Sunday, May 3, 2020

भारतीय मुसलमान : भारतीयत्वाच्या जाणीवेचा वेदनामय पुनर्शोध

भारतीय मुसलमान : भारतीयत्वाच्या जाणीवेचा वेदनामय पुनर्शोध  

जाने यह कैसा दौर है, जिसमें यह मुर्रत भी मुश्किल है
दिन हो अगर तो उसको लिखू दिन, रात अगर हो रात लिखू
            रफिक जकेरिया यांच्या लेखातून साभार....

            गेल्या दोन दशकापासून भारतातील मुस्लीम समुदायाच्या भारतीयत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत त्यांच्यावर ‘दुय्यम नागरिकत्व’ लादण्याचा जोरादार प्रयत्न चालू आहे. ‘देशप्रेम’ आणि ‘राष्ट्रीयत्व’  सिद्ध करून दाखवण्याची सक्ती केली जात आहे. अखलाक, पहलू खान, जुनेद यांच्या जमावाकडून झालेल्या हत्या व त्यांच्या हत्येचे सोशल मिडीयावर केले जाणारे निर्लज्ज समर्थन ही अलीकडील ताजी उदाहरणे आहेत. दिल्लीतील मुगल गार्डनचे नाव बदलण्याची मागणी, ताजमहलला उत्तर प्रदेशच्या पर्यटन यादीतून वगळण्याची कृती, सोबतच विशिष्ट हेतू समोर ठेवून समान नागरी कायद्याची केली जाणारी सततची मागणी, तीन तलाक, बुरखा पद्धती, बहुविवाह पद्धती, मदरशातून दिले जाणारे शिक्षण या विषयांना सतत नकारात्मक बाजूंनी चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवून सामाजिक स्वास्थ अधिकाधिक अस्थिर करण्याचे कारस्थान चालू आहे. आणि गंभीर बाब म्हणजे समाजात अशी नकारात्मकता पसरवण्यात ही यंत्रणा यशस्वी झालेली आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला भारतातील काही मोजका मुसलमान समुदाय धार्मिक कट्टरतावादाकडे झुकत आहे. चांगला बदल देखील सहसा स्विकारायला मुस्लिम समाज मन तयार होत आहे. जेव्हा तीन तलाक प्रथा सुप्रीम कोर्टाने कायद्याने बंद केली पण या निर्णयाच्या विरोधी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या विरोधात अपील केले. तीन तलाक प्रथा बंदीच्या कायद्यामध्ये ज्या अनेक तरतूदी आहेत त्याबद्दल मतभेद असू शकतात. पण महिलांचे अधिकार डावलत एकतर्फी पुरुषी वर्चस्व राखणाऱ्या या प्रथेचे समर्थन कसे केले जाऊ शकते? हा मोठा प्रश्न आहे. तसेच देवबंदहून काही दिवसापूर्वी एक फतवा जाहीर करण्यात आला होता ज्यामध्ये मुस्लिम स्त्रियांनी केस कापू नयेत व भुवया कोरी नयेत कारण शरीयत मान्यता देत नाही, असा आदेश देण्यात आला होता. वस्तुत: या घटना म्हणजे काळाची चाके उलटी फिरवण्याचाच प्रकार आहे. आणि आश्चर्य म्हणजे जे स्वत:ला बुद्धीजीवी म्हणवून घेणारे लोक आहेत तेदेखील धर्मातील अशा अतार्किक व अव्यवहारी गोष्टींबाबत बोटचेपी भूमिका स्वीकारून गप्प राहणे पसंत करतात. अशा विदारक स्थितीत आजचा भारतातील मुस्लिम समाज अडकला आहे.
असे असली तरी मुस्लिम समाजातील काही बुद्धीजीवी लोक या प्रश्नांचा अतिशय गांभीर्याने विचार करताना दिसत आहेत. मुस्लिम समाजाची वास्तविकता संशोधनाद्वारे जगासमोर मांडत आहेत. सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांच्या मुळापर्यत जाऊन त्यांचा वेध आहेत. अशा पद्धतीने भारतातील मुस्लिम समुदाच्यासर्वागीण बाजूंचा वैचारिक आणि वस्तुनिष्ठदर्शक आढावा घेण्याचा प्रयत्न प्रा. डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी संपादित केलेल्या “भारतीय मुसलमान : वर्तमान आणि भविष्य’ या पुस्तकात अनेक लेखांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती अक्षर दालन, कोल्हापूर या प्रकाशन संस्थेने २०१६ ला प्रकाशित केली आहे. पुस्तकाच्या शीर्षकातच भारतीयत्वाच्या जाणीवेचा पुरस्कार केला असून वर्तमानात भारतीय मुस्लिम नागरिकांवर दुय्यम नागरिकत्वाचा जो शिक्का जाणूनबुजून मारण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला हे शीर्षक चपराक देते. भारतीय मुसलमान हे जन्माने आणि कर्माने भारतीयच असल्याचा ‘भारतीय मुसलमान’ हे शीर्षक अधोरेखित करते.
हिंदीतील प्रसिद्ध वैचारिक मासिक ‘हंस’ ने ‘भारतीय मुसलमान : वर्तमान आणि भविष्य’ या नावाने अंक प्रसिद्ध केला होता. याच अंकातील निवडक लेखांचे मराठीमध्ये अतिशय आशयगर्भ भाषांतर प्रा. डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी केले आहे. प्रा. डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी विस्तृत अशी भूमिका मांडत भारतीय मुसलमानांच्या  सामाजिक-आर्थिक स्थित्तीचा आढावा घेतला आहे. भारतीय मुसलमानांच्या धार्मिक जाणिवांबद्दल ते लिहितात कि, “धर्माविषयीचे कोणतेही ज्ञान त्यांना नाही. तरीही त्यांची धर्मावर निष्ठा आहे.” वस्तुतः जगातील सर्वच धर्माचे अनुयायी धर्माविषयी अधिकृत माहिती नसताना, धर्मश्रद्धा मात्र तीव्रतेने जोपासत असताना दिसतात. पण इस्लाम धर्मियांवरच असा आरोप का होतो, कि ते जास्त कट्टरतावादी आहेत? या दुहेरी मानसिकता
जोपासणाऱ्या प्रवृत्तीच्या मूळापर्यत जाण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकामधून करण्यात आला आहे.
            डॉ. राजेखान शानेदिवाण भारतीय मुसलमानांच्या ‘भारतीयत्वा’बद्दल पोटतिडकीने लिहिताना अनेक प्रश्न उपस्थित करून वाचकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. “भारतातील बहुसंख्य मुस्लिम हे हिंदूच आहेत. हिंदू धर्मातील अनिष्ठ चालीरीती सोडून इस्लाममध्ये समतेवर असलेल्या तत्वज्ञानाचा स्वीकार इथल्या कनिष्ठ गणल्या गेलेल्या जातींनी केला. तसेच इथला जो बहुसंख्येने असलेला हिंदू समाज आहे त्यांच्यातील सर्वच चांगल्या–वाईट चालीरीती, रूढी, परंपरा ह्या आजच्या भारतीय मुसलमानांमध्ये आढळून येतात. मग त्यांना परके का समजायचे?” असा सवाल ते उपस्थित करतात. याबरोबरच भारतीय मुसलमानांची शैक्षणिक स्थिती, रोजगारातील स्थिती, उच्च-शिक्षणाची अवस्था, राजकीय स्थान, मुस्लिम स्त्रियांचा दर्जा यासारख्या अनेक सामाजिक पैलूंचा  तपशीलवार अगदी आकडेवारीसह ताळेबंद मांडतात.            
            या ग्रंथामध्ये भारतातील नामवंत संशोधक, अभ्यासक, साहित्यिक, विचारवंत व इतिहासकार यांचे लेख आहेत. सर्वच लेख संशोधनात्मक व मूल्यात्मक अन्वयार्थाच्या अंगाने अतिशय मूलगामी व चिंतनशील आहेत. या लेखांमध्ये भारतीय मुस्लिमांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबरोबरच वर्तमानातील समस्यांचा आढावा घेतला असून त्यातून बाहेर पडण्याचे मार्गही विषद केले आहेत.
            रफिक जकेरिया आपल्या ‘भारतीय मुसलमान’ या लेखामध्ये भारतातील हिंदू-मुस्लिम यांच्यातील संबंधामध्ये जो दिवसेंदिवस संघर्ष वाढत चालला आहे त्याचा आढावा घेतात. भारतीय मुस्लिमांचा प्रश्न हा मुस्लिमांसाठी जितका महत्त्वपूर्ण आहे तितकाच तो हिंदुच्यासाठी आहे, असे मत मांडून लेखाच्या सुरवातीलाच या गंभीर विषयाकडे लक्ष वेधतात. ते आपल्याला आलेल्या अनुभवातून मुस्लिमांना सांगतात की, ‘हिंदुंच्याबरोबर वाद घालणे आता निरर्थक आहे. कारण अशा वादामुळे विरोध अधिकच तीव्र होईल. (पृ.६५) मुस्लिमांनी ‘घेटो’ पासून सुटका करून घेऊन शांतता आणि  सौहार्दाचे वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नशील रहावयास हवे. आज मुस्लिमांची अवस्था बिकट आहे, पण मुस्लिमांना मार्गदर्शन करणारे कोणी सर सय्यद नाही.( पृ. ६६) अशी खंत ते व्यक्त करतात. ते  मुस्लिम नेतृत्वावर टीका करतात. कारण या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेपेक्षा आपल्या स्वार्थासाठीच मुस्लिमांचा वापर करून घेतला. त्यासाठी समाज मन अस्थिर ठेवले. यामुळे सामान्य जनतेचे नुकसानच झाले.  
            ‘एकविसावे शतक आणि इस्लाम’ या लेखात असगर अली इंजिनीअर यांनी आधुनिकतावादी मूल्यांच्या आधारे धर्माची चिकित्सा होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करताना जगातील कोणताही धर्म या चिकित्सक दृष्टीकोनातून सुटणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. कोणत्याही धर्मातील विचार व तत्त्वज्ञान हे तत्कालीन परीस्थितीतून निर्माण होतात. त्यामुळे बदलत्या काळात देशकालपरत्वे ‘धर्म’ नावाच्या सामाजिक संस्थेतदेखील परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे सूत्र त्यांच्या लेखात दिसते. आपण बुद्धिजीवी म्हणून घेत असू तर अधिकाधिक उन्नत होत जाणे आवश्यक आहे. ते लिहितात कि, “आपल्या वर्तमानकालीन धर्मविचारांवर भविष्यकाळाचा प्रभाव पडायला हवा. शरियतमधील निर्माण प्रक्रियेत मानवाचे जे काही योगदान आहे त्याला अपरिवर्तनीय समजणे दूरच राहो त्याला पवित्र सुद्धा समजणे ठीक नाही.” त्यांची ही भूमिका अतिशय क्रांतिकारी आहे. कारण धर्माच्या पवित्र्यावरच त्यांनी बोट ठेवले आहे. सर्वच धर्माची व धर्मग्रंथांची स्थापना मानवानेच केली आहे. त्यामुळे मानवाने निर्माण केलेल्या पावित्र्याच्या संकल्पना अपरिवर्तनशील कशा असू शकतील? धर्माच्या अनुयायांनी वरील विचार आत्मसात करून आत्मपरीक्षण करणे नितांत गरजेचे आहे. कारण धर्मभावना ही आपल्या समूहातील सदस्यांच्या बाबत सहानुभूती जोपासते मात्र इतर धर्मियांबद्दल भेदरेषा निर्माण करते, असे माझे स्पष्ट मत आहे. धर्माच्या अपरिवर्तनीय भूमिकेवर उपस्थित केलेला प्रश्न आणि धर्म चिकित्सेची केलेली मागणी ही या लेखाची महत्त्वाची बाजू आहे.   
            स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतातील मोठ्या समूहाला सांप्रदायिक बनविण्यात भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या  आणि अशा प्रकारच्या शेकडो संघटनांबरोबरच या सर्व संघटनांची मातृ संघटना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ पूर्णपणे यशस्वी झाली आहे. हिंदुत्वाच्या वरकरणी एकरूप भासणाऱ्या अजेंड्याखाली सामाजिक विषमता जोपासत सांप्रदायिक तेढ निर्माण करून मुस्लिम धर्मियांबाबत कायम संशयाचे वातावरण निर्माण  केले जात आहे. असगर वजाहत यांनी ‘भारतीय मुसलमान : वर्तमान आणि भविष्य’ या लेखात वरील परिस्थितीवर अचूक बोट ठेवले आहे. स्वातंत्र्यापूर्वी हिंदू-मुस्लिमांमध्ये बंधुभाव वाढीस लागावा म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आयुष्याच्या अंतापर्यत प्रयत्न केले. त्याला काही प्रमाणात यशही आले. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात उतरोत्तर तसे प्रयत्न झाले नाहीत. याबाबत ते लिहितात कि,  “स्वातंत्र्यानंतर मात्र अशा तऱ्हेचा कोणताही राष्ट्रीय कार्यक्रम बनू शकला नाही. ज्यामुळे हिंदू आणि मुसलमानांना एकत्र येण्यासाठी प्रेरणा मिळू शकेल.” (पृ. ४०) जे काही थोडेफार मुस्लिम लोक शिक्षण घेऊन प्रगती करू शकले ते बुद्धीजीवी सर्वसामान्य मुस्लिमांच्या जवळ जाण्यास कचरतात कारण त्यामुळे आपण जातीवादी ठरण्याची त्यांना भीती वाटते. त्यांचे हे निरीक्षण बोलके आहे. याचे कारण असे की, ‘सब घोडे बारा टक्के’ या म्हणीप्रमाणे सर्व मुस्लिम कट्टर जातीयवादी आहेत, अशी जनमानसिकता तयार करण्यात आलेले यश हे आहे. या परीस्थितीवर जर मात करायची असेल तर असगर वजाहत एक चांगला उपाय सुचवितात तो म्हणजे, ‘लोकशाहीवादी शक्तींच्या मजबुतीकरणाचा.” खरोखरच जर आपल्याला भारत एक राष्ट्र म्हणून उभे राहयाचे असेल तर १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो वैचारिक वारसा मिळाला होता तोच मजबूत करावा लागणार आहे. कारण प्रत्येक भारतीयाला एक जाणीव सतत लक्षात ठेवावी लागणार आहे, ती म्हणजे आपण एक नव्हतो पण आपल्याला राष्ट्र म्हणून उभे राहयचे आहे! प्रंचड मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रादेशिक आणि आर्थिक विषमता आहे. तरीदेखील आपण एकसंघ होण्याचा संकल्प केला आहे. भारतीय संविधानातील समाजिक न्यायाच्या मूल्यांवर निष्ठा ठेऊन आपल्यातील विषमतेवर मात करून बंधूभाव आपल्याला जोपासावयाचा आहे.
            नेसार अहमद यांनी आपल्या ‘भारतीय मुसलमान : सामाजिक आणि आर्थिक स्थिती’ लेखामध्ये मुसलमानांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचा आढावा घेतला आहे. यामध्ये एका व्यक्तीचे दरमहा खर्चाचे विवरण, वार्षिक उत्पन्न, बेरोजारीचे पश्न, रोजगारीचे प्रमाण, जमीनधारक लोक, शिक्षण आणि साक्षरतेचे प्रमाण, मुलांच्या शाळा गळतीचे प्रमाण, आरोग्य, भौतिक सुविधा, महिलांची स्थिती अशा सामाजिक अंगांचा हिंदू, ख्रिश्चन धर्मातील लोकसंख्येशी विविध शासकीय अहवालातील आकडेवारीच्या आधारे तुलना करून मुस्लिम समुदाय कसा परिघाबाहेर आहे, हे दाखविले आहे. राजकीय पक्ष अथावा संघ परिवार यांच्याकडून मुस्लिमांचा अनुनय केला जातो असा जो आरोप केला जातो त्या आरोपाला  नेसार अहमद यांनी सांख्यिकीय माहितीच्या आधारे खोडून काढले आहे. त्यांच्या मते जर खरोखरच राजकीय पक्षांनी मतांसाठी अनुनय केला असे मानले तर मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीवर त्याचे प्रतिबिंब उमटले असते पण दुर्देवाने तसे घडलेले नाही.      
            रिजवान कैसर यांनी ‘भारतीय मुसलमान : दशा आणि दिशा’ या लेखामध्ये महत्वाच्या वैचारिक द्वंद्वाकडे लक्ष वेधले आहे. तो म्हणजे मुस्लिमांनी मुख्य प्रवाहामध्ये सामील होण्याचा. रिजवान कैसर जो प्रश्न उपस्थित करतात तो महत्त्वपूर्ण आहे. तो असा, मुख्य प्रवाह कोणता? द्रविड संस्कृतीचा की आर्य संस्कृतीचा? सवर्णांचा की दलितांचा की अनुसूचित जमातींचा? उत्तर भारतीय मुख्य प्रवाह की दक्षिण भारतीय मुख्य प्रवाह? खरं तर हा वाद जुनाच आहे. पण आज देशात सर्वाना एका रंगात रंगविण्याचा जो डाव सुरु आहे  त्याला वरील प्रश्नांच्या आधारेच रोखता येऊ शकते. व्यक्तीचे सार्वभौमत्व आणि अभिव्यक्तीचे संरक्षण जो प्रवाह करतो तोच खरा मुख्य प्रवाह म्हणायला हवे. मग ही प्रक्रिया जगाच्या पाठीवर कोठेही सुरु असू दे. मात्र आपल्या देशात वर्तमान स्थितीत मुख्य प्रवाहाच्या व भारतीयत्वाच्या नावाखाली मुस्लिम, दलित, आदिवासी यांच्या सांकृतिक जीवनाला दुय्यम लेखून आपली विषमतावादी विचारसरणी लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रयत्नावर रिजवान कैसर यांनी प्रस्तुत लेखामध्ये हल्ला चढविला आहे. यावर मात करायची असेल तर, लहान-मोठ्या सांस्कृतिक प्रवाहांनी आपले योगदान द्यायला हवे. आपापली विविधता दर्शवत लोकशाहीनिष्ठ भारताच्या घटना आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या तत्वांना कोठेही हानी पोहोचणार नाही याचे भान सर्वांनी ठेवावयास हवे. तरच आपण हुकूमशाहीचे स्वरूप स्वीकारणाऱ्या मुख्य प्रवाहाला तोंड देऊ शकतो, असे मत मांडले आहे.     
            अब्दुल्ला बिस्मिल्लाह ‘भारतीय मुस्लिम मन’ या लेखात भारतीय मुसलमान कोणाला म्हणावे? आणि ते इतर समुदायापासून भिन्न का आहेत? या प्रश्नांचा वेध घेत भारतीय मुसलमानांचे मन जाणून घेताना दिसतात. मुसलमानेत्तर भारतीय लोकांमध्ये मुसलमानांकडे पाहण्याच्या दोन प्रतिमा तयार झाल्याच्या किंवा जाणूनबुजून तयार केल्याचे ते लिहितात. पहिली बाह्य प्रतिमा. जी लुंगी, दाढी, गोल टोपी यातून तयार होते. दुसरी अंतर प्रतिमा. ज्यामध्ये असहिष्णु, भांडखोर, पाकिस्तान समर्थक, हिंस्त्र, अशी आहे, चित्रपट, कथा, साहित्य यामध्ये चोर, दरोडेखोर, गुंड, मवाली, स्त्रियांची अब्रू लुटणारा हा दाढी व गोल टोपीवालाच दाखवला जातो. यातून मुस्लिमांची नकारात्मक प्रतिमाच जनमाणसामध्ये दृढ होत गेल्याची खंत ते व्यक्त करतात. यामुळे सर्वसामान्य
मुस्लिमाला दैनंदिन जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.  
            जोया हसन यांनी आपल्या ‘मुस्लिम महिला आणि मागासलेपण’ या लेखात भारतातील मुस्लिम स्त्रियांच्या मागासलेपणाच्या कारणांच्या मुळापर्यत वेध घेतला आहे. ‘मुस्लिम महिलांची सामाजिक स्थिती चांगली नसल्याचे नोंदवत ‘मुस्लिम व्यक्तिगत कायद्याने’ काही अधिकार दिले असले तरी पुरुषांच्या तुलनेत मुस्लिम स्त्रियांना अनेक व्यक्तिगत अधिकारांपासून वंचित ठेवल्याचा आरोप केला आहे.  दुसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न त्या उपस्थित करतात, तो म्हणजे कुराणामध्ये मुस्लिम स्त्रियांच्या संदर्भात काय म्हटले आहे? किंवा काय लिहिले आहे? या दृष्टिकोनातून मुस्लिम स्त्रियांच्या संदर्भात विचार करणे चुकीचे आहे. दुसऱ्या धर्मातील स्त्रियांबद्दल विचार करताना ‘धर्म’ केंद्रस्थानी असत नाही मग मुस्लिम स्त्रियांच्या बाबत ‘धर्म’ आडवा का येतो? हा प्रश्न अंतर्मुख करायला लावतो. तसेच ‘धर्म’ नावाच्या पुरुषी सत्ताकेंद्री वर्चस्वाला तो आव्हान देतो आहे. म्हणून लेखिका जोया हसन आणि अनुवादक व संपादक डॉ. राजेखान शानेदिवाण यांचे विशेष कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. कारण त्यांनी खूप मोठे धाडस दाखविले आहे.
            इम्तियाज अहमद यांचा ‘भारतीय मुस्लीम समाज : कमतरता व उपाय’ हा लेख आशय व वस्तुस्थितीपरकतेच्या कसोटीवर पाहता उच्च दर्जाची आशयगर्भ मांडणी करणारा आहे. हिंदू धर्मियांप्रमाणे दडपुन टाकणारी जातीय व्यवस्था जरी इस्लामध्ये नसली तरी जातीय स्तरीकरण व उतरंड असल्याचे ते मांडतात. मुस्लीम धर्मातील उच्च वर्णीयांचा ताबा सर्व क्षेत्रात असल्याचे ते आकडेवारीह मांडतात. सर्वसामान्य मुस्लीम समाज हा सर्वार्थाने एकजूट असतो असे लोक मानतात. पण इम्तियाज अहमद हा समज ‘भ्रम’ असल्याचे विवेचनाद्वारे सिद्ध करतात. मुस्लीम समुदाय हा आंतरिक स्वरूपाचे  विरोधाभासी जीवन जगतो. तो धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही शासनव्यवस्थेचा पुरस्कार करून तशा व्यवस्थेत राहू इच्छितो; मात्र स्वत:साठी लोकशाही मूल्यव्यवस्थेचा आग्रह धरीत नाही, या वास्तवावर नेमके बोट इम्तियाज अहमद यांनी ठेवले आहे. हे निरीक्षण मुस्लिम अनुयायांसाठी खरोखरच आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. कारण कोणताही समाज दुहेरी मानसिकता जोपासून प्रगती करू शकत नाही, ही वास्तविकता आहे.  
            कुरेशी एस.वाय. यांनी ‘इस्लाम, मुसलमान आणि कुटुंब नियोजन’ या लेखामध्ये मुस्लिमांच्या बहुपत्नी विवाह पद्धती, कुटुंब नियोजनाला असलेला इस्लामचा विरोध, अनेक मुलांना जन्म देण्याची पद्धती या आरोपांबाबत भारतासहीत जगभरातील अनेक मुस्लीम देशांतील कायद्यांचा व नियमांचा आधार देत वरील आरोप कसे बिनबुडाचे आहेत याचे स्पष्टीकरण केले आहे. कुराणमध्ये कुटुंब नियोजनाला विरोध करण्यात आलेला नाही. तर असुरक्षिततेची भावना असल्यामुळे अल्पसंख्यांक समाजामध्ये परिवार नियोजनाची संकल्पना राबविली जात नाही. कुटुंबनियोजनाचा संबंध शिक्षणाशी जोडलेला आहे. भारतातील ज्या राज्यांमध्ये  शिक्षणाचा  प्रसार झालेला आहे त्या राज्यांमध्ये कुटुंबनियोजनाचे प्रमाण वाढते आहे. इतर धर्मियांच्या तुलनेत मुस्लिमांमध्ये कुटुंब नियोजनाचे प्रमाण कमी आहे हे मान्य करून त्याची कारणमीमांसा करत नव्या वातावरणात मुस्लिम समुदाय सकारात्मकतेचा विचार करत आहे, हे अधोरेखित केले आहे. कारण लोकसंख्यावाढीमुळे निर्माण झालेले दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. याची जाणीव सर्वांना होत आहे.
            शकील सिद्दिकी यांनी ‘मदरशातील शिक्षण : परंपरा आणि आधुनिकता’ या  लेखात मुस्लिमांच्या मदरशांमधील शिक्षण पद्धतीचा ऐतिहासिक कालखंडापासून होत आलेल्या संक्रमणाचा विस्तृत आढावा घेतला आहे. मदरशांमधील शिक्षणपद्धतीकडे आज संशयाने पाहिले जाते. रूढीवादी, कट्टरपंथीय, आधुनिक शिक्षणपद्धतीच्या विरोधी भूमिका मदरशे कायम घेतात, अशी जनमानसात भावना रुजवली आहे. यामध्ये काही अल्प प्रमाणात तथ्यांश असले तरी मदरशांमधूनच साम्राज्यवादाच्या विरोधात पहिली प्रतिक्रिया उभारल्याचे सिद्दिकी सोदाहरण स्पष्ट करतात. अरब राष्ट्रांतील कितीतरी दार्शनिक, वैज्ञानिक आणि गणितज्ञ या शिक्षण व्यवस्थेतून उदयास आल्याचे ते सांगातात. सिद्दिकी यांनी अकबराने शिक्षणविषयक धोरण कसे राबवले होते याची विस्तृत चिकित्सा केली आहे. त्याबरोबरच मदरशांमधील शिक्षणाच्या नकारात्मक बाबींवरदेखील प्रकाश टाकला आहे. भारतात संस्कृत जशी मूठभर उच्चवर्णीय लोकांचीच ज्ञानभाषा राहिली अगदी तसेच अरबी, फारशी  भाषांबाबत सर्वसामान्य मुस्लिम लोकांचे झाले. मदरशांमधून गरिबांची मुले शिकत राहिली तर बादशहा आणि शासनकर्त्यांनी खाजगी शिक्षणाची व्यवस्था करून आपली मुले मदरशांमध्ये पाठवलीच नाहीत. प्रस्तुत लेख मदरशांमधील शिक्षणपद्धतीविषयी सतत नकारात्मक भूमिका घेणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. लेखकाने केवळ मदरशांमधील शिक्षणाचीच नव्हे तर सरस्वती, शिशू मंदिर व मिशनरी शाळांमध्ये अनुक्रमे आरएसएस व ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत असणाऱ्या पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमांची धर्मनिरपेक्ष आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समीक्षा व्हायला हवी अशी अपेक्षा केली आहे.
            एहसान जाफरी यांनी आपल्या ‘धार्मिक व राजकीय नेतृत्व’ या लेखामध्ये मुस्लिम समुदायातील धार्मिक व राजकीय  नेतृत्वाचा विकासाबरोबर त्यांच्यातील तात्विक विरोधाभास स्पष्ट केला आहे. आधुनिक शिक्षणाने भारावलेली सर सय्यद अहमद खान व त्यांच्या सहकाऱ्यांची एक विचारधारा तर मदरशातील शिक्षणाला आधारभूत मानणारी देवबंदची दुसरी विचारधारा यांचा परामर्श घेतला आहे. सर सय्यद अहमद खान यांच्या विचारातून जे  नेतृत्व उभे राहिले ते उच्चविद्याविभूषित आणि नव्या दृष्टीने भारावलेले होते. मात्र स्वातंत्र्य चळवळीच्या काळात काही घटना अशा घडल्या की, ज्याने प्रागतिक विचारांचा युवक वर्ग मुख्य प्रवाहापासून फारकत घेत उलेमांच्या मागे गेला. नंतरच्या काळात भारत-पाकिस्तानची झालेली फाळणी आणि स्वातंत्र्योत्तर काळात मतदानकेंद्री राजकारणाचा वाढलेला प्रभाव यामुळे देवबंद आणि इमाम यांचे महत्त्व वाढले. पर्यायाने राजकीय नेतृत्वाची वाढ खुंटली.  याचा थोडक्यात पण वास्तवदर्शी आढावा एहसास जाफरी यांनी घेतला आहे.    
            डॉ. राजेखान शानेदिवान यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या अनेक दुलर्क्षित पण महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे. याद्वारे मुस्लिम भावविश्व समोर आले आहे. या पुस्तकाची भाषाशैली त्याचा आकृतिबंध याची साहित्यिक दृष्टिने चिकित्सा करण्याची माझी पात्रता नाही मात्र या ग्रंथातून मुस्लिम समुदायाची सामाजिक-सांस्कृतिक आणि आर्थिक वास्तविकता समोर आली आहे ती महत्वाची आहे. सध्या भारतातील केवळ मुस्लिम समुदायच नाही तर दलित, आदिवासी समुदायांना देखील दुय्यम नागरिकत्व लादले जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी आजही मुस्लिमांना भारताचे नागरिक असल्याचे सिद्ध करावे लागावे, हीच फार मोठी शोकांतिका आहे. संसदेने नुकताच पारित केलेल्या CAB, NRC आणि NPR च्या कायद्यांनी संपूर्ण भारतातील राजकारण ढवळून निघाले आहे. आसामच्या NRC ने जी भयानक स्थिती समोर आणली आहे त्याने वेगळीच चिंता करायला लावली आहे. कोरोनासारख्या भयानक महामारीने संपूर्ण जग चिंताग्रस्त असताना भारतात तबलीगी जमातीने कोरोना पसरवला आणि पालघरमध्ये दोन साधूंची झालेली हत्या यावरून मुस्लिम समुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात ज्या पद्धतीने ओढण्याचा प्रयत्न झाला त्याने सर्वसामान्य माणूस भयग्रस्त झाला आहे. भारतातील जवळपास १७ –१८ कोटी लोकसंख्या असलेल्या समाजाच्या काही समस्या आहेत हे मान्य करायला जनमानस तयार नाही. ज्याला आपण मुख्यप्रवाह म्हणतो अशा राजकीय, सांस्कृतिक, साहित्यक, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात प्रतिनिधित्व नसल्यात जमा. त्यामुळे दखल कोणी घ्यायची? हाच मोठा प्रश्न उभा राहतो. डॉ. राजेखान शानेदिवान यांच्या या ग्रंथाने थोडीफार का होईना ही पोकळी भरून  काढण्याचे काम केले आहे.
                         
                                                                                                            --- अविनाश वर्धन
                                                                                                                        कोल्हापूर,
                                                                                                मो. ९९६०३०४२५४
पुस्तक :                                                                                                   
भारतीय मुसलमान : वर्तमान आणि भविष्य
लेखक - डॉ. राजेखान शानेदिवाण
अक्षर दालन, प्रकाशन, कोल्हापूर
पृ. १८४

किंमत : २२५ रु. 


1 comment:

  1. अत्यंत विस्तृतपणे विवेचन केले आहे. डॉ. राजेखान शानेदिवाण यांची मुस्लिमविषयक भूमिका स्पष्ट आहे. ती प्रागतिक आहे. सदरील पुस्तकातील विविध लेखांमध्ये याचीच प्रचिती येते. अविनाश वर्धन यांनी प्रत्येक लेखाचे विश्लेषण करून स्पष्ट केले आहे की दुय्यम नागरिकत्वाचे राजकारण हे एका समुदायापुढे अनेक अडथळे निर्माण करीत आहे.

    ReplyDelete