर्ण हिंदूंद्वारे हरिजनोद्धाराचे जे काम होत आहे त्याचे धोरण ठरवण्याकरिता मी जबाबदार आहे. त्यांनी प्रायश्चित्त घेतले पाहिजे. मी स्वतःलाच समजावत होतो की आवश्यक पात्रता नसल्यामुळे सर्व हिंदू हरिजनांची कदाचित सरळ सेवा करू शकत नसतील. परंतु पैसे देऊन तर ते या कामाला निश्चितच मदत करू शकतात. सरळ सेवेचे उदाहरण द्यायचे तर ते हरिजन मुलांना स्वतः शिकवू शकत नसतील, परंतु त्यांना शिकवण्याकरिता शिक्षक ठेवण्याकरिता पैसे देऊ शकतील. हासुद्धा प्रायश्चित्त करण्याचा एक मार्ग आहे. असे केले तर हरिजन समाजात मिळूनमिसळून त्यांच्या प्रगतीला ते हातभार लावू शकतील.
अशा प्रकारच्या कामांमुळे अस्पृश्यतेचे पाळामुळासकट उच्चाटन कुठे होऊ शकते अशी शंका घेणारे बांधव आहेत याची गांधीजींना कल्पना होती. एके काळी ते स्वतःही अशी शंका घेणारांपैकी होते. परंतु नंतर त्यांच्या लक्षात त्यांची चूक आली. गांधीजी म्हणाले की याकरिता मी श्री देवधर यांचा आभारी आहे. एके काळी मी त्यांच्या कामाकडे शंकास्पद दृष्टीने पाहत होतो व त्यांच्यावर मी त्या काळात टीकाही करत होतो. परंतु एका वर्षाच्या अनुभवाने माझा सर्व गर्व नाहिसा केला आणि मला नम्रपणा शिकवला. मला जाणवले की सवर्ण हिंदूंच्या हृदयपरिवर्तनाकरिता मी जर केवळ प्रचार कर्याचाच उपयोग केला तर यश मिळण्याकरिता युगांतापर्यंत वाट पाहावी लागेल आणि मध्यंतरीच्या काळात हरिजनोद्धाराचे काम जसेच्या तसेच राहून जाईल. यानंतरच्या अनुभवाने मला असाही विश्वास वाटू लागला की हरिजनांमध्ये काम करण्याकरिता आवश्यक चारित्र्यसंपन्न, निष्ठावंत आणि त्यागभावना असलेले लोक बऱ्याच प्रमाणात मिळाले तर सवर्ण हिंदूंनी काही जरी केले नाही तरी अस्पृश्यता भूतकाळातील गोष्ट होऊन जाईल. परंतु याचा अर्थ असा आहे की आधी आपण अंतःकरणातून हरिजन झालो पाहिजे आणि हरिजनांबरोबर राहून हरिजनांप्रमाणेच काम केले पाहिजे.
गांधीजींनी पुढे विचारले की परंतु हरिजन सेवक संघाच्या लोकांनी अस्पृश्यतेबद्दलची भावना पूर्णपणे काढून टाकली असा दावा ते अंतःकरणपूर्वक करू शकतात काय? त्यांचे कृतीत आणि उक्तीत पूर्णपणे सामंजस्य आहे काय?
एका सदस्याने विचारले की याबद्दलचा तुमचा मापदंड काय.
तुमचा विवाह झालेला आहे काय?
सदस्य - होय, झालेला आहे.
गांधीजी - मग तुम्हाला अविवाहित मुलगी आहे काय? जर असेल तर तिच्याकरिता हरिजन वर मिळवा. असे तिच्या वासनापूर्तीकरिता करायचे नाही तर शुद्ध धार्मिक भावनेने करायचे आहे. तुम्ही असे केले तर मी तुम्हाला माझ्या खर्चाने अभिनंदनाची तार पाठवीन.
आता तुमच्य लक्षात येईल की हरिजन सेवक सवर्ण हिंदूंच्या अंतःकरणाला का स्पर्श करू शकत नाहीत. याचे कारण ना तर त्यांच्या अंतःकरणात श्रद्धेची ती आग आहे आणि ना सेवा करण्याची ती अदम्य भूक. अंतःकरणावर प्रभाव टाकण्याकरिता हिची पहिली आवश्यकता असते. मूठभर सवर्ण हिंदूंनी जर खऱ्या सेवाभावनेने या कार्यात उडी घेतली तर ते संपूर्ण हिंदू समाजाला प्रभावित करू शकतात. परंतु दिखाऊ सेवा करणारांचे सैन्यही त्यांना प्रभावित करू शकणार नाही.
अशा प्रकारची सेवा करण्याकरिता मालवीयजींसारखा निष्ठावंत माणूस पाहिजे. मी तर माझ्या बहिणीतही परिवर्तन घडवून आणू शकलो नाही. आणि मीच जर असे करू शकलो नाही तर मी इतरांना दोष कसा देऊ शकतो? यावरून हा मार्ग किती कठीण आणि काटेरी आहे हे तुमच्या लक्षात येईल. तरीही तुम्हाला वाटत असेल की या कामाकरिता तुमच्यात आवश्यक योग्यता आहे तर तुमच्या भागात तुम्ही हा प्रयोग करू शकता.
गांधीजी पुढे म्हणाले की काही प्रमाणातील या अपयशाचे एक कारण हे सुद्धा आहे की हरिजन सेवक संघाच्या बहुतेक लोकांच्या सेवाकार्यात राजकीय हेतू मिसळलेला आहे.तुम्हाला जर सवर्ण हिंदूंच्या अंतःकरणात खरोखरच प्रवेश करायचा असेल तर तुमचे अंतःकरण शुद्ध धार्मिक भावनेने परिपूर्ण असले पाहिजे. अशा प्रकारच्या कामाकरिता शब्दांची आतशबाजी पुरेशी नसते. आज तर आपण निष्क्रियता, बेफिकीरी आणि मानसिक शैथिल्य या भावनांनी दबलेलो आहो.
अजून एक उपाय आहे. परंतु तो उग्र आणि धोक्याने भरलेला आहे. तो उपाय उपवासाचा आहे.
जेव्हा केव्हा मला उपवास चुकीचा आणि नैतिक दृष्टीने अनुचित वाटला आहे तेव्हा तेव्हा मी त्याची निंदा केली आहे. परंतु उपवासाची जेव्हा स्पष्ट नैतिक मागणी असते तेव्हा त्याच्यापासून माघार घेणे म्हणजे आपल्या कर्तव्यापासून माघार घेणे. असा उपवास विशुद्ध सत्य आणि अहिंसेच्या आधारावर करण्यात आला पाहिजे.
जाता जाता गांधीजींनी सूचीत केले की मला कदाचित या जीवनात अजून एक वा अधिक उपवास करावे लागतील. परंतु सध्या तरी माझा कोणताही उपवास करण्याचा विचार नाही. ही केवळ अस्पष्टशी पूर्वजाणीव आहे.
हरिजन, जुलै २८, १९४६

Sunday, May 3, 2020

भारतीय मुसलमान : भारतीयत्वाच्या जाणीवेचा वेदनामय पुनर्शोध

भारतीय मुसलमान : भारतीयत्वाच्या जाणीवेचा वेदनामय पुनर्शोध  

जाने यह कैसा दौर है, जिसमें यह मुर्रत भी मुश्किल है
दिन हो अगर तो उसको लिखू दिन, रात अगर हो रात लिखू
            रफिक जकेरिया यांच्या लेखातून साभार....

            गेल्या दोन दशकापासून भारतातील मुस्लीम समुदायाच्या भारतीयत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत त्यांच्यावर ‘दुय्यम नागरिकत्व’ लादण्याचा जोरादार प्रयत्न चालू आहे. ‘देशप्रेम’ आणि ‘राष्ट्रीयत्व’  सिद्ध करून दाखवण्याची सक्ती केली जात आहे. अखलाक, पहलू खान, जुनेद यांच्या जमावाकडून झालेल्या हत्या व त्यांच्या हत्येचे सोशल मिडीयावर केले जाणारे निर्लज्ज समर्थन ही अलीकडील ताजी उदाहरणे आहेत. दिल्लीतील मुगल गार्डनचे नाव बदलण्याची मागणी, ताजमहलला उत्तर प्रदेशच्या पर्यटन यादीतून वगळण्याची कृती, सोबतच विशिष्ट हेतू समोर ठेवून समान नागरी कायद्याची केली जाणारी सततची मागणी, तीन तलाक, बुरखा पद्धती, बहुविवाह पद्धती, मदरशातून दिले जाणारे शिक्षण या विषयांना सतत नकारात्मक बाजूंनी चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवून सामाजिक स्वास्थ अधिकाधिक अस्थिर करण्याचे कारस्थान चालू आहे. आणि गंभीर बाब म्हणजे समाजात अशी नकारात्मकता पसरवण्यात ही यंत्रणा यशस्वी झालेली आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला भारतातील काही मोजका मुसलमान समुदाय धार्मिक कट्टरतावादाकडे झुकत आहे. चांगला बदल देखील सहसा स्विकारायला मुस्लिम समाज मन तयार होत आहे. जेव्हा तीन तलाक प्रथा सुप्रीम कोर्टाने कायद्याने बंद केली पण या निर्णयाच्या विरोधी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या विरोधात अपील केले. तीन तलाक प्रथा बंदीच्या कायद्यामध्ये ज्या अनेक तरतूदी आहेत त्याबद्दल मतभेद असू शकतात. पण महिलांचे अधिकार डावलत एकतर्फी पुरुषी वर्चस्व राखणाऱ्या या प्रथेचे समर्थन कसे केले जाऊ शकते? हा मोठा प्रश्न आहे. तसेच देवबंदहून काही दिवसापूर्वी एक फतवा जाहीर करण्यात आला होता ज्यामध्ये मुस्लिम स्त्रियांनी केस कापू नयेत व भुवया कोरी नयेत कारण शरीयत मान्यता देत नाही, असा आदेश देण्यात आला होता. वस्तुत: या घटना म्हणजे काळाची चाके उलटी फिरवण्याचाच प्रकार आहे. आणि आश्चर्य म्हणजे जे स्वत:ला बुद्धीजीवी म्हणवून घेणारे लोक आहेत तेदेखील धर्मातील अशा अतार्किक व अव्यवहारी गोष्टींबाबत बोटचेपी भूमिका स्वीकारून गप्प राहणे पसंत करतात. अशा विदारक स्थितीत आजचा भारतातील मुस्लिम समाज अडकला आहे.
असे असली तरी मुस्लिम समाजातील काही बुद्धीजीवी लोक या प्रश्नांचा अतिशय गांभीर्याने विचार करताना दिसत आहेत. मुस्लिम समाजाची वास्तविकता संशोधनाद्वारे जगासमोर मांडत आहेत. सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांच्या मुळापर्यत जाऊन त्यांचा वेध आहेत. अशा पद्धतीने भारतातील मुस्लिम समुदाच्यासर्वागीण बाजूंचा वैचारिक आणि वस्तुनिष्ठदर्शक आढावा घेण्याचा प्रयत्न प्रा. डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी संपादित केलेल्या “भारतीय मुसलमान : वर्तमान आणि भविष्य’ या पुस्तकात अनेक लेखांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती अक्षर दालन, कोल्हापूर या प्रकाशन संस्थेने २०१६ ला प्रकाशित केली आहे. पुस्तकाच्या शीर्षकातच भारतीयत्वाच्या जाणीवेचा पुरस्कार केला असून वर्तमानात भारतीय मुस्लिम नागरिकांवर दुय्यम नागरिकत्वाचा जो शिक्का जाणूनबुजून मारण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला हे शीर्षक चपराक देते. भारतीय मुसलमान हे जन्माने आणि कर्माने भारतीयच असल्याचा ‘भारतीय मुसलमान’ हे शीर्षक अधोरेखित करते.
हिंदीतील प्रसिद्ध वैचारिक मासिक ‘हंस’ ने ‘भारतीय मुसलमान : वर्तमान आणि भविष्य’ या नावाने अंक प्रसिद्ध केला होता. याच अंकातील निवडक लेखांचे मराठीमध्ये अतिशय आशयगर्भ भाषांतर प्रा. डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी केले आहे. प्रा. डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी विस्तृत अशी भूमिका मांडत भारतीय मुसलमानांच्या  सामाजिक-आर्थिक स्थित्तीचा आढावा घेतला आहे. भारतीय मुसलमानांच्या धार्मिक जाणिवांबद्दल ते लिहितात कि, “धर्माविषयीचे कोणतेही ज्ञान त्यांना नाही. तरीही त्यांची धर्मावर निष्ठा आहे.” वस्तुतः जगातील सर्वच धर्माचे अनुयायी धर्माविषयी अधिकृत माहिती नसताना, धर्मश्रद्धा मात्र तीव्रतेने जोपासत असताना दिसतात. पण इस्लाम धर्मियांवरच असा आरोप का होतो, कि ते जास्त कट्टरतावादी आहेत? या दुहेरी मानसिकता
जोपासणाऱ्या प्रवृत्तीच्या मूळापर्यत जाण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकामधून करण्यात आला आहे.
            डॉ. राजेखान शानेदिवाण भारतीय मुसलमानांच्या ‘भारतीयत्वा’बद्दल पोटतिडकीने लिहिताना अनेक प्रश्न उपस्थित करून वाचकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. “भारतातील बहुसंख्य मुस्लिम हे हिंदूच आहेत. हिंदू धर्मातील अनिष्ठ चालीरीती सोडून इस्लाममध्ये समतेवर असलेल्या तत्वज्ञानाचा स्वीकार इथल्या कनिष्ठ गणल्या गेलेल्या जातींनी केला. तसेच इथला जो बहुसंख्येने असलेला हिंदू समाज आहे त्यांच्यातील सर्वच चांगल्या–वाईट चालीरीती, रूढी, परंपरा ह्या आजच्या भारतीय मुसलमानांमध्ये आढळून येतात. मग त्यांना परके का समजायचे?” असा सवाल ते उपस्थित करतात. याबरोबरच भारतीय मुसलमानांची शैक्षणिक स्थिती, रोजगारातील स्थिती, उच्च-शिक्षणाची अवस्था, राजकीय स्थान, मुस्लिम स्त्रियांचा दर्जा यासारख्या अनेक सामाजिक पैलूंचा  तपशीलवार अगदी आकडेवारीसह ताळेबंद मांडतात.            
            या ग्रंथामध्ये भारतातील नामवंत संशोधक, अभ्यासक, साहित्यिक, विचारवंत व इतिहासकार यांचे लेख आहेत. सर्वच लेख संशोधनात्मक व मूल्यात्मक अन्वयार्थाच्या अंगाने अतिशय मूलगामी व चिंतनशील आहेत. या लेखांमध्ये भारतीय मुस्लिमांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबरोबरच वर्तमानातील समस्यांचा आढावा घेतला असून त्यातून बाहेर पडण्याचे मार्गही विषद केले आहेत.
            रफिक जकेरिया आपल्या ‘भारतीय मुसलमान’ या लेखामध्ये भारतातील हिंदू-मुस्लिम यांच्यातील संबंधामध्ये जो दिवसेंदिवस संघर्ष वाढत चालला आहे त्याचा आढावा घेतात. भारतीय मुस्लिमांचा प्रश्न हा मुस्लिमांसाठी जितका महत्त्वपूर्ण आहे तितकाच तो हिंदुच्यासाठी आहे, असे मत मांडून लेखाच्या सुरवातीलाच या गंभीर विषयाकडे लक्ष वेधतात. ते आपल्याला आलेल्या अनुभवातून मुस्लिमांना सांगतात की, ‘हिंदुंच्याबरोबर वाद घालणे आता निरर्थक आहे. कारण अशा वादामुळे विरोध अधिकच तीव्र होईल. (पृ.६५) मुस्लिमांनी ‘घेटो’ पासून सुटका करून घेऊन शांतता आणि  सौहार्दाचे वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नशील रहावयास हवे. आज मुस्लिमांची अवस्था बिकट आहे, पण मुस्लिमांना मार्गदर्शन करणारे कोणी सर सय्यद नाही.( पृ. ६६) अशी खंत ते व्यक्त करतात. ते  मुस्लिम नेतृत्वावर टीका करतात. कारण या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेपेक्षा आपल्या स्वार्थासाठीच मुस्लिमांचा वापर करून घेतला. त्यासाठी समाज मन अस्थिर ठेवले. यामुळे सामान्य जनतेचे नुकसानच झाले.  
            ‘एकविसावे शतक आणि इस्लाम’ या लेखात असगर अली इंजिनीअर यांनी आधुनिकतावादी मूल्यांच्या आधारे धर्माची चिकित्सा होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करताना जगातील कोणताही धर्म या चिकित्सक दृष्टीकोनातून सुटणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. कोणत्याही धर्मातील विचार व तत्त्वज्ञान हे तत्कालीन परीस्थितीतून निर्माण होतात. त्यामुळे बदलत्या काळात देशकालपरत्वे ‘धर्म’ नावाच्या सामाजिक संस्थेतदेखील परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे सूत्र त्यांच्या लेखात दिसते. आपण बुद्धिजीवी म्हणून घेत असू तर अधिकाधिक उन्नत होत जाणे आवश्यक आहे. ते लिहितात कि, “आपल्या वर्तमानकालीन धर्मविचारांवर भविष्यकाळाचा प्रभाव पडायला हवा. शरियतमधील निर्माण प्रक्रियेत मानवाचे जे काही योगदान आहे त्याला अपरिवर्तनीय समजणे दूरच राहो त्याला पवित्र सुद्धा समजणे ठीक नाही.” त्यांची ही भूमिका अतिशय क्रांतिकारी आहे. कारण धर्माच्या पवित्र्यावरच त्यांनी बोट ठेवले आहे. सर्वच धर्माची व धर्मग्रंथांची स्थापना मानवानेच केली आहे. त्यामुळे मानवाने निर्माण केलेल्या पावित्र्याच्या संकल्पना अपरिवर्तनशील कशा असू शकतील? धर्माच्या अनुयायांनी वरील विचार आत्मसात करून आत्मपरीक्षण करणे नितांत गरजेचे आहे. कारण धर्मभावना ही आपल्या समूहातील सदस्यांच्या बाबत सहानुभूती जोपासते मात्र इतर धर्मियांबद्दल भेदरेषा निर्माण करते, असे माझे स्पष्ट मत आहे. धर्माच्या अपरिवर्तनीय भूमिकेवर उपस्थित केलेला प्रश्न आणि धर्म चिकित्सेची केलेली मागणी ही या लेखाची महत्त्वाची बाजू आहे.   
            स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतातील मोठ्या समूहाला सांप्रदायिक बनविण्यात भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या  आणि अशा प्रकारच्या शेकडो संघटनांबरोबरच या सर्व संघटनांची मातृ संघटना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ पूर्णपणे यशस्वी झाली आहे. हिंदुत्वाच्या वरकरणी एकरूप भासणाऱ्या अजेंड्याखाली सामाजिक विषमता जोपासत सांप्रदायिक तेढ निर्माण करून मुस्लिम धर्मियांबाबत कायम संशयाचे वातावरण निर्माण  केले जात आहे. असगर वजाहत यांनी ‘भारतीय मुसलमान : वर्तमान आणि भविष्य’ या लेखात वरील परिस्थितीवर अचूक बोट ठेवले आहे. स्वातंत्र्यापूर्वी हिंदू-मुस्लिमांमध्ये बंधुभाव वाढीस लागावा म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आयुष्याच्या अंतापर्यत प्रयत्न केले. त्याला काही प्रमाणात यशही आले. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात उतरोत्तर तसे प्रयत्न झाले नाहीत. याबाबत ते लिहितात कि,  “स्वातंत्र्यानंतर मात्र अशा तऱ्हेचा कोणताही राष्ट्रीय कार्यक्रम बनू शकला नाही. ज्यामुळे हिंदू आणि मुसलमानांना एकत्र येण्यासाठी प्रेरणा मिळू शकेल.” (पृ. ४०) जे काही थोडेफार मुस्लिम लोक शिक्षण घेऊन प्रगती करू शकले ते बुद्धीजीवी सर्वसामान्य मुस्लिमांच्या जवळ जाण्यास कचरतात कारण त्यामुळे आपण जातीवादी ठरण्याची त्यांना भीती वाटते. त्यांचे हे निरीक्षण बोलके आहे. याचे कारण असे की, ‘सब घोडे बारा टक्के’ या म्हणीप्रमाणे सर्व मुस्लिम कट्टर जातीयवादी आहेत, अशी जनमानसिकता तयार करण्यात आलेले यश हे आहे. या परीस्थितीवर जर मात करायची असेल तर असगर वजाहत एक चांगला उपाय सुचवितात तो म्हणजे, ‘लोकशाहीवादी शक्तींच्या मजबुतीकरणाचा.” खरोखरच जर आपल्याला भारत एक राष्ट्र म्हणून उभे राहयाचे असेल तर १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो वैचारिक वारसा मिळाला होता तोच मजबूत करावा लागणार आहे. कारण प्रत्येक भारतीयाला एक जाणीव सतत लक्षात ठेवावी लागणार आहे, ती म्हणजे आपण एक नव्हतो पण आपल्याला राष्ट्र म्हणून उभे राहयचे आहे! प्रंचड मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रादेशिक आणि आर्थिक विषमता आहे. तरीदेखील आपण एकसंघ होण्याचा संकल्प केला आहे. भारतीय संविधानातील समाजिक न्यायाच्या मूल्यांवर निष्ठा ठेऊन आपल्यातील विषमतेवर मात करून बंधूभाव आपल्याला जोपासावयाचा आहे.
            नेसार अहमद यांनी आपल्या ‘भारतीय मुसलमान : सामाजिक आणि आर्थिक स्थिती’ लेखामध्ये मुसलमानांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचा आढावा घेतला आहे. यामध्ये एका व्यक्तीचे दरमहा खर्चाचे विवरण, वार्षिक उत्पन्न, बेरोजारीचे पश्न, रोजगारीचे प्रमाण, जमीनधारक लोक, शिक्षण आणि साक्षरतेचे प्रमाण, मुलांच्या शाळा गळतीचे प्रमाण, आरोग्य, भौतिक सुविधा, महिलांची स्थिती अशा सामाजिक अंगांचा हिंदू, ख्रिश्चन धर्मातील लोकसंख्येशी विविध शासकीय अहवालातील आकडेवारीच्या आधारे तुलना करून मुस्लिम समुदाय कसा परिघाबाहेर आहे, हे दाखविले आहे. राजकीय पक्ष अथावा संघ परिवार यांच्याकडून मुस्लिमांचा अनुनय केला जातो असा जो आरोप केला जातो त्या आरोपाला  नेसार अहमद यांनी सांख्यिकीय माहितीच्या आधारे खोडून काढले आहे. त्यांच्या मते जर खरोखरच राजकीय पक्षांनी मतांसाठी अनुनय केला असे मानले तर मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीवर त्याचे प्रतिबिंब उमटले असते पण दुर्देवाने तसे घडलेले नाही.      
            रिजवान कैसर यांनी ‘भारतीय मुसलमान : दशा आणि दिशा’ या लेखामध्ये महत्वाच्या वैचारिक द्वंद्वाकडे लक्ष वेधले आहे. तो म्हणजे मुस्लिमांनी मुख्य प्रवाहामध्ये सामील होण्याचा. रिजवान कैसर जो प्रश्न उपस्थित करतात तो महत्त्वपूर्ण आहे. तो असा, मुख्य प्रवाह कोणता? द्रविड संस्कृतीचा की आर्य संस्कृतीचा? सवर्णांचा की दलितांचा की अनुसूचित जमातींचा? उत्तर भारतीय मुख्य प्रवाह की दक्षिण भारतीय मुख्य प्रवाह? खरं तर हा वाद जुनाच आहे. पण आज देशात सर्वाना एका रंगात रंगविण्याचा जो डाव सुरु आहे  त्याला वरील प्रश्नांच्या आधारेच रोखता येऊ शकते. व्यक्तीचे सार्वभौमत्व आणि अभिव्यक्तीचे संरक्षण जो प्रवाह करतो तोच खरा मुख्य प्रवाह म्हणायला हवे. मग ही प्रक्रिया जगाच्या पाठीवर कोठेही सुरु असू दे. मात्र आपल्या देशात वर्तमान स्थितीत मुख्य प्रवाहाच्या व भारतीयत्वाच्या नावाखाली मुस्लिम, दलित, आदिवासी यांच्या सांकृतिक जीवनाला दुय्यम लेखून आपली विषमतावादी विचारसरणी लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रयत्नावर रिजवान कैसर यांनी प्रस्तुत लेखामध्ये हल्ला चढविला आहे. यावर मात करायची असेल तर, लहान-मोठ्या सांस्कृतिक प्रवाहांनी आपले योगदान द्यायला हवे. आपापली विविधता दर्शवत लोकशाहीनिष्ठ भारताच्या घटना आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या तत्वांना कोठेही हानी पोहोचणार नाही याचे भान सर्वांनी ठेवावयास हवे. तरच आपण हुकूमशाहीचे स्वरूप स्वीकारणाऱ्या मुख्य प्रवाहाला तोंड देऊ शकतो, असे मत मांडले आहे.     
            अब्दुल्ला बिस्मिल्लाह ‘भारतीय मुस्लिम मन’ या लेखात भारतीय मुसलमान कोणाला म्हणावे? आणि ते इतर समुदायापासून भिन्न का आहेत? या प्रश्नांचा वेध घेत भारतीय मुसलमानांचे मन जाणून घेताना दिसतात. मुसलमानेत्तर भारतीय लोकांमध्ये मुसलमानांकडे पाहण्याच्या दोन प्रतिमा तयार झाल्याच्या किंवा जाणूनबुजून तयार केल्याचे ते लिहितात. पहिली बाह्य प्रतिमा. जी लुंगी, दाढी, गोल टोपी यातून तयार होते. दुसरी अंतर प्रतिमा. ज्यामध्ये असहिष्णु, भांडखोर, पाकिस्तान समर्थक, हिंस्त्र, अशी आहे, चित्रपट, कथा, साहित्य यामध्ये चोर, दरोडेखोर, गुंड, मवाली, स्त्रियांची अब्रू लुटणारा हा दाढी व गोल टोपीवालाच दाखवला जातो. यातून मुस्लिमांची नकारात्मक प्रतिमाच जनमाणसामध्ये दृढ होत गेल्याची खंत ते व्यक्त करतात. यामुळे सर्वसामान्य
मुस्लिमाला दैनंदिन जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.  
            जोया हसन यांनी आपल्या ‘मुस्लिम महिला आणि मागासलेपण’ या लेखात भारतातील मुस्लिम स्त्रियांच्या मागासलेपणाच्या कारणांच्या मुळापर्यत वेध घेतला आहे. ‘मुस्लिम महिलांची सामाजिक स्थिती चांगली नसल्याचे नोंदवत ‘मुस्लिम व्यक्तिगत कायद्याने’ काही अधिकार दिले असले तरी पुरुषांच्या तुलनेत मुस्लिम स्त्रियांना अनेक व्यक्तिगत अधिकारांपासून वंचित ठेवल्याचा आरोप केला आहे.  दुसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न त्या उपस्थित करतात, तो म्हणजे कुराणामध्ये मुस्लिम स्त्रियांच्या संदर्भात काय म्हटले आहे? किंवा काय लिहिले आहे? या दृष्टिकोनातून मुस्लिम स्त्रियांच्या संदर्भात विचार करणे चुकीचे आहे. दुसऱ्या धर्मातील स्त्रियांबद्दल विचार करताना ‘धर्म’ केंद्रस्थानी असत नाही मग मुस्लिम स्त्रियांच्या बाबत ‘धर्म’ आडवा का येतो? हा प्रश्न अंतर्मुख करायला लावतो. तसेच ‘धर्म’ नावाच्या पुरुषी सत्ताकेंद्री वर्चस्वाला तो आव्हान देतो आहे. म्हणून लेखिका जोया हसन आणि अनुवादक व संपादक डॉ. राजेखान शानेदिवाण यांचे विशेष कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. कारण त्यांनी खूप मोठे धाडस दाखविले आहे.
            इम्तियाज अहमद यांचा ‘भारतीय मुस्लीम समाज : कमतरता व उपाय’ हा लेख आशय व वस्तुस्थितीपरकतेच्या कसोटीवर पाहता उच्च दर्जाची आशयगर्भ मांडणी करणारा आहे. हिंदू धर्मियांप्रमाणे दडपुन टाकणारी जातीय व्यवस्था जरी इस्लामध्ये नसली तरी जातीय स्तरीकरण व उतरंड असल्याचे ते मांडतात. मुस्लीम धर्मातील उच्च वर्णीयांचा ताबा सर्व क्षेत्रात असल्याचे ते आकडेवारीह मांडतात. सर्वसामान्य मुस्लीम समाज हा सर्वार्थाने एकजूट असतो असे लोक मानतात. पण इम्तियाज अहमद हा समज ‘भ्रम’ असल्याचे विवेचनाद्वारे सिद्ध करतात. मुस्लीम समुदाय हा आंतरिक स्वरूपाचे  विरोधाभासी जीवन जगतो. तो धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही शासनव्यवस्थेचा पुरस्कार करून तशा व्यवस्थेत राहू इच्छितो; मात्र स्वत:साठी लोकशाही मूल्यव्यवस्थेचा आग्रह धरीत नाही, या वास्तवावर नेमके बोट इम्तियाज अहमद यांनी ठेवले आहे. हे निरीक्षण मुस्लिम अनुयायांसाठी खरोखरच आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. कारण कोणताही समाज दुहेरी मानसिकता जोपासून प्रगती करू शकत नाही, ही वास्तविकता आहे.  
            कुरेशी एस.वाय. यांनी ‘इस्लाम, मुसलमान आणि कुटुंब नियोजन’ या लेखामध्ये मुस्लिमांच्या बहुपत्नी विवाह पद्धती, कुटुंब नियोजनाला असलेला इस्लामचा विरोध, अनेक मुलांना जन्म देण्याची पद्धती या आरोपांबाबत भारतासहीत जगभरातील अनेक मुस्लीम देशांतील कायद्यांचा व नियमांचा आधार देत वरील आरोप कसे बिनबुडाचे आहेत याचे स्पष्टीकरण केले आहे. कुराणमध्ये कुटुंब नियोजनाला विरोध करण्यात आलेला नाही. तर असुरक्षिततेची भावना असल्यामुळे अल्पसंख्यांक समाजामध्ये परिवार नियोजनाची संकल्पना राबविली जात नाही. कुटुंबनियोजनाचा संबंध शिक्षणाशी जोडलेला आहे. भारतातील ज्या राज्यांमध्ये  शिक्षणाचा  प्रसार झालेला आहे त्या राज्यांमध्ये कुटुंबनियोजनाचे प्रमाण वाढते आहे. इतर धर्मियांच्या तुलनेत मुस्लिमांमध्ये कुटुंब नियोजनाचे प्रमाण कमी आहे हे मान्य करून त्याची कारणमीमांसा करत नव्या वातावरणात मुस्लिम समुदाय सकारात्मकतेचा विचार करत आहे, हे अधोरेखित केले आहे. कारण लोकसंख्यावाढीमुळे निर्माण झालेले दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. याची जाणीव सर्वांना होत आहे.
            शकील सिद्दिकी यांनी ‘मदरशातील शिक्षण : परंपरा आणि आधुनिकता’ या  लेखात मुस्लिमांच्या मदरशांमधील शिक्षण पद्धतीचा ऐतिहासिक कालखंडापासून होत आलेल्या संक्रमणाचा विस्तृत आढावा घेतला आहे. मदरशांमधील शिक्षणपद्धतीकडे आज संशयाने पाहिले जाते. रूढीवादी, कट्टरपंथीय, आधुनिक शिक्षणपद्धतीच्या विरोधी भूमिका मदरशे कायम घेतात, अशी जनमानसात भावना रुजवली आहे. यामध्ये काही अल्प प्रमाणात तथ्यांश असले तरी मदरशांमधूनच साम्राज्यवादाच्या विरोधात पहिली प्रतिक्रिया उभारल्याचे सिद्दिकी सोदाहरण स्पष्ट करतात. अरब राष्ट्रांतील कितीतरी दार्शनिक, वैज्ञानिक आणि गणितज्ञ या शिक्षण व्यवस्थेतून उदयास आल्याचे ते सांगातात. सिद्दिकी यांनी अकबराने शिक्षणविषयक धोरण कसे राबवले होते याची विस्तृत चिकित्सा केली आहे. त्याबरोबरच मदरशांमधील शिक्षणाच्या नकारात्मक बाबींवरदेखील प्रकाश टाकला आहे. भारतात संस्कृत जशी मूठभर उच्चवर्णीय लोकांचीच ज्ञानभाषा राहिली अगदी तसेच अरबी, फारशी  भाषांबाबत सर्वसामान्य मुस्लिम लोकांचे झाले. मदरशांमधून गरिबांची मुले शिकत राहिली तर बादशहा आणि शासनकर्त्यांनी खाजगी शिक्षणाची व्यवस्था करून आपली मुले मदरशांमध्ये पाठवलीच नाहीत. प्रस्तुत लेख मदरशांमधील शिक्षणपद्धतीविषयी सतत नकारात्मक भूमिका घेणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. लेखकाने केवळ मदरशांमधील शिक्षणाचीच नव्हे तर सरस्वती, शिशू मंदिर व मिशनरी शाळांमध्ये अनुक्रमे आरएसएस व ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत असणाऱ्या पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमांची धर्मनिरपेक्ष आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समीक्षा व्हायला हवी अशी अपेक्षा केली आहे.
            एहसान जाफरी यांनी आपल्या ‘धार्मिक व राजकीय नेतृत्व’ या लेखामध्ये मुस्लिम समुदायातील धार्मिक व राजकीय  नेतृत्वाचा विकासाबरोबर त्यांच्यातील तात्विक विरोधाभास स्पष्ट केला आहे. आधुनिक शिक्षणाने भारावलेली सर सय्यद अहमद खान व त्यांच्या सहकाऱ्यांची एक विचारधारा तर मदरशातील शिक्षणाला आधारभूत मानणारी देवबंदची दुसरी विचारधारा यांचा परामर्श घेतला आहे. सर सय्यद अहमद खान यांच्या विचारातून जे  नेतृत्व उभे राहिले ते उच्चविद्याविभूषित आणि नव्या दृष्टीने भारावलेले होते. मात्र स्वातंत्र्य चळवळीच्या काळात काही घटना अशा घडल्या की, ज्याने प्रागतिक विचारांचा युवक वर्ग मुख्य प्रवाहापासून फारकत घेत उलेमांच्या मागे गेला. नंतरच्या काळात भारत-पाकिस्तानची झालेली फाळणी आणि स्वातंत्र्योत्तर काळात मतदानकेंद्री राजकारणाचा वाढलेला प्रभाव यामुळे देवबंद आणि इमाम यांचे महत्त्व वाढले. पर्यायाने राजकीय नेतृत्वाची वाढ खुंटली.  याचा थोडक्यात पण वास्तवदर्शी आढावा एहसास जाफरी यांनी घेतला आहे.    
            डॉ. राजेखान शानेदिवान यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या अनेक दुलर्क्षित पण महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे. याद्वारे मुस्लिम भावविश्व समोर आले आहे. या पुस्तकाची भाषाशैली त्याचा आकृतिबंध याची साहित्यिक दृष्टिने चिकित्सा करण्याची माझी पात्रता नाही मात्र या ग्रंथातून मुस्लिम समुदायाची सामाजिक-सांस्कृतिक आणि आर्थिक वास्तविकता समोर आली आहे ती महत्वाची आहे. सध्या भारतातील केवळ मुस्लिम समुदायच नाही तर दलित, आदिवासी समुदायांना देखील दुय्यम नागरिकत्व लादले जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी आजही मुस्लिमांना भारताचे नागरिक असल्याचे सिद्ध करावे लागावे, हीच फार मोठी शोकांतिका आहे. संसदेने नुकताच पारित केलेल्या CAB, NRC आणि NPR च्या कायद्यांनी संपूर्ण भारतातील राजकारण ढवळून निघाले आहे. आसामच्या NRC ने जी भयानक स्थिती समोर आणली आहे त्याने वेगळीच चिंता करायला लावली आहे. कोरोनासारख्या भयानक महामारीने संपूर्ण जग चिंताग्रस्त असताना भारतात तबलीगी जमातीने कोरोना पसरवला आणि पालघरमध्ये दोन साधूंची झालेली हत्या यावरून मुस्लिम समुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात ज्या पद्धतीने ओढण्याचा प्रयत्न झाला त्याने सर्वसामान्य माणूस भयग्रस्त झाला आहे. भारतातील जवळपास १७ –१८ कोटी लोकसंख्या असलेल्या समाजाच्या काही समस्या आहेत हे मान्य करायला जनमानस तयार नाही. ज्याला आपण मुख्यप्रवाह म्हणतो अशा राजकीय, सांस्कृतिक, साहित्यक, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात प्रतिनिधित्व नसल्यात जमा. त्यामुळे दखल कोणी घ्यायची? हाच मोठा प्रश्न उभा राहतो. डॉ. राजेखान शानेदिवान यांच्या या ग्रंथाने थोडीफार का होईना ही पोकळी भरून  काढण्याचे काम केले आहे.
                         
                                                                                                            --- अविनाश वर्धन
                                                                                                                        कोल्हापूर,
                                                                                                मो. ९९६०३०४२५४
पुस्तक :                                                                                                   
भारतीय मुसलमान : वर्तमान आणि भविष्य
लेखक - डॉ. राजेखान शानेदिवाण
अक्षर दालन, प्रकाशन, कोल्हापूर
पृ. १८४

किंमत : २२५ रु. 


Thursday, April 23, 2020

२३ एप्रिल - जागतिक पुस्तक दिन..


२३ एप्रिल...
         आज ‘जागतिक पुस्तक दिन’ आहे ते संध्याकाळी फेसबुक बघत असताना समजलं. हा दिन कधीपासून आणि का साजरा करतात हे जाणून घेण्यासाठी गुगल सर्च केल्यावर समजले की, जागतिक पुस्तक दिन हा १९९५ पासून साजरा केला जातो. लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा त्यामागे मुख्य उद्देश होता. मग २३ एप्रिल का? विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले. आणि तेव्हापासून हा २३ एप्रिल हा दिवस ‘‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो.  
            गेल्या १०-१५ वर्षात पुस्तकाचं व्हर्चुअल रूप निर्माण झाल्याने ‘Online’ वाचणाऱ्याची संख्या देखील मोठी आहे. मला मुख्यत: पुस्तकाची हार्डकॉपी वाचायला आवडते. पण गेल्या दोन-तीन वर्षात ब्लॉग अथवा फेसबुकवरील माहित नसलेल्या आणि प्रसिद्ध व्यक्तींचे अनेक लेख वाचायला मिळाले. ज्यांना आपले साहित्य पुस्तकरुपानं प्रकाशित करता येत नाही त्यांना हा व्हर्चुअल प्लटफॉर्म उपयोगी पडला. याचा फायदा जसा लिहणाऱ्याना मिळाला तसा तो वाचकांना देखील मिळाला. आता हेच बघा! ‘जागतिक पुस्तक दिना’च्या शुभेच्छा देखील याच नव्या व्हर्चुअल प्लटफॉर्मवर देतोय. शेवटी काय भावनांचं आदान-प्रदान झालं पाहिजे.
            एखाद्या व्यक्तीचं पुस्तक प्रेम किंवा वेड किती असू शकतं हे आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने नेहमी ऐकत आलोय. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी त्यांनी घर बांधलं. ‘राजगृह’ त्यांच नाव. बाबासाहेब लंडनहून जेव्हा आपल्या शिक्षणाचा कालावधी संपवून परतत होते त्यावेळी आपली जवळपास 300 पुस्तके त्यांनी ‘Thomas Cook and Sons’ या कंपनीकडून भारतात आणण्यासाठी पाठवली होती. पण या कंपनीने ज्या बोटीतून ही पुस्तके पाठवली होती त्या बोटीवर शत्रूंनी हल्ला केल्याने ती पुस्तके समुद्रात बुडाली. या गोष्टीचे त्यांना खूप वाईट होते. त्यांना अपघाती विमा मिळाला होता. पण त्या पैशापेक्षा पुस्तकं पाण्यात बुडाली याचं खूप दु:ख झालं होतं. बाबासाहेब जेव्हा दुसऱ्या वेळेस लंडनला आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेले त्यावेळी त्यांनी जवळपास 800 पुस्तके खरेदी केली होती. जेव्हा त्यांची ही पुस्तके भारतात आली त्यावेळी आपल्या दामोदर हॉलमधील ऑफिसमध्ये मावणार नाहीत म्हणून हॉलच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीत तळमजल्याची खोली घेतली. १५ लाकडी कपाटे तयार करून घेऊन त्यावर पुस्तके विषयावर लावून ठेवली. बसण्याची बैठक, लिहायचे टेबल, पुस्तकांची कपाटे यांची ठिकाणे महिन्या–दोन-महिन्यांनी बदलण्याचा बाबासाहेबांना छंद होता. लिहित असताना एकादा नवा संदर्भ हवा असेल आणि त्या संदर्भाचे कपाटातील पुस्तक मिळाले नाही तर ते तडक आहे त्या स्थितीत पुस्तकाच्या दुकानात जाऊन ते पुस्तक घेत. त्यामुळेच त्यांच्या ग्रंथालयात एकाच पुस्तकाच्या दोन-दोन, तीन-तीन प्रती असल्याची नोंद त्यांचे आद्य चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांनी केली आहे.
            पुस्तकावर जीवापाड प्रेम करणारी मला भेटलेली दुसरी व्यक्ती म्हणजे माझे महाविद्यालयीन गुरुवर्य आणि पीएच. डी. संशोधनाचे मार्गदर्शक जेष्ठ इतिहास संशोधक आदरणीय डॉ. रमेश जाधव. सरांचा वाचण्याचा व्यासंग दांडगा. जवळपास दहा हजारांच्यावर वर समृध्द अशी ग्रंथ संपदा. आणि केव्हाही घरी गेलो तर नेहमी वाचनात मग्न. बुद्धिमान आणि व्यासंगी असूनही बोलण्यात जराही अभिनिवेश नाही. प्रसिद्धीचा मोह नाही. ‘अतिशय नम्रपणा’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठळक पैलू. तो तर मी कॉलेजमध्ये असल्यापासून अनुभवलाय. मी एखादे पुस्तक वाचल्यावर त्यातील मला आवडलेला किंवा एखादी घटना सरांना सांगितली तर लगेच ते पुस्तक काढून त्या त्यातील मी सांगितलेला संदर्भ सरांनी दाखविलेला आहे. असे प्रसंग अनेकदा घडले आहेत. माझ्या दिशा समृद्ध करण्यात सरांचे मोठे योगदान आहे. आपली अनेक पुस्तके सरांना मला वर्गात आणून वाचायला दिली होती. शिवाय महाविद्यालयाच्या (न्यू कॉलेज, कोल्हापूर) ग्रंथालयात आपल्या नावावर कितीही पुस्तके घेण्याची मुभा ग्रंथपाल यांना सांगून मला दिली होती. सरांशी अनेक विषयावर बोलत असताना धनंजय कीर, य.दि.फडके, डॉ. विलास संगवे, रां.चि.ढेरे महाराष्ट्रातील अनेक प्रसिध्द साहित्यिक आणि विचारवंत यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल व साहित्याबद्ल माहिती मिळाली. त्यामुळे अनेक दुर्लक्षित पैलू समजून घेता आले. अशा प्रतिभावान व्यक्तिंचे मार्गदर्शन आणि सहवास लाभणे हेच मोठे भाग्याचे आहे. त्यांच्यामुळेच मी समृद्ध झालो. सरांमुळचे पुस्तके विकत घेण्याचा छंद लागला.  
            जागतिक पुस्तक दिन पुस्तक वाचूनच खऱ्या अर्थाने साजरा होऊ शकतो. आज सकाळी दि. के. बेडेकर यांचं ‘धर्मचिंतन’ हे पुस्तक पुन्हा एकदा चाळत होतो. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिलेल्या आठ-दहा ओळी मी जेव्हा-जेव्हा वाचतो तेव्हा-तेव्हा मला विचार करायाला प्रवृत्त करतात. त्या ओळी अशा...   
            ‘धर्म म्हणजे निव्वळ नैतिकता नाही. तसे असते तर नव्याण्णव टक्के माणसे धार्मिक असतात व तरी अनीती एवढी पसरलेली आहे, असे झाले नसते. ‘धर्म’ म्हणजे निव्वळ आध्यात्मिक विचार व साधना नाही. तसे असते तर सगळी धार्मिक माणसे आध्यात्मिक झाली असती; तसे दिसत नाही. धर्म म्हणजे निव्वळ समाजधारणेचे नियम नाहीत, समाजसेवेची स्फूर्ती व क्रिया नाही. तसे असते तर धार्मिक व्यक्तींनी व माणसांनी गजबजलेले समाज हिंस्त्र अन्यायांनी, संघर्षानी व संकटांनी ग्रस्त दिसले नसते.
            जेव्हा धर्माच्या ‘दास्या’चा प्रश्न आपण विचारात घेतो तेव्हा धर्माचे नैतिक, अध्यात्मिक व समाजसेवेला प्रवृत्त करणारे गुण आपण विचारात घेतो व त्यांचे वर्तमानातले व इतिहासातले अस्तित्व मान्य करतो, परंतु ते गुणच तेवढे न पाहता, धर्माचे अवगुण किंवा दोषही लक्षात घेतो. या दोषांमुळे धर्म ही भावना आणि प्रत्यक्ष संस्था, माणसांच्या मनाला दास बनवतात. माणसांना आग्रही, अहंकारी व प्रसंगी क्रूर बनवतात. या वास्तवाची आपण दखल घेतो. तशी दखल घेणे जरूरच आहे. ती दखल न घेणे हे भाबडेपणाचे तरी आहे किंवा दांभिकपणाचे आहे. धर्माच्या फक्त गुणांचा गौरव करणे म्हणजे धर्मदास्याचे वास्तव नाकारणे, वर्तमानात व इतिहासात घडलेल्या धर्मप्रेरित क्रूरतेला विसरणे होईल. हा विसर धर्मगौरवाच्या अभिनिवेशाने किंवा स्वार्थामुळे माणसांना पडतो. म्हणून धर्माच्या दोषांवर, धर्म भावनेचा अफुसारखा परिणाम होतो या धडधडीत सत्यावर भर देणे काही संदर्भात भाग पडते.”
जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!!   

Sunday, April 12, 2020

११ एप्रिल कॉ. शरद पाटील यांचा स्मृतिदिन...


11 एप्रिल, २०२०
कॉ. शरद पाटील यांचा ६ वा स्मृतिदिन...!
प्राच्यविद्यापंडीत कॉ. शरद पाटील यांनी आपल्या वैचारिक लेखानाने प्रस्थापित विचार विश्वाला हादरा तर दिलाच शिवाय नवी अन्वेषणपद्धती विकसित केली. जातवर्गस्त्रीदास्य यांच्या अंताची चळवळ उभी करत जात्यंतक समतावादी समाज उभारण्यासाठी  आयुष्याच्या अंतापर्यत एक जीवनदायी कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहिले. आज त्यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त सचिन माळी यांनी लिहिलेल्या ‘एकाकी आणि लोकाकी प्रज्ञासुर्य कॉ. शरद पाटील’ या पुस्तिकेतील काव्याने आदरांजली!                              

मी सूर्य रडताना पाहिलाय  
आतल्या आत अडखळताना पाहिला

फुले-आंबेडकरानंतर
कुणी भिडलंच नव्हतं जातीच्या डोलाऱ्याला
एखाद्या योध्यासारखं
ज्याने त्याने दर्शनाने
दार्शनिकाने
डोळ्यांना युरोपीयन झापड लावून
केली होती पाया आणि ‘इमल्या’ची गल्लत
भौतिकवादाचे द्वंद्वात्मक डोळे पडले होते गळुन

ज्ञानाच्या प्रांगणात
पोथ्या घेऊन फिरत होते
आधुनिक शंकराचार्य
वर्ग ब्रह्म जात 'मिथ्या’चा जप करत
नव्या चिंतनानंतर
नव्या तत्त्वज्ञानावर
दुरुस्तीवादाच्या नावाने लावला गेला होता कर्फ्यू
समदा आसमंत झाला होता अंध

त्या अंधपणाला कटघऱ्यात उभं करताना
आणि पोथीवादाचा पराभव करताना
भारतीय मागासलेपणाचा पाया
वर्ग की जात
असा भेदक सवाल करताना पाहिला

मी सूर्य रडताना पाहिला
मातृसत्तेच्या पराजयाचं
आणि पितृसत्तेच्या उदयाचं कोडं
महाकाव्याच्या अंतरंगातून शोधून काढताना
माय नित्तीचा जयघोष करताना
जातीव्यवस्थेला गाडताना
मनूला नडताना
आंबेडकरांशी तंटता तंटता
मार्क्सशी भांडता भांडता
दिग्नागच्या प्रेमात पडताना पाहिलाय

मी सूर्य रडताना पाहिलाय

मनाला दुर्लक्षून
जाणीव नेणिवेच्या द्वैतावर पांघरून टाकत
जे चालत राहिले पांघरून
एका पायाने
एका वाटेने
एका काठाने
जे पाहत राहिले
एका डोळ्याने
जे ऐकत राहिले
एका कानाने

त्यांना बहूप्रवाही अन्वेषणचे महादर्शन देत
आणि त्यांच्या प्रतिबिंबवादाला
आरसा दाखवता दाखवता
बिंबवादाचा हुंदका देताना पाहिलाय

मी सूर्य रडताना पाहिलाय  

किती हल्ले शरीराच्या पातळीवरचे
मनाच्या पातळीवरचे
तत्त्वज्ञानाच्या पातळीवरचे

हल्लेच नाही तर-  
हा उपेक्षेचा धनी
मौनाचे कट पचवत पचवत
एकाकी आणि लोकांचीपणाच्या द्वंद्वातून  
स्थितप्रज्ञासारखा चालताना पाहिलाय

मी सूर्य रडताना पाहीलाय  
देहाच्या अवयवांनी करावा
शरीराचा घात
तसे आप्तांनी केलेल्या जखमांना अंगावर लेवून
अविश्वासाच्या पानिपतातून जाताना
मुक्तीयुद्धात प्राण ओतणारा
खराखुरा कॉम्रेड पाहिला

मी सूर्य रडताना पाहिला

तत्त्वज्ञानाच्या डोळ्यातून ओघळलेला
व्यवहाराच्या पापणीत अडकलेला अश्रू
काळ वळवासारखा कोसळताना पाहिलाय

मी सूर्य रडताना पाहिलाय
आतल्या आत अडखळताना पाहिलाय.

-                                   सचिन माळी यांच्या ‘एकाकी आणि लोकाकी प्रज्ञासुर्य कॉ. शरद पाटील’ या पुस्तिकेतून साभार