महाराष्ट्रातील प्रसिद्ध पाक्षिक 'परीवर्तनाचा वाटसरू', अंक २३ वा - १ ते १५ एप्रिल, २०१७, पृ. २९-३२,३५., ISSN :2250-3145, याध्ये हा लेख प्रसिद्द..
देश नव्हे तर युद्धविरोधी गुरमेहर कौर
------------------------------------------------------------------------------------------------------------
“माणसे
युद्ध मान्य का करतात? त्यांनी ते (तसे ) मान्य का करू नये? मानव युद्धाला मान्यता
देण्याचे बंद करील अशी अशा बाळगायला काही आधार आहे का? आणि युद्ध जगातून नाहीसे
करावयाचे माणसांनी ठरविले तर ते कसे करता येईल?” - बर्ट्रांड रसेल (‘Principles of Social Reconstruction’)
सामाजिक घटनांचे लवकर विस्मृतीकरण होणे हे भारतीय
समाजमनाचे वैशिष्ट्य राहिले आहे. ‘गुरमेहर
कौर’ ही अशीच एक व्यक्ती गेल्या महिन्यात राष्ट्रीय राजकारणाच्या चर्चेच्या
केन्द्रस्थानी होती. महिनाभराच्या कालावधीत ती देखील विस्मृतीच्या पटलावर जात आहे.
फेबुवारी २०१७ चा शेवटचा आठवडा राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी ‘गुरमेहर कौर’ वरच
खर्ची घातला. मात्र तिने उठविलेल्या मूळ मुद्याला बाजूला सारून ‘राष्ट्र्भक्ती’ व ‘देशप्रेमा’चीच
चर्चा जास्त केली. ‘गुरमेहर कौर’ व ‘रामजस कॉलेज’चे प्रकरण थांबते न थांबते तोपर्यंत
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एम.फील. करणाऱ्या विद्यार्थ्यांने आत्महत्या
केल्याची बातमी आली. प्रथम दर्शनी ती आत्महत्या नसून हत्या असल्याचे म्हटले जात
आहे. ते काहीही असले तरी इमील डूरखाइमच्या मतानुसार आत्महत्या ही सामाजिक घटना
असते; हा सिद्धांत जर आपण स्वीकारला तर मुथूकृष्णनचा मृत्यू हा सामाजिक व्यवस्थेचा
परिणाम आहे; या निष्कर्षांप्रत यायला काहीच हरकत नाही.
रोहित वैमुला, कन्हैया कुमार, नजीब,
गुरमेहर कौर आणि मुथूकृष्णन या सर्वांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे ते
विद्यार्थी असल्याचा. रोहित वैमुला, नजीब, कन्हैया कुमार यांचे विषय आता मागे पडले
आहेत वा समाज मनाच्या दृष्टीने ते जुने झाले आहेत. आजकाल सोशल मिडीयाचा वापर करून
कोणालाही अभिव्यक्त होण्याचा एक मोठा पट उपलब्ध झाला आहे. या सोशल मिडीयावर
अभिव्यक्त होण्यावर कोणचेही बंधन अथवा मर्यादा नाही. आजची तरुणाई बिनधास्तपणे
राजकारण, अर्थकारण, समाज, संस्कृती व दैनंदिन घटणाऱ्या घटना यावर आपली मते मांडत
आहे. अर्थात या सर्वांनी व्यक्त केलेली सर्वच मते बरोबर असतात असे नाही किंबहुना ही
मते बरोबर असली तरी पटलीच पाहिजेत याचेही बंधन नाही.
गुरमेहर कौर या २०-२१ वर्षाच्या
मुलीने युट्युब वर व्हिडीओद्वारे व्यक्त केलेल्या मतावरून ‘राष्ट्रभक्ती’ आणि ‘राष्ट्रप्रेम’ यांचे जे वादंग
उठले ते निश्चितच चिंता व्यक्त करणारे आहे. निमित्त होते रामजस कॉलेजमधील प्रकरण. दिल्ली
युनिव्हर्सिटीतील रामजस कॉलेजमध्ये दि.२१ व २२ फेब्रुवारी २०१७ रोजी “Culture of
Protest” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रामध्ये ‘विरोधाची संस्कृती’
हा मुख्य विषय घेऊन नामवंत अभ्यासक आपले विचार मांडणार होते. या चर्चासत्रामधील
एका सत्रात जेएनयु मधील पीएच.डी. संशोधक विद्यार्थी उमर खालिद ‘The War in
Adivasi Areas’ या विषयावर बोलणार होता. तर All
India Students Association (AISA) ची सदस्य व जे.एन.यु मध्ये एम.फील करणारी शेहला
रशीद ही विद्यार्थिनी या चर्चासत्राला
उपस्थित राहणार होती. उमर खालिद वर ‘देशद्रोहा’चा आरोप असून तो सध्या बेलवर बाहेर
आहे. पण गेल्या वर्षभरात त्याच्यावर आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलेले नाही.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP)
कार्यकर्त्यांनी उमर खालिद व शेहला रशीद यांच्या उपस्थितीला आक्षेप घेत त्यांना रामजस
कॉलेजमधील चर्चासत्रास येण्यास विरोध केला. कारण उमर खालिद वर देशद्रोहाचा आरोप
आहे. चर्चासत्राच्या संयोजकांनी ही बाब लक्षात घेतली व उमर खालिदचे चर्चासत्राला
येणे रद्द केले त्यामुळे उमर खालिद रामजस कॉलेजमध्ये गेलाच नाही. मात्र चर्चासत्रामध्ये
दुसऱ्या वक्त्यांचे भाषण सुरु असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP)
कार्यकर्ते गेले व त्यांनी कार्यक्रम बंद पाडला. सेमिनार हॉलमधील विद्यार्थी व
विध्यार्थिनींना मारहाण केली. यामध्ये काही विद्यार्थ्यांना गंभीर इजा झाल्या.
त्यानंतर दुसऱ्या बाजूने म्हणजेच All India Students Association (AISA) च्या वतीने
या घटनेच्या विरोधात घोषणाबाजी करत ‘मार्च’ काढण्यात आला. या मार्चवर दगडफेक
करण्यात आली. पोलिस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकाविरुद्ध गुन्हा
नोंदविला आहे. त्यानंतरचा सगळा घटनाक्रम जो आहे तो मन सुन्न करणारा आहे.
वरील सर्व प्रकार गुरमेहर कौर पाहत
होती. ती दिल्ली युनिव्हर्सिटीतील लेडी श्रीराम कॉलेजची विद्यार्थीनी असून ती
कोणत्याही विद्यार्थी संघटनेत कार्यरत नाही. मात्र एक विद्यार्थिनी म्हणून तिने
ज्या घटना पाहिल्या; त्यावर आपले मत व्यक्त केले. तिने आपल्या भावना युट्युबवर कार्डच्या
माध्यमातून व्यक्त केल्या. त्या अनेकांच्या मनाला झोंबल्या. तिने २२ फेब्रुवारी
२०१७ रोजी फेसबुक प्रोफाईल बदलले; व ‘Save DU Campaign’ सुरु केले. रामजस कॉलेज
मधील घटनेच्या विरोधात तिने आपली भूमिका मांडली.
I am a
student from Delhi University.
I am not afraid
of ABVP.
I
am not alone.
Every
student of India with me. अशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
खरं तर ‘I am not
afraid of ABVP’ हेच एक वाक्य या चार वाक्यातील महत्वाचं आहे. ABVP ला हेच वाक्य जास्त
झोंबलं असावं. तेही आक्रस्ताळेपणा न करता, मूकपणे अभिव्यक्त केललं. हातात फक्त एक निषेधाचा फलक घेऊन.
लोकशाही व्यवस्थेमधील विरोधी मत व्यक्त करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग कोणताही
नसेल. या प्रकाराने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता
निर्माण झाली त्यांच्या सायबर सेलने म्हणा अथवा त्यांच्याशी संबंधित व्यक्तींनी गुरमेहर
कौरवर लक्ष केंद्रीत केले. रामजस कॉलेजचा मुद्दा राहिला बाजूलाच आणि गुरमेहर कौरने
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधी मत व्यक्त केले म्हणून तिलाच टार्गेट
करण्यात आले. इतकेच नाही तर ‘भारत माता की जय’ म्हणणाऱ्या तथाकथित संस्कृती
रक्षकाच्या ठेकेदारांनी तिच्यावर अर्वाच्य शिवीगाळ करून बलात्काराच्या धमक्या
दिल्या.
केवळ विरोधी
मत व्यक्त करून थांबतील तर ते कसले ABVP वाले. इथून पुढचा जो राडा झाला तो ABVP
च्या वैचारिक परंपरेच्या इतिहासाला धरूनच झाला. त्यांनी एक वर्षापूर्वीचा गुरमेहर
कौर ने यु.ट्यूब वर अपलोड केलेला व्हिडीओ बाहेर काढला. हा व्हिडीओ चार मिनिटांचा
आहे. त्यामध्ये गुरमेहर कौर ने ३६ पोस्टर दाखविले होते. ज्यातील १३ नंबरच्या
पोस्टरमध्ये तिने लिहले होते, ‘Pakistan did not kill my Dad. war killed Him.’ या
पोस्टरचा संदर्भ आहे तो १९९९ च्या कारगिल युद्धाचा. गुरमेहर कौर त्यावेळी फक्त २
वर्षांची होती. गुरमेहर कौर चे वडील कॅप्टन मनदीप सिंग यांना भारत–पाकिस्तान मधील
झालेल्या कारगील युद्धामध्ये वीरमरण आले. वडिलांच्या प्रेमापासून वंचित असलेली
गुरमेहर मनामध्ये तिरस्काराची भावना घेऊन जगत होती. याच तिरस्काराच्या भावनेतून तिने
६ वर्षाची असताना एका बुर्केवाल्या महिलेला मारण्याचा प्रयत्न केला होता. कारण
तिला असे वाटत होते की वडिलांच्या मृत्युला हेच लोक जबाबदार आहेत.
शिक्षणाने माणूस विनयशील व सुशिक्षित
बनतो असे म्हणतात, याच नियमानुसार गुरमेहर कौर जसजसी शिक्षण घेत गेली तस तसे
तिच्या भोवतालच्या परिस्थितीचे आकलन करून घेण्याची क्षमता वाढली. त्यातून
वडिलांच्या मृत्यूविषयीचे नेमके कारण काय? याचे तिला आकलन झाले. खरं तर तिचे वय
पाहता असा सकारात्मक झालेला बदल अखंड मानवीयतेचे दर्शनच घडविते. वडीलांच्या
मृत्यूचे खरे कारण समजल्यावर युध्द विरोधी भूमिका घेते आणि दोन देशातील युद्धालाच आव्हान
देत शांततामय मार्गाचा अवलंब करावा अशी अपेक्षा व्यक्त करते आहे. यासाठी तिचे
कौतुक करायला हवे. भारतीय संस्कृतीच्या शांततामय परंपरेला तीची कृती साजेशीच आहे.
२८ एप्रिल २०१६ रोजी हिंदी आणि इंग्रजीमध्ये हा व्हिडीओ यु.ट्यूब वर अपलोड केला
होता. त्यात ती म्हणते कि, “जब वो दो साल कि थी तो उसके पिता शहीद हो गए, छह साल
कि थी तो एक बुर्केवाली को मारने का भी प्रयास किया क्योंकी उसे लगता था कि मेरे
पिता कि मौत कि जिम्मेदार वही है। तब उसकी मां ने समझाया कि पाकिस्तान ने नहीं
मेरे पिता को जंग ने मारा है। उससे यही लिखा कि नफरत को भुलना सीख लिया। यह आसान
नहीं था लेकिन बहुत मुश्कील भी नहीं। अगर मैं ऐसा कर सकती हुं तो आप भी कर सकते है
आज मैं भी अपने पिता कि तरह एक सैनिक हुं। मै भारत और पाकिस्तान के बीच शांती के
लिए लडती हुं क्योंकि अगर युद्ध नहीं हुआ होता तो मेरे पिता आज मेरे पास होते।”
खरं तर २८ एप्रिल २०१६ रोजीचा हा
व्हिडीओ जवळपास एक वर्षांपूर्वीचा आहे. याची, वर्षापूर्वी चर्चाच नव्हे तर त्याची
साधी दखलही कोणी घेतली नव्हती. मात्र गुरमेहर कौर ने रामजस कॉलेजच्या घटनेवर आपली मूक
प्रतिक्रिया व्यक्त केली. तिच्या या प्रतिक्रियेच्या विरोधात “Pakistan did not kill my Dad. war killed Him.”
हा मजकूर असलेला केवळ एकच फोटो संपूर्ण देशभर सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल
करण्यात आला. याचा परिणाम असा झाला कि, कोणतीही शहानिशा करता भारतातील नामवंत
व्यक्तींनी गुरमेहर कौर च्या विरोधी मते व्यक्त केली. यामध्ये सर्वात आघडीवर होते केंद्रीय
मंत्री किरण रिजिजू. यांनी ‘या मुलीला कोणीतरी misgudie केल्याचे tweet केले. व्यंकय्या नायडू
याला ‘Freedom of Expression’चा गैरवापर म्हणाले. तर आणखी
एक मंत्री प्रताप सिंन्हा यांनी गुरमेहर कौर ची तुलना प्रत्यक्ष दाऊद इब्राहीमशी
करून टाकली. त्यातच भरीत भर म्हणजे क्रिकेट पटू वीरेंद्र सेहवाग, कुस्तीपटू
योगेश्वर दत्त व चित्रपट अभिनेता रणदीप हुडा
यांनी ही यामध्ये उडी घेतली व गुरमेहर कौरची खिल्ली उडवली. त्यामध्ये वीरेंद्र
सेहवागने उथळ पोष्ट टाकली. गुरमेहरचे नाव न घेता म्हटले कि “I Didn’t Score Two
Triple Centuries. My bat did” यामुळे
गुरमेहर कौर च्या फेसबुक व ट्वीटर अकौटसवर लाखो प्रतिक्रिया आल्या. यामध्ये तिच्यावर
शिव्यांची लाखोली वाहण्यात आली तर काही जणांनी बलात्काराची धमकी देखील दिली. संपूर्ण
देशभरातून तिच्या बाजूने व विरोधात प्रतिक्रियांचा पाऊस पडला. तिला देशद्रोही
ठरवण्यापर्यंत काहीजणांची मजल गेली. तिच्या मतांशी सर्वांनी सहमत असले पाहिजेच
असेही काही नाही. पण तिला मत मांडण्याचे असलेले स्वातंत्र्य मात्र कोणीही हिरावून
घेऊ शकत नाही. तिने युद्धासंबंधीचा उपस्थित केलेला मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी कधीच
आला नाही. युद्धाला विरोध करणारी गुरमेहर काही एकटी नाही. जगभर हजारो लोक, संघटना
याच्या विरोधात कार्यरत आहेत. म्हणून कोण त्यांना देशद्रोही ठरवत नाहीत. युद्धातून
विनाशच होते हे वैश्विक सत्य आहे. युद्ध मानवीयतेचे दुश्मन आहे. दोन देशांमधील युद्धसदृश
सबंध हे काही कायमस्वरूपी नसते. ते कधी मैत्रीत तर कधी शत्रुत्वात रुपांतरीत होत
असते. ही सतत बदलत जाणारी प्रक्रिया आहे. दोन्ही देशातील लोक आपल्याला मातृभूमीच्या
संरक्षणासाठी लढत असतात. त्यामुळे युद्धाची नैतिक मूल्यात मोजदाद करता येणं शक्य
नाही. युद्धात मेलेली कोणतीही व्यक्ती शेवटी मानवच असते. तिथे मरतो तो मानव. ना कि
कोणता देश. कोणताही देश युद्ध जिंकू दे; हरतो तो मानव. कारण राष्ट्र नावाच्या एका
बुरख्याखाली प्राणाची आहुती द्यायला माणूस तयार होतो. माणसाच्या संरक्षणासाठी,
हितासाठी, एकूणच राष्ट्राच्या कल्याणासाठी माणसं जिवंत राहणे गरजेचे असते. म्हणूनच
गुरमेहर कौर ने युद्धविरोधी घेतलेली भूमिका अभिनंदनीय ठरते. ती देशाच्या
अखंडतेच्या किंवा देशाच्या विरोधी जाणारी भूमिका ठरत नाही. तिने एका फलकावर लिहिले
होते...
I am fight
for Peace
Between
India and
Pakistan
या
मजकुरामध्ये कुठे देशद्रोह दिसतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता नांदावी म्हणून
एखादी व्यक्ती वा संघटना काम करत असेल तर यात काय चुकले? मात्र आठवडाभराच्या
गोधंळानंतर गुरमेहर कौर ने स्वत: या संपूर्ण प्रकरणापासून लांब जात असल्याचे
सांगितले. ती म्हणाली कि, “मैं केंपेन से खुद को अलग कर रही हुं। आप सभी को बधाई।
मुझे अकेला छोड दे। मुझे जो कहना था वो मैंने कह दिया। एक चीज जो निश्चित है कि अब
हम हिंसा करने या किसी को धमकी देने से पहले दो बार सोचेंगे और इसलिए मेरा विरोध
था। ये कैंपेन छात्रो के लिए है मेरे लिए नहीं। मेरे साहस और बहादुरी पर सवाल उठा रहे
है उनके लिए कहुंगी कि मैंने जरुरत से ज्यादा हिम्मत दिखाई है।”
खरोखरच गुरमेहर कौरने गरजेपेक्षा
जास्त हिम्मत दाखवून तमाम भारतीयांना व विद्यार्थ्याना एक आशेचा किरण दाखवला आहे. जमावाच्या
वा झुंडीच्या माध्यमातून विरोध करणे सोपे असते कारण जमावाला चेहरा नसतो. गुरमेहर कौर
ने एकाकी लढा देत संपूर्ण व्यवस्थेला विचार करायला प्रवृत्त केले आहे. आपल्या अभिव्यक्तीचा
डंका पेटविला आहे. पण आठवडाभरातच तिला ज्या व्यक्तिगत पातळीवर अश्लील स्वरूपात
प्रतिक्रिया आल्या त्यातून ती उद्विग्न झाली. ‘भारतमाता की जय’, वंदे मातरम’ म्हणायचं
आणि ह्याच भारतमातेच्या एका मुलीला बलात्काराच्या
आणि खुनाच्या धमक्या द्यायच्या. स्त्रीला मातेचा दर्जा देणारी हीच का आपली महान
भारतीय संस्कृती.
गुरमेहर कौर
ने इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे. तेच अनेकांच्या पचनी पडलेलं
नाही. “स्त्रियांना काय कळतं” असे समजणारी आपली भारतीय मानसिकता यामुळे दुखावली
गेली आहे. अशा स्त्रीयांना समाज चांगली वागणूक देत नाही. धमक्या दिल्या जातात
किंवा घरातील इतरांवर दबाव आणून त्यांची तोंडे बंद केली जातात. गुरमेहर कौरने आपली
अभिव्यक्ती न डगमगता मांडली. बहूसंख्यांकांना ते जरी रुचलं नसलं तरी ते वास्तव
होतं ते तिनं मांडलं. समाजच मानसिकदृष्ट्या सदृढ झालेला नाही त्यामुळे गुरमेहर कौर
चे धाडस व कर्तृत्व आपल्या समाजाच्या मानसिक आकलनापलीकडचे आहे.
भारतीय
घटनेचे कलम १९ अन्वये प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळालेला ‘Freedom of Expression’ चा मूलभूत अधिकार हिरावून तर घेतला जात नाही ना? अशी परिस्थिती निर्माण
झाली आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारवर आहे.
पण सरकारमधील मंत्रीच जर एक पक्षीय व विरोधी भूमिका घेत असतील तर दाद कुणाकडे
मागायची हा मोठा प्रश्न आहे. अलीकडे कोणी काय खावे?, ‘कोणी कोणती कपडे घालावीत!’, ‘कोणावर
प्रेम करावं!’ यावरून घडलेल्या हिंसात्मक घटना ताज्या आहेत. हैदराबाद मधील रोहित
वैमुला प्रकरण, जे.एन.यु.मधील कन्हैया कुमार व उमर खालिद प्रकरण, जे.एन.यु.मधील
नजीब चे अपहरण, पुण्यातील FTII मधील आंदोलन, गुजरात मधील उना घटना या सर्व घटनांमधून
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न समोर आला आहे. एकजिनसी विचारसरणी थोपविण्याचा घाट
घातला जात आहे. भारताच्या बहुसांस्कृतिक रूपाला व त्याच्या एकजिनसीपणाला नख
लावण्याचा जोरदार प्रयत्न होताना दिसतो आहे. रामजस कॉलेजमधील सेमिनारचा विषय होता
‘Culture of Protest’ अखिल भारतीय
विध्यार्थी परिषदेने या सेमिनारच्या विरोधारात राडा घालून आपल्या सांस्कृतिक अध:पतनाची
साक्ष देऊन आपल्याजवळ लोकशाही पद्धतीने विरोध करण्याची संस्कृतीच नाही हेच सिद्ध केले.
त्यामुळेच दिवसेंदिवस होत जाणारा अभिव्यक्तीचा संकोच हे भारतीय लोकशाही व्यवस्थेसमोरील
मोठे आव्हान आहे.
*******
अविनाश शिवाजी वर्धन
संशोधक विद्यार्थी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास
केंद्र,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
मो. ९९६०३०४२५४.
No comments:
Post a Comment