महात्मा
फुले याना अभिवादन करताना...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्ध,
संत कबीर यांच्यानंतर आपले गुरु महात्मा फुले यांना मानले होते असे मी लहानपणापासून
ऐकत होतो. महाविद्यालयात आल्यानंतर महात्मा फुले यांचे साहित्य वाचले. पण त्यावेळी
महात्मा फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याची उंची म्हणावी तितकी समजली नव्हती.
मात्र समाजशास्त्र विषयामध्ये पदवी आणि पदवीत्तर शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक
समस्या, समाज व्यवस्था, सामाजिक नियंत्रण, सामाजिक परिवर्तन म्हणजे काय? याचे जसजसे
समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अवलोकन होत गेले तसतसे महाराष्ट्रामध्ये झालेल्या
समाजसुधारणेच्या चळवळीचे महत्त्व समजले. केवळ समाजसुधारणा नव्हे तर विषमतेवर
आधारित असलेल्या समाजव्यवस्थेच्या विश्वासार्हतेला तडा देत नवी समाज व्यवस्था कशी
असावी याचे आदर्श प्रारुप ‘सत्यशोधक समाजा’च्या माध्यामातून मांडले शिवाय ते साध्य
करण्याचा कृती कार्यक्रमही महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले या
दांपत्याने दिला. म्हणूनच आधुनिक भारतातील सामाजिक आणि सांकृतिक परिवर्तनाच्या
क्रांतीचे जनक म्हणून महात्मा फुले यांचा उल्लेख करावा लागतो.
महात्मा फुलेंचा जन्म १८२७ सालचा. १८१८
साली ब्रिटीशांनी पेशवाईचा अंत करून केवळ ९-१० वर्षेच झाली होती. मात्र पेशवाईच्या
काळात शूद्र व अतिशूद्रांवर झालेल्या अन्यायाच्या, अत्याचाराच्या घटना ताज्या
होत्या. राज्यकर्ते बदलेले असले तरी सामाजिक व्यवहार तसाच जातीयवादी होता. महात्मा
फुले यांनी ख्रिस्ती मिशनरी शाळेत शिक्षण घेतले असल्यामुळे आधुनिक मूल्यांची
नव्याने ओळख झाली होती. शिक्षणाचे महत्त्व त्यांना समजले होते. त्यामुळे दलित, शोषित,
शूद्र लोकांच्या अवनतीला अज्ञान आणि निरक्षरता हे सर्वात मोठे कारण असल्याचे
त्यांनी सांगितले. दलित, शूद्र आणि अतिशूद्र व महिलांवरील केल्या जाणाऱ्या अमानुष व अमानवीय
अत्याचाराचे निर्लज्ज सर्मथन करणारी हिंदू समाजव्यवस्था छोट्या-छोट्या सुधारणांमुळे
बदलणार नाही. त्यासाठी संपुर्ण व्यवस्थेमध्येच अमुलाग्र परिवर्तन करण्याची गरज
असल्याचे मत त्यांनी मांडले होते.
महात्मा फुले यांनी १८४८ साली भारतातील मुलींची
पहिली शाळा पुण्यातील भिडेवाड्यात तर १८५१ साली अस्पृश्य मुलांसाठी वेगळी शाळा सुरु
केली. आपल्या निरक्षर पत्नीला साक्षर करून स्त्री-सन्मानाचा आदर्श घालून दिला.
सावित्रीबाईना शैक्षणिक कार्यामध्ये सहभागी करून घेतले. इतकेच नव्हे तर २१ व्या
शतकातही समाजमन स्वीकारायाला तयार होणार नाही अशा सामाजिक प्रथांच्या विरोधात त्या
काळी फुले दांपत्य उभे राहिले. केशवपन प्रथेच्या विरोधात न्हाव्यांचा संप घडवून
आणला. अनाथ व परितक्त्या महिलांसाठी महिला सदन सुरु केले. कुमारी माता व विधवा मातांच्या
मुलांच्या संगोपनासाठी बालसदनाची स्थापना केली. अस्पृश्य लोकांसाठी आपला पाण्याचा
हौद खुला केला. अपत्य नाही म्हणून दुसऱ्या लग्नासाठी सतत तगादा सुरु असताना
घराबाहेर पडले व विधवा महिलेच्या मुलास दत्तक घेतले. त्यास चांगले शिक्षण देऊन
डॉक्टर केले. त्यांचे हे कार्य म्हणजे नव्या सामाजिक पुर्नरचनेची सुरवात होती.महात्मा
फुले यांनी विविध सामाजिक प्रश्नाच्या संदर्भात घेतलेल्या भूमिका ह्या आज थक्क
करून सोडतात.
ह्या क्रांतिकारी कार्यामुळेच बाबासाहेब आंबेडकर
यांनी त्यांना आपले गुरु मानले. शिवाय बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी सुभेदार
हे महात्मा फुले यांचे मित्र होते. (कीर धनंजय, २०१२, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पृ.१७.) महात्मा फुले यांच्याशी
असलेल्या मैत्रीमुळे सामाजिक परिवर्तनासंबंधी असणारी जाणीव रामजी सुभेदार यांच्यामध्ये
अधिक तीव्र व प्रगल्भ झाली असण्याची शक्यता आहे. तीच जाणिव बाबासाहेब
आंबेडकरांच्यामध्ये निर्माण करण्यात ते यशस्वी झाले, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार
नाही. महात्मा फुले यांना आपले तिसरे गुरु मानताना बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील
मत नोंदविले आहे. “ब्राह्मणेतरांचे खरे गुरु तेच होत. शिंपी, कुंभार, न्हावी, कोळी,
महार, मांग, चांभारांना माणुसकीचे धडे फुल्यांनीच दिले आणि शिकले. पूर्वीच्या राजकारणात
आम्ही जोतिबांच्या मार्गानेच जात होतो. पुढे मराठे आमच्यातून फुटले. कोणी
कॉंग्रेसमध्ये उष्टे खाण्यासाठी गेले व त्यांच्याचपैकी आमचे रा.ब. बोले हे हिंदू
महासभेमध्ये गेले. ते तेथे हजर आहेतच. कोणी कोठेही जावोत, पण आम्ही मात्र
जोतिबांच्या मार्गाने जाऊ. जोडीला कार्ल मार्क्स घेऊ किंवा दुसरे काही घेऊ पण
जोतिबांचा मार्ग सोडणार नाही. यांच्या शिकवणीने माझे आयुष्य बनले आहे.”(जाधव नरेंद्र, (अनुवाद व संपादन),२०१२,
‘बोल महामानवाचे –डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ५०० मर्मभेदी भाषणे – खंड एक’, ग्रंथाली
प्रकाशन, मुंबई, पृ.१३०.)
महात्मा फुले यांनी केवळ हिंदू
धर्मातील अनिष्ठ चालीविरुद्ध आवाजच उठविला नाही तर नवा पर्याय देण्याचा प्रयत्न केला. जन माणसातील
विचारांमध्ये परिवर्तन प्रबोधनाचे कार्य हाती घेतले. याचसाठी १८७१ साली ‘दीनबंधू’
नावाचे पत्रक सुरु केले. अनेक ग्रंथ लिहिले. १८७३ साली लिहिलेल्या ‘गुलामगिरी’ हे पुस्तक लिहिले. युनायटेड स्टेट्स मधील सदाचारी
लोकांनी गुलामास दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कार्यात औदार्य, निरपेक्षता व
परोपकार बुद्धी दाखविली याबद्दल त्यांच्या कृतीला हे पुस्तक अर्पण करतात व
भारतातील लोकांकडून आशा बाळगतात की, आपले देशबांधव युनायटेड स्टेट्स मधील लोकांचा
कित्ता गिरवत आपल्या शूद्रबांधवास ब्राह्मणलोकांच्या दास्यत्वापासून मुक्त
करण्याच्या कामांत पुढाकार घेतील.
ब्रिटीश सत्ताधीशांशी आर्थिक व कायदेशीर मदत मिळवत परिवर्तनासाठी कार्यशील
राहिले. यासोबतच सरकार दरबारी निवेदने सादर केली. जुन्या परंपरा
झुगारून देत आधुनिक मानवी मूल्यांवर आधारित ‘सावर्जनिक सत्यशोधक समाजाची’ स्थापना
केली. जो पूर्णत: मानवतावादी होता. तो हिंदू धर्मातील कर्मठ, अंधश्रद्धाळू,
धार्मिक कर्मकांड व जातिभेदाविरुद्ध होता.
मोक्ष, पुर्नजन्म यासंबंधी कठोर चिकित्सा केली व ईश्वर व मनुष्य यांच्यातील मध्यस्थाच्या
विरोधी भूमिका घेतली.
जगातील मानव प्राणी सत्य वर्तन
केल्याशिवाय सुखी होणार नाही असे महात्मा फुले आपल्या अखंडामध्ये म्हणतात..
।।
सत्य सर्वांचे आदी घर ।। सर्व धर्माचे
माहेर ।। धृ ।।
।। जगामाजी सुख सारे ।। खास
सत्याची ती पोरे ।। १ ।।
।। सत्य सुखाला आधार ।। बाकी
सर्व अंधकार ।।
।। आहे सत्याचा बा जोर ।। काढी
भंडाचा तो नीर ।।२ ।।
।। सत्य आहे ज्याचे मूळ ।। करी धुर्ताची बा राळ ।।
।। बळ सत्याचे पाहुनी ।। बहुरूपी
जळे मनी ।। ३ ।।
।। करे सुख नटा नोव्हे ।। सत्य
ईशा वर्जू पाहे ।।
।। जोती प्रार्थी सर्व लोका ।। व्यर्थ डंभा पेटू नका ।। ४ ।। सत्य ।। (महात्मा फुले समग्र वाङमय,
सुधारित सहावी आवृत्ती, नोव्हेंबर, २००६, पृ.४५७)
महात्मा
फुले यांचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी, जागरूक आणि संकल्पशील होते. सामाजिक
परिवर्तनासंबंधी समाजाची उग्र स्वरूपाची विरोधी भावना, कट्टर पंथीयांच्याकडून केला
जाणाऱ्या हिंसात्मक विरोधाला न जुमानता व्यवस्थेच्या विरोधी ते खंबीरपणे उभे
राहिले. त्यांचे समकालीन समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती रानडे, आगरकर
हे लोक समाजाच्या दबावापुढे प्रसंगी झुकले किंबहुना त्यांना झुकायला भाग पाडले.
परंतु वचन आणि कर्माची असणारी एकरूपता, चारित्र्य, अन्यायाविरोधात ठामपणे उभे
राहण्याची दृढता यामुळे महात्मा फुले कोणासमोरही झुकले नाहीत.
महात्मा फुले यांचे विचार
आजही क्रांतिकारक ठरतात. कारण त्यांनी प्रत्येक सामाजिक समस्येच्या कारणांचा मुळापर्यत
जाऊन शोध घेतला. धर्मचिकित्सा केली. काल्पनिक ईश्वर नाकारून भौतिकवादाची कास धरण्याचे
आवाहन केले. दुर्देवाने जातीय मानसिकतेमध्ये गुरफटलेल्या भारतीय समाज मनाला महात्मा
फुले यांचे विचार, चिकित्सा म्हणावी तितकी रुचली वा झेपली असेच म्हणावे लागेल. आज ‘धर्म
चिकित्सा’ नाजूक वळणावर येऊन ठेपली आहे! लोकं अकॅडेमिक चिकित्सा देखील सहन करायला
तयार नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली धर्मार्ध विचार जगभर बळावतो
आहे. अशावेळी कठीण प्रसंगी सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध
आवाज बुलंद करायचा असेल तर संविधानिक मूल्यांना प्रमाण मानून सर्व परिवर्तनवादी
विचार प्रवाहांनी काळाची गरज म्हणून एकत्र आले पाहिजे तरच समताधिष्ठीत समाज निर्माण
करता येऊ शकतो याचे भान सर्वाना यायला हवे. हीच खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांना त्यांच्या जन्मदिनी आदरांजली ठरेल...!!
-
अविनाश वर्धन
कोल्हापूर
९९६०३०४२५४

अविनाश, अतिशय उत्तम लेख.असाच प्रयत्न सातत्याने सुरू राहूदे.महात्मा फुल्यांविषयी अतिशय छान माहिती सबळ पुराव्यानिशी सादर केल्यामुळे लेखनाला एक विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.या लेखाच्या माध्यमातून आपण महात्मा फुलेंचे विचार जनमानसात रूजवण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.हेच खरं महात्मा फुले यांना अभिवादन!! धन्यवाद!! असाच सातत्याने प्रयत्न सुरू राहू देत हिच सदिच्छा!!
ReplyDelete